चित्रपट मोठ्या पडद्यावर कधी पहायला मिळणार? ‘हे’ चित्रपट आजही सिनेमागृहांच्या प्रतिक्षेत!

आपल्या आवडत्या कलाकारांचे चित्रपट मोठ्या पडद्यावर कधी पहायला मिळणार? हा प्रश्न आज सिनेप्रेमींना सतावत आहे.

  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर हळूहळू कमी होऊ लागल्यानं आता सर्वांनाच कामावर परतण्याचे वेध लागले आहेत. शूटिंग सुरू झालं, पण सिनेमागृहं कधी सुरू होणार? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कोणाकडेही नाही. असं असलं तरी रसिक मात्र मागील सव्वा वर्षापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले बिग बजेट चित्रपट पाहण्यासाठी आतुरले आहेत. आपल्या आवडत्या कलाकारांचे चित्रपट मोठ्या पडद्यावर कधी पहायला मिळणार? हा प्रश्न आज सिनेप्रेमींना सतावत आहे.

  कोरोनामुळं चित्रपटगृहांना टाळं लागल्यानं ओटीटीनं मुसंडी मारत रसिकांसमोर मनोरंजनाचा नवा पर्याय उपलब्ध केला आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या वेब सिरीजनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असून, काही चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. प्रेक्षकांना मात्र आपल्या आवडत्या कलाकारांचे बिग बजेट चित्रपट थिएटरमध्येच जाऊन पहायचे असल्याचं चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याच कारणांमुळं बिग बजेट चित्रपटांचे निर्मातेही सिनेमागृहांची कवाडं उघडण्याची प्रतीक्षा करत आहेत. अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि ‘बेलबॅाटम’, जॅान अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’, अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’, फरहान अख्तरचा ‘तूफान’, राणा दग्गुबतीचा ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटांसोबत संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठियावाडी’, एस. एस. राजामौलींचा ‘आरआरआर’ या पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचाल करत असलेल्या चित्रपटांचीही रसिकांना प्रतीक्षा आहे. या सर्व चित्रपटांमध्ये हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार आहेत.

  दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ची प्रेक्षक मागच्या वर्षाच्या मार्चपासून वाट पहात आहेत. रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’मध्ये रोहितनं ‘सूर्यवंशी’ची एक झलक सादर केली होती, तेव्हापासून अक्षयच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्याला रोहितच्या शैलीत अॅक्शन करताना पहायचं होतं, पण सिनेमागृहांचे दरवाजे बंद असल्यानं त्यांची घोर निराशा झाली आहे. या चित्रपटात डीसीपी वीर सूर्यवंशीच्या रूपातील अक्षयची धडाकेबाज अॅक्शन पहायला मिळणार आहे. यात पुन्हा एकदा अक्षयची जोडी कतरीना कैफसोबत जमली आहे. यासोबतच बाजीराव सिंघम अजय देवगण आणि सिम्बा रणवीर सिंगही दिसणार असल्यानं प्रेक्षकांना ट्रीपल धमाका अनुभवायला मिळणार आहे. मुंबईच्या पार्श्वभूमीवरील कथा या चित्रपटात आहे. मागच्या वर्षी २४ मार्चला प्रदर्शित होणारा हा चित्रपट यंदा ३० एप्रिलला रसिकांच्या भेटीला येणार होता, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढल्यानं सिनेमागृहं बंद करण्यात आली आणि ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होऊ शकला नाही. अक्षयचा ‘बेल बॅाटम’ मात्र २७ जुलैला प्रदर्शित होणार असल्याचं निर्माते वासू भगनानी यांनी घोषित केलं आहे. रणजीत तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता यांच्या भूमिका आहेत. स्पाय थ्रिलर असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात आलं आहे.

