नववधूच्या बॅगेत हमखास असाव्या ‘या’ गोष्टी

तुमचा एक वॅनिटी बॉक्स तयार करा. ज्यात तुमच्या गरजेच्या वस्तू ठेवा. उदाहरणार्थ, टिकलीचं पाकीट, कुंकवाची कुयरी किंवा डबी,...

  लग्नानंतर नव्या घरी जाताना नववधूच्या बॅगेत काही महत्त्वाच्या गोष्टी असणं आवश्यक आहे. ती दुसऱ्या घरी जाणार असल्यानं एकाचवेळी माहेरचं सगळं सामान आणणं तिला काही शक्य होत नाही. नव्यानं खरेदी करणंही शक्य नसतं. त्यामुळे तिच्या बॅगेत अशा काही वस्तू, कपडे असाव्यात, जेणेकरून तिची सासरी पंचाईत होणार नाही. या गोष्टी बहुपयोगी असल्यानं त्याचा उपयोग अनेक पद्धतींनी होऊ शकतो. त्यामुळे नववधू म्हणून तुम्ही सुंदर दिसालच; शिवाय तुमच्यातला स्मार्टनेसही दुसऱ्यांवर प्रभाव पाडेल.

  क्लासिक बनारसी साडी
  हा साडीचा प्रकार तुम्हाला आईच्या साड्यांच्या संग्रहात सापडतोच. साडीचा हाच प्रकार तुमच्या संग्रहात आणण्याची लग्नापेक्षा चांगली वेळ कोणती? बनारसी कापड खूप आकर्षक असल्यामुळे तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या साडीवर डीप बॅकनेक गोल्डन ब्लाउज असेल, तर तुम्ही चर्चेत आलाच म्हणून समजा.

  भारतीय पद्धतीचे जॅकेट
  एखाद्या नववधूसाठी हा लूक खूप उठावदार दिसतो. सर्व कार्यक्रमात किंवा लग्नानंतरच्या डेटवर किंवा कुटुंबाबरोबरच्या डिनर प्रोग्रामसाठी हा पोषाख अगदीच चालून जाईल. जॅकेट आणि डेनिमचं कॉम्बिनेशन उत्तम दिसतं. यामुळे तुम्हाला ट्रेंडी लूक मिळतोच; शिवाय तुम्हाला या पेहरावात खूप आरामदायीही वाटेल.

  फूटवेअर
  फूटवेअरची खरेदी करताना किंमतीच्या बाबतीत हात सैल सोडा. म्हणजे चांगल्या दर्जाचे फूटवेअर घेता येतील. त्यानिमित्तानं तुमचं कलेक्शनही वाढेल. तुमचं कलेक्शन चांगलं असेल, तर सर्वांत जास्त फॅशनेबल फूटवेअर वापरात काढा. कपड्यांनुसार फूटवेअर ठरवा. हाय हिल्स् घेत असाल, तर तुम्हाला त्यात व्यवस्थित चालता आलं पाहिजे.

  सुंदर सजवलेला क्लच
  हा खूप छान पर्याय आहे. लग्नानंतर अनेकदा तुम्हाला काही कार्यक्रमांना जावं लागतं. नटूनथटून, पारंपरिक पेहराव यावेळी घालणं आवश्यक असतं. त्यासाठी क्लचसारखा एथनिक पर्यायच हवा. तुम्ही एखादा क्लच कॅरी केलात, तर त्यात तुमच्या मेकअपचं प्राथमिक साहित्य आणि मोबाइल बसू शकेल; तसंच हे एक फॅशन स्टेटमेंटही होऊ शकतं.

  वॅनिटी बॉक्स
  तुमचा एक वॅनिटी बॉक्स तयार करा. ज्यात तुमच्या गरजेच्या वस्तू ठेवा. उदाहरणार्थ, टिकलीचं पाकीट, कुंकवाची कुयरी किंवा डबी, लिपस्टिक, कंगवा, सेफ्टी पिन्स, केसांच्या पिन्स, पावडर इत्यादी. यामुळे तुमचा स्मार्टनेस वाढेल.

  गोल्डन लेहेंगा
  हा ड्रेस प्रत्येक नववधूकडे असावा; कारण या पेहरावासोबत खूप काही मॅच करता येतं. यामध्ये सध्या बेल स्लिव्हची फॅशन आहे. तुम्हाला हा लूक आणखी पारंपरिक हवा असेल, तर तुम्ही तो अनारकली पॅटर्नमध्येही डिझाइन करू शकता. त्यावर एखादा शॉर्ट कुडताही चांगला दिसेल.