ज्याला गायन कळतं त्याला कधी नैराश्य येत नाही- भाऊसाहेब भोईर

सांस्कृतिक क्षेत्रासह इतर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्याला शॉर्टकट नसतो. तुम्हाला जागतिक दर्जाचे सिद्ध व्हायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात सातत्य असलं पाहिजे. ज्याचा कान तयार झालेला असतो तो कधीही नैराश्यात जात नाही हे लक्षात ठेवा असा वडिलकीचा सल्ला ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी दिला.

    पुणे: सांस्कृतिक क्षेत्रासह इतर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्याला शॉर्टकट नसतो. तुम्हाला जागतिक दर्जाचे सिद्ध व्हायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात सातत्य असलं पाहिजे. कोणत्याही दुःखावर मात करण्याची क्षमता गायन आणि संगीतात आहे. ज्याचा कान तयार झालेला असतो तो कधीही नैराश्यात जात नाही हे लक्षात ठेवा असा वडिलकीचा सल्ला ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी दिला.

    निमित्त होते पिंपरी चिंचवड आयडॉल मोरया करंडक स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे. उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उबलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मागील सात वर्षांपासून ज्येष्ठ नगरसेवक आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड आयडॉल मोरया करंडक स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेच्या सातव्या पर्वाची विजेती ठरली आहे सोजी जॉर्ज.

    शनिवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोजी जॉर्ज हिला भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते रोख २१ हजार रुपये आणि मोरया करंडक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजक हर्षवर्धन भोईर, संयोजिका मानसी घुले भोईर, किरण भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, युवा नेते विशाल वाकडकर, संतोष पाटील, सुषमा बोऱ्हाडे खटावकर, निवेदक मधुसूदन ओझा, परीक्षक अभिषेक मारुटकर, मेधा चांदवडकर, मंजुश्री दिवाण, विजय जोशी, संयोजन सहकारी सुनिता वर्मा, दिलीप सोनिगरा आदींसह शहरातील सांस्कृतिक व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी भाऊसाहेब भोईर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मला स्वतःला गायक व्हायचं होतं, ते माझं स्वप्न पूर्ण झालं नाही. परंतु आजच्या नवीन गायकांना ऐकताना मी त्यांच्यामध्ये मला शोधत असतो. या आवडीमुळेच मी पिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धा सुरू केली. या सांस्कृतिक क्षेत्रामुळे मला लता दीदी, आशाताई, पंडित हृदयनाथ मंगेशकर अशा जागतिक दर्जाच्या नामवतांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली हीच माझी श्रीमंती आहे.

    आयोजक हर्षवर्धन भोईर यांनी सांगितले की, या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी ८० स्पर्धकांची पहिल्या फेरीसाठी त्यातून ४३ स्पर्धकांची दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली होती. उपांत्य फेरीत २१ स्पर्धकांनी प्रवेश निश्चित केला. अंतिम फेरीतील १० कलाकारांना ग्रँड फिनाले मध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळाली. अंतिम फेरीतील सर्वच कलाकारांनी उत्तम सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या पूर्ण स्पर्धेत एकूण १५० स्पर्धकांनी १००९ गाणी सादर केली. पैकी अंतिम फेरीतील १० कलाकारांना प्रत्येकी ३ गाणी सादर करण्यास संधी मिळाली.