  जॅानच्या डबल धमाक्याची प्रतीक्षा
  जॅान अब्राहमची दुहेरी भूमिका असलेल्या ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटाचीही सर्वांना प्रतीक्षा आहे. मिलाप झवेरींच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्यमेव जयते’चा सिक्वेल आहे. प्रथम एप्रिलमध्ये आणि नंतर सलमान खानच्या ‘राधे – युव्हर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटासोबत १३ मे रोजी ईदच्या मुहूर्तावर ‘सत्यमेव जयते २’ प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळं होऊ शकला नाही. या चित्रपटात जॅानच्या अॅक्शनची डबल धमाल पहायला मिळणार आहे. यापैकी एक पोलिसी वर्दीत दिसणार असून, दुसऱ्याबाबत काही रिव्हील करण्यात आलेलं नाही. या चित्रपटात जॅानच्या जोडीला दिव्या कुमार खोसला मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय अनुप सोनी, राजीव पिल्लै, साहील वैद यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निखिल आडवाणी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख अद्याप घोषित केलेली नाही.

  वेटींग लिस्टवर मराठी चित्रपट
  प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या मराठी चित्रपटांची यादीही खूप मोठी आहे. ‘पावनखिंड’, ‘ईमेल फीमेल’, ‘डार्लिंग’, ‘हॅशटॅग प्रेम’, ‘कंदील’, ‘गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात’, ‘फिरस्त्या’, ‘कॅाफी’, ‘प्रेम योगायोग’, ‘ये रे ये रे पावसा’, ‘आलंय माझ्या राशीला’, ‘३६ गुण’, ‘रंगीले फंटर’, ‘भोंगा’, ‘घे डबल’, ‘बळी’, ‘झॅालीवूड’, ‘झोंबिवली’, ‘८ दोन ७५’, ‘लव्ह सुलभ’, ‘इन्स्टिट्यूट आॅफ पावटॅालॅाजी’, ‘भारत माझा देश आहे’, ‘झिम्मा’, ‘झोलझाल’, ‘मनमौजी’ असे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी आतुरलेले आहेत. यापैकी योगेश जाधव यांच्या ‘ईमेल फीमेल’ या चित्रपटानं दोन वेळा प्रदर्शनाची योजनाही आखली, पण दोन्ही वेळेस चित्रपटगृहं बंद झाल्यानं थांबावं लागलं. आता पूर्ण क्षमतेनं चित्रपटगृहं सुरू झाल्यानंतरच ‘ईमेल फीमेल’च्या प्रदर्शनाची योजना आखण्यात येणार आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या ‘डार्लिंग’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख दोन वेळा घोषणा करण्यात आली होती. प्रथमेश परब, निखिल चव्हाण, रितीका श्रोत्री यांची मुख्य भूमिका असलेला ‘डार्लिंग’ ७ जानेवारी आणि २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता, पण दोन्ही वेळेला कोरोनानं घात केल्यानं ‘डार्लिंग’ आणि मराठी सिनेरसिकांची गाठभेट होऊ शकली नाही.

  मुखवट्यामागील चेहरे कधी दिसणार…
  वयाच्या या टप्पटप्प्यावरही अमिताभ बच्चन एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. ‘चेहरे’ हा चित्रपट त्यापैकीच एक आहे. रुमी जाफरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा एक मिस्ट्री थ्रिलर आहे. खरं तर हा चित्रपट मागच्या वर्षी १७ जुलै रोजी रिलीज करण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर कोरोनामुळं विलंब झालेला हा चित्रपट यंदा मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं पुन्हा सिनेमागृहं बंद करावी लागली आणि मुखट्यांमागे दडलेले ‘चेहरे’ प्रेक्षकांसमोर येऊ शकले नाहीत. या चित्रपटाच्या निमित्तानं अमिताभ आणि इम्रान हाश्मी एकत्र आले आहेत. याशिवाय रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ कपूर, अन्नू कपूर, रघुबीर यादव यांनीही या चित्रपटात अभिनय केला आहे. राणा दग्गुबतीचा ‘हाथी मेरे साथी’ २६ मार्च रोजी प्रदर्शित होऊ शकला नव्हता. राकेश ओमप्रकाश मेहरांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘तूफान’ १६ जुलै रोजी अॅमेझॅान प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्याची योजना आहे.