प्रेमाविषयी भाष्य करणारी वेबसीरीज – ताजमहाल १९८९

कहू किसतर मैं कें वो बेवफा है

बात कुझ ऐंसी है के

मुझे उनके मजबुरीयो का पता है…

लखनऊ एक नवाबी शहर…या शहरात प्रेमाचा ‘इझहार’ करण्याचा अंदाजही तितकाच नवाबी. या शहरातील चार प्रेमी जोडप्यांची कथा आहे ‘ताजमहाल १९८९’ या वेब सीरिजमध्ये. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘तालमहाल १९८९’ ही वेबसीरिज ३० वर्षांपूर्वीची प्रेमाची तऱ्हा उलगडू पाहते. टिंडर, फेसबूक, व्हॉट्स अॅप यांसारख्या माध्यमांपूर्वीचं प्रेम कसं होतं? आतापेक्षा वेगळं होतं का, बाह्य गोष्टी बदलल्या तरी प्रेम काळानुरुप बदलतं का? यांसारखे अनेक प्रश्न निर्माण करुन त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न या वेबसीरिजमध्ये करण्यात आला आहे.

पुष्पेंद्रनाथ मिश्रा दिग्दर्शित ताजमहाल १९८९ ही वेबसीरिज तुम्हाला १९८९ च्या काळातील प्रेमाची संकल्पना मांडताना दिसते. त्या काळात टिंडर, फेसबूक, व्हॉट्सअप सारख्या संवाद माध्यमांचा उगम झाला नव्हता. त्यामुळे ऑनलाइन ओळखींवर प्रेम आणि मैत्री होत नव्हती. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कट्ट्यावरील गप्पा, कॉलेज फेस्ट, पार्टी यांमधून ओळखी वाढायच्या. लखनऊ या शहराबद्दल असल्याने तेथे तर शेरोशायरीची परंपरा आहे. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यात याचा सर्वात मोठा वाटा असणं साहजिक आहे.

सात भागांची ही वेबसीरिज चार जोड्यांविषयी बोलताना दिसते. प्रेम हा त्यांमधील समान धागा असला तरी त्यांची परिस्थिती, प्रेमाकडे आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. त्यातील पहिली जोडी म्हणजे सरिता ( गीतांजली कुलकर्णी) आणि अख्तर बेग (नीरज काबी) यांची. यातील सरिता ही फिजिक्सची प्राध्यापक तर अख्तर हा फिलॉसॉफीचा. दोघांचही प्रेमविवाहं झालेला. अख्तरने उर्दूमध्ये मास्टर्स केलं होतं, मात्र प्रेमाखातर त्याने पुन्हा फिलॉसॉफीमध्येही मास्टर्स केलं. त्यामुळे खरं पाहता शेरोशायरी, मुशायरा अख्तरचं पहिलं प्रेम. ज्या शेरोशायरींनी त्याने महाविद्यालयाच्या काळात सरिताला प्रेमाची मागणी घातली होती, ज्याच्या शायरींवर ती कोणीएके काळी घायाळ झाली होती..ती शायरी लग्नाच्या २२ वर्षांनंतर तिला कंटाळवाणी वाटू लागले. त्यातून तिला आलेलं एकटंपण अधिक गंभीर वाटू लागतं. तर दुसरीकडे अख्तर हा आपली आवड जपतो. त्यात त्याला पुरेसा आनंद मिळत असतो. पण हे जितकं चांगल पुरुषांना जमतं तितकचं चांगल स्त्रियांना जमतच असं नाही. त्यातून हळूहळू नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. घटस्फोटाच्या पायरीवर असलेलं त्याचं नातं त्याने उचलेल्या एका पावलामुळे बहरुन निघतं.

दुसरी जोडी म्हणजे मुमताज (शीबा चड्डा) आणि सुधाकर मिश्रा (दानिश हुसेन). महाविद्यालयात फिलॉसॉफीमध्ये गोल्ड मेडलिस्ट असलेला सुधारक एका टेलरच्या दुकानात कपडे शिवताना बघून दचकायला होतं. त्याच्या आयुष्यातील प्रेमाच्या संकल्पना आणि एकंदरच जगण्याच्या संकल्पना खूप वेगळ्या आहेत. तो भौतिकवादाला बळी न पडता मनाशी आणि आयुष्याशी प्रतारणा करीत नाही. लाल बत्ती भागात व्यवसाय करणाऱ्या मुमताजच्या तो प्रेमात पडतो. आणि त्या प्रेमाखातर सर्वांना सोडून देण्याची ताकद ठेवतो. त्याच्या प्रेमाच्या आड लग्नासारखी गोष्टीही कदाचित त्याला तितकी महत्त्वाची वाटत नाही. तत्वज्ञान हे पुस्तकी न ठेवता तो त्याचे आचरण करतो. मात्र ते करताना कोणताही बडेजाव नाही, अगदी सरळ साध्या पद्धतीने तो आपलं आयुष्य जगत असतो. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तो मुमताजसाठी मुमताज महल तयार करतो. या परिपक्व प्रेमाबरोबरच महाविद्यालयीन वयातील प्रेमही ही सीरिजमध्ये दाखविण्यात आलं आहे.

