metallic dress

सध्या तरुणींना मेटॅलिक पॅटर्नची भुरळ पडली आहे. धातूंसारखी चमक असणाऱ्या या रंगाची विशेष क्रेझ पाहायला मिळत आहे. चला तर मग मेटॅलिक फॅशनविषयी जाणून घेऊया.

फॅशन आणि कपड्यांची पारख असणारे मेटॅलिक रंगांच्या पोषाखाकडे आकर्षित होण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. पूर्वी केवळ रॅम्पवॉक किंवा फॅशन शोमध्ये दिसणारी मेटॅलिक फॅशन आता तरुणींच्या कपाटात दिसत आहे. सामान्य लुकपासून ते पार्टीवेअर आऊटफिट्सपर्यंत मेटॅलिक पॅटर्नच्या फॅशनला पसंती दिली जात आहे.

कपड्यांना पसंती

मेटॅलिक रंगाच्या छटा असणारे भरपूर प्रकारचे कपडे बाजारात सहजरित्या उपलब्ध होतात. मेटॅलिक पेटर्नचे कपडे तरुणींनाच नाही तर तरुणांना देखील तितकेच आकर्षित करतात. सध्या टी-शर्ट, मिडी ड्रेस, गाऊन, मिनी स्कर्ट्स, जम्पसूट्स, लाँग स्कर्ट, प्लेटेड स्कर्ट, कॅमी टॉप्स, टँक टॉप्स, शॉर्ट पँट्स, फिरत्या रंगाची छटा असणारे मेश टॉप्स, शर्ट टँक टॉप, फ्रिंज टॉप्स, रिब टॉप्स, झिपर, श्रग किंवा जॅकेट, पफर जॅकेट, बॉम्बर जॅकेट आदी कपड्यांमध्ये मेटॅलिक पॅटर्नची प्रचंड क्रेझ आहे.

पर्स-बॅग्स आणतील लूक

आऊटफिटवर मॅचिंग किंवा आकर्षक रंगसंगतीच्या बॅग्स किंवा क्लच घेतल्यानं लूकमध्ये आणखी भर पडते. मेटॅलिक पॅटर्नमध्ये भूमितीय आकार असणाऱ्या बॅग्सना विशेष मागणी आहे. सोनेरी, चंदेरी आणि अनेक रंगांमध्ये उपलब्ध असल्यानं अशा बॅग्सची क्रेझ जास्त आहे. लहान मुलांसाठी देखील मेटॅलिक बॅग्सच्या असंख्य डिझाइन्स उपलब्ध आहेत. क्लच, टोट, हँड, शोल्डर, पोटली, मेटॅलिक, वेस्ट बॅग्स, मोबाइल पाऊच या पॅटर्नच्या पर्स आणि बॅग्समध्ये मेटॅलिक रंगांची चलती आहे.

metallic fashion

 

अ‍ॅक्सेसरीज ठरतील सुपरहिट

मेटॅलिक पॅटर्न सौंदर्यात एक वेगळीच भर घालतं. अ‍ॅक्सेसरीजमध्ये सध्या मेटॅलिक ट्रेंड हिट ठरतोय. या पॅटर्नच्या अ‍ॅक्सेसरीज लूक वाढवण्यासोबतच सर्वांचं लक्षही वेधून घेतात. हेअरबँड, चोकर, बो, वॉच बेल्ट, हेअर क्लिप्स, मेटॅलिक सस्पेंडर्स या अ‍ॅक्सेसरीजमधील मेटॅलिक पॅटर्न तुमच्या लुकला चार चांद लावतील.

metallic hear band

 

स्टायलिश बूट

नवीन आणि हट के लूक करायचा असेल तर मेटॅलिक शूज तुमची नक्कीच मदत करतील. या पॅटर्नमध्ये बाजारात असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. मेटॅलिक शूजमधील होलोग्राफीक, रेन्बो मेटॅलिक, एक्लिप्स या पॅटर्नची तरुणांमध्ये विशेष आवड पाहायला मिळते.

साड्यांची चर्चा

मेटॅलिक पॅटर्नच्या कपड्यांमध्ये साड्या आणि ब्लाउज देखील मागे पडले नाहीत. या प्रकारच्या साड्यांचा पार्टीवेअर लूकसाठी स्टायलिंगमध्ये समावेश केला जातोय. विशेषतः सॅटिन सिल्क आणि जाळीच्या साड्यांवर मेटॅलिक रंग खुलून दिसतात. महिलांचं मेटॅलिक रंगांच्या साड्यांकडे कल वाढत चालला आहे. यासोबतच स्टेटमेंट ब्लॉउजमध्येसुद्धा मेटॅलिक पॅटर्नची चलती आहे.

नेल पेंटमध्येही मेटॅलिक रंग

स्टायलिस्ट दिसण्यासाठी पेहरावाला साजेशी नेल पॉलिश लावली जाते. सध्या नेल पॉलिशमध्येही मेटॅलिक रंग पाहायला मिळत आहेत. मेटॅलिक रंगाच्या नेल आर्टची तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मेटॅलिक नेल पॉलिशमुळे नखांना अगदी आरशासारखा लूक येतो. मेटॅलिक सोबतच सोबतच मल्टी क्रोम रंगांच्या नेल पॉलिशसुद्धा ट्रेंडमध्ये आहेत.