जुनी फॅशन झाली पुन्हा नवी; ‘बेल’ स्लीव्हजचा ट्रेंड

पारंपरिक साडीबरोबर तुम्ही बेल स्लीव्हजचा ब्लाऊज घालू शकता. मात्र हे करताना जास्त घेर असलेले बेल स्लीव्हज ब्लाऊज घालणे टाळा. मध्यम घेराचे बेल स्लीव्हस घालावेत.

  जुन्या काळातली फॅशन पुन्हा नव्या स्वरूपात लोकांसमोर आणायची हे सूत्र फॅशनविश्वात हिट आहे. सत्तरीच्या दशकातली ‘बेल स्लीव्हज’ची फॅशन आता पुन्हा लोकप्रिय झालेली दिसतेय. शर्टस असो वा मिडी ड्रेस, कुर्ती असो वा अगदी साडीवरचा ब्लाऊज, सगळीकडेच या ‘बेल स्लीव्हज’चा ट्रेंड दिसून येतोय. कॅम्पसमध्ये तर याचे अनेक आविष्कार पाहायला मिळतायत. सगळीकडे बेलची रेलचेल असताना तुम्हीही हा हटके ट्रेंड ट्राय करू शकता.

  कसा करा उपयोग?
  – बेल स्लीव्हस असलेला कोणताही पेहराव तुमच्या लूकला ‘चार चांद’ लावू शकतो. त्यामुळे त्याबरोबर मोठ्या अॅक्सेसरीज किंवा मोठी प्रिंट असलेले कपडे घालणे शक्यतो टाळा.

  – प्लेन रंगाच्या बेल स्लीव्हस शर्टबरोबर तुम्ही डेनिम पँट किंवा स्कर्ट घालू शकता. या व्यतिरिक्त टाईट्स किंवा लेगिंग्सचा पर्यायही आहे.

  – जर तुमची उंची कमी असेल तर कट असलेला बेल स्लीव्हस ड्रेस घाला. याबरोबर उंच टाचेच्या चप्पला घालू शकता.

  – बारीक शरीरयष्टी असलेल्या तरुणींनी जास्त घेर असलेल्या बेल स्लीव्हस ड्रेसची निवड करावी. यामुळे आकर्षक लूक मिळतो.

  – बेल स्लीव्हस ड्रेस घालताना मोठ्या बॉर्डर असलेले किंवा बारीक प्रिंट असलेले कपडे घालणं टाळावं. यासाठी शक्यतो प्लेन रंगाच्या कापडाची निवड करावी.

  – फॉर्मल्समध्येही बेल स्लीव्हस शर्टसची चलती आहे. हे शर्टस घालताना त्याखाली तुम्ही ट्राऊझर किंवा पेन्सिल स्कर्टही घालू शकता.

  – बेल स्लीव्हस घालताना शक्य झाल्यास तुमच्या पेहरावात पांढऱ्या रंगाचा समावेश आवर्जून करा. पांढऱ्या रंगामुळे बेल स्लीव्हसना आणखी उठाव येतो.

  – पारंपरिक साडीबरोबर तुम्ही बेल स्लीव्हजचा ब्लाऊज घालू शकता. मात्र हे करताना जास्त घेर असलेले बेल स्लीव्हज ब्लाऊज घालणे टाळा. मध्यम घेराचे बेल स्लीव्हस घालावेत.