रश्मी (अन्शुल चौहान), अंगद (अनुद सिंह ढाका) आणि धर्म (परस प्रियदर्शन) या तिघांमधील मैत्री आणि धर्म व रश्मी या दोघांमधील नवं मात्र सफल न झालेलं प्रेम चित्रीत केलं आहे. अंगद हा एका अनाथ आहे. मात्र त्याला मैत्री कळते. मात्र प्रेमावर त्याचा विश्वास नाही. महाविद्यालयात असताना तो कम्युनिस्ट विचारसरणीचा अभ्यास करतो. आणि त्यादरम्यान तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. काहीसा सुधारकसारखा वाटावा असा अंगदही बाह्य प्रलोभनांना बळी पडत नाही. दुसरीकडे धर्म मात्र बाह्य प्रलोभनांना बळी पडतो आणि रस्ता भटकतो.

या सीरिजमध्ये प्रत्येक कलाकाराची निवड अत्यंत चोख पद्धतीने केली आहे. अगदी नवे नवे कलाकारही दांगडा अभिनय करतात. निदा काजी यांनी यापूर्वीदेखील ‘सॅक्रेड गेम्स’, ‘वन्स अगेन’ यांरख्या अनेक सीरिजमधून दमदार अभिनय केला आहे. या वेब सीरिजमध्ये त्यांच्या अभिनयाची एक वेगळीच छटा पाहायला मिळते. गीतांजली कुललर्णीनेही आपल्या भूमिकेला १०० टक्के न्याय दिला आहे. दानिश व शीबा यांच्या अभिनयाने सीरिज अधिक परिपक्व वाटत राहते. यातील प्रत्येक भूमिका सीरिजच्या शेवटी आपल्या लक्षात राहते हे विशेष. दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयातून उभी राहिलेली ही वेब सीरिज आपल्याला प्रेमाची स्वताची परिभाषा तयार करायला उद्युक्त करते. अभिनयाबरोबरच या सीरिजची सिनेमेटोग्राफी प्रेक्षकांना आकर्षित करते. कोणतीही कलाकृती असो मग तो चित्रपट असो वा वेब सीरिज, ती कलाकृती प्रेक्षकांना कोणत्या कलेने दाखवावी हे मोठं कौशल्य असतं.

१९८९ चा काळ दाखविताना दिग्दर्शकाने छोटा छोटा विचार केलाला दिसतो. अगदी बिटेक्स मलमाची जाहीरात असो, कोलगेट पावडरचा छोटा डबा, रसनाची जाहीरात, १९८९चे कॅलेंडर, करमचंद मालिका, कॅरम बोर्ड, वेस्पा स्कूटर, टेप रेकॉर्डर, कॅसेट्स, कॅमल कंपॉस बॉक्स या सर्व गोष्टी सीरिजमध्ये वेळोवेळी दाखविल्या आहेत. या सर्व बाबी त्या काळाची आठवण करुन देतात. या सर्व गोष्टींमुळे चांगली वातावरण निर्मिती झाली आहे.

या वेब सीरिजमध्ये वेळोवेळी सांगितलेलं तत्वज्ञान प्रेक्षकांना आयुष्यातील एक नवीन धडा शिकवून जातं. फैल अहमद फैजची शायरी या कथेला अधिक खोल व परिवक्व करते. या सीरिजमधील प्रत्येक भूमिका एकमेकांशी जोडलेली आहे. त्यामुळे अनेक जोड्या, कलाकार व त्यांच्या स्वतंत्र कथा असल्या तरी कुठेच तुटलेपण जाणवत नाही. तर वेब सीरिजच्या शेवटी तुम्हाला अंतर्बाह्य विचार करायला लावते.

मराठीत अनेक साहित्यिकांनी प्रेमाच्या व्याख्या केल्या आहेत. आजही आपल्याला कोणी प्रेम म्हणजे काय असं विचारलं तर नेमकेपणाने सांगता येत नाही. शाहजहान अकबरने मुमताजसाठी ताजमहाल बांधलं हे प्रेम आहे. पण एखाद्या गरीबाने आपल्या प्रेयसीसाठी बांधलेली छोटीशी झोपडीदेखील प्रेमचं आहे ना? Love is mutating virus जे कोणाला कोणत्याही वयात कळत नाही हेच खरं!!