थंडीच्या दिवसात करा पिकोटची फॅशन

थंडीच्या दिवसात यंदा उबदार कपड्यांतला हा सदाबहार कोट घालायची संधी दवडू नका.

थंडीच्या दिवसात उबदार लोकरीचे स्वेटरपासून ते वेगवेगळ्या कोटपर्यंत कपडे आपल्याला वापरता येतात. या कोटमध्ये मात्र एक प्रकार सदाबहार ठरत आला असून फॅशन (winter fashion )जगतात राज्य करत आहे. तो म्हणजे पीकोट. वेगवेगळ्या प्रकारची शरीरयष्टी असलेल्यांना हा कोट खुलून दिसतो, त्याबद्दल थोडेसे….

पीकोटचा उगम

पोशाखांच्या बहुतांश आयकॉनिक परंपरांचा उगम मिलिटरी फॅशनमध्ये झालेला दिसतो. पीकोट देखील त्याला अपवाद नाही. खलाशांना काम करताना सोयीचा पोशाख म्हणून या कोटचा वापर 18व्या शतकात सुरू झाला. त्यामध्ये रीफर आणि ब्रिज कोट हे दोन प्रकार अनुक्रमे नौदल अधिकारी आणि इतर कनिष्ट अधिकारी यांच्यासाठी विकसित झाले. पारंपरिक पीकोटची खासियत म्हणजे मोठे नॉच पॅनल्स आणि जाड मेल्टनचे कापड. मात्र, सध्या पीकोटच्या कापडात  मेरिनो वूलपासून ते काश्मीर आणि मोहैर ब्लेंडपर्यंत प्रकार वापरले जातात.

पीकोट कसा वापराल?

कोणत्याही प्रकारच पँट घातलेली असताना पीकोट वापरता येतो. त्यावर तो खुलूनही दिसतो. वेगळ्या गारमेंटसोबत घातल्यानंतर पीकोटचा लूक अधिक खुलतो. डेनिम, हार्ड वेअरिंग बूट आणि स्वेटर हे रांगड्या लूकसाठी भन्नाट कॉम्बिनेशन आहे. शार्प ट्राउझर्स आणि शर्ट किंवा रोल नेकसोबत हा काट घातल्यास तुम्हाला सोफिस्टिकेटेड लूक मिळेल. नेव्ही ब्लू, तसेच गडद रंगांमध्ये बरगंडी, डार्क ब्राउन हे पीकोटमध्ये चांगले पर्याय ठरतील.