सणसमारंभाला नेसा डिझायनर साडी; वापरा या टिप्स

बाजारात कॅटलॉग पीस म्हणून मोठ्या प्रमाणात साड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला डिझायनर साड्यांमध्ये निवड करायला पुष्कळ प्रकार चोखंदळपणे पाहता येऊ शकतात. कांथा, फुलकारी, जरदोसी, राजस्थानी पॅचवर्क, कशीदाकारी, आरी, मिरर वर्क, लेदर वर्क, कुंदनवर्क अशा कितीतरी प्रकारात या साड्या बाजारात आणि ऑनलाईनही मिळतात.

  घरात एखादा समारंभ असेल, छोटा मोठा कार्यक्रम असेल तर जेवढी तयारी आणि विचार त्या कार्यक्रमाचा करावा लागतो तितकाच विचार त्या विशिष्ट प्रसंगाला काय घालायचे याचा करावा लागतो. त्यात जर साडी नेसण्याची आवड असेल आणि साडी नेसण्याची संधी असेल तर मग आपल्या आणि इतरांच्या लक्षात राहील अशीच साडी शोधण्याचा अनेकींचा प्रयत्न असतो. कार्यक्रमासाठी शॉपिंग ही कल्पना तर आता खूप रूढ होते आहे. साडीची शॉपिंग करताना तर मग हटके साडी शोधण्याचाच प्रयत्न असतो. हल्ली तर पारंपरिक प्रकारात डिझायनर साड्या मिळू लागल्यामुळे प्रत्येकीच्या वाट्याला खास साडी येईल हे नक्की.

  काठापदराच्या, जरीच्या साड्यांइतक्याच या डिझायनर साड्या फार सुंदर दिसतात. फक्त आपल्या व्यक्तिमत्त्वावर खुलून दिसेल अशा पद्धतीचे वर्क, डिझाईन यांची निवड करणं फार महत्त्वाचं ठरतं. जर योग्य डिझायनर साडीची निवड केली गेली नाही तर ऐन कार्यक्रमाप्रसंगी तुमचा लूक साडीने उठून दिसण्यापेक्षा केवळ साडीमुळेच फसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे थोडीशी कल्पकता वापरूनच डिझायनर साडी निवडायला हवी.

  कॅटलॉग पीस
  बाजारात कॅटलॉग पीस म्हणून मोठ्या प्रमाणात साड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला डिझायनर साड्यांमध्ये निवड करायला पुष्कळ प्रकार चोखंदळपणे पाहता येऊ शकतात. कांथा, फुलकारी, जरदोसी, राजस्थानी पॅचवर्क, कशीदाकारी, आरी, मिरर वर्क, लेदर वर्क, कुंदनवर्क अशा कितीतरी प्रकारात या साड्या बाजारात आणि ऑनलाईनही मिळतात. या साड्यांचे कापड हीच या साड्यांची खासियत आहे. अत्यंत तलम, रेशमी, झुळझुळीत अशा प्रकारच्या कापडाची निवड या साड्यांसाठी केली जाते. या साड्या अत्यंत आकर्षक पद्धतीनं आणि अॅंस्थेटीक सेन्स वापरून बनवल्या गेल्याने यांच्या किंमतीही जास्त असतात. परंतु असे असले तरीही साधारण दीड दोन हजारपासून या साड्या दुकांनामध्ये पहायला मिळतात. बंगळुरू, हैदराबाद, मुंबई येथे प्रामुख्याने या साड्या तयार केल्या जातात.

  डिझायनर साड्या निवडताना..
  या साड्या खरोखरीच फारच सुंदर दिसतात, फक्त त्यांची निवड करताना हे काही मुद्दे लक्षात ठेवायला हवेत.
  – बटबटीत साडी आणि अत्यंत ग्रेसफुल साडी असे दोन महत्त्वाचे फरक या प्रकारच्या साड्यांमध्ये असतात. त्यांपैकी आपल्याला कोणत्या समारंभाला साडी घालायची आहे हे ध्यानात ठेऊन साडी निवडावी.
  – नेटचा पल्लू, वेल्वेट पल्लू हे देखील फार सुंदर दिसतात.
  – आभूषणांची निवड साडीच्या वर्कला अनुसरूनच करावी. म्हणजे साडी अधिक खुलून दिसते.
  – साडीवर हलके डिझाईन, अॅम्ब्रॉडरी असेल तर ब्लाऊज त्यापेक्षा अधिक वर्क असलेले घालावे. साधारणत: कॉन्ट्रास्ट मॅच होईल याकडे लक्ष द्यावे.