प्रत्यक्ष शाळा सुरू होणार : पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी

महिनोंमहिने इतरांपासून वेगळं राहून घालवलेला काळ, ऑनलाइन शाळेचा (Online School) ताण, लोकांमध्ये मिसळता न येणे, आणि शारीरिक कामांचा अभाव या सगळ्याचा विपरित परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) झाला आहे.

  डॉ. गुरुदत्त भट

  प्रत्यक्ष वर्ग (Classrooms) आणि शाळा कधी सुरू होत आहेत (School Reopens) याची आतुरतेने पाहणाऱ्या मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी खुशखबर आहे. कोव्हिड-१९ (Covid-19) च्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने राज्य शालेय शिक्षण व आरोग्य विभागाने टास्क फोर्सबरोबर (Task Force) झालेल्या बैठकीनंतर राज्यभरातील शहरी भागांमध्ये पाचवी ते सातवी इयत्तांसाठी तर ग्रामीण भागांमध्ये पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा एकदा प्रत्यक्ष रूपात सुरू करण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला आहे.

  महिनोंमहिने इतरांपासून वेगळं राहून घालवलेला काळ, ऑनलाइन शाळेचा (Online School) ताण, लोकांमध्ये मिसळता न येणे, आणि शारीरिक कामांचा अभाव या सगळ्याचा विपरित परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) झाला आहे. मात्र जसजशा शाळा पूर्वीप्रमाणे सुरू होतील व आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येऊ लागेल तसतशी मुलेही या भावनिक कल्लोळातून सावरतील.

  काही मुलांच्या मनामध्ये शाळा नेहमीप्रमाणे भरायची त्या दिवसांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि घराबाहेर पडून मित्रमंडळींबरोबर अधिक वेळ घालविण्याची, शाळेत जाऊन शिकण्याची वाट ही मुले पाहत आहेत. तसेच शाळा सुरू होत असल्याची ही बातमी आपल्या सर्वांनाच वा-याच्या सुखद झुळकीसारखी वाटत आहे, मात्र त्यामुळे आपण बेफिकीर होऊन चालणार नाही.

  पालक, मुले आणि शाळांनाही वागण्याचे काही प्रमाण नियम म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स (एसओपी) पाळाव्या लागणार आहेत. शाळेतील नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आपल्या मुलांना तयार करणे हे पालकांसमोरचे एक महत्त्वाचे आव्हान असणार आहे.

  खबरदारी घेणे : पालकांना आपल्या मुलांना पुढील काही मुद्दयांविषयी सजग राहणे शिकवावे लागेल

  • मास्क घालणे
  • एका बेंचवर एकच विद्यार्थी
  • तापमान चाचणी
  • सतत सॅनिटाइझिंग करत राहणे
  • समवयीन मुलांच्या कमीत कमी संपर्कात येणे
  • एकमेकांच्या डब्यातील न खाणे तसेच एकत्र बसून डबा न खाणे
  • शाळेचे मर्यादित तास
  • शाळा सुटल्यावर इथेतिथे न भटकणे

  सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन :

  शाळा पूर्ववत सुरू झाल्या तरीही निदान आणखी काही काळ समाजात पूर्वीप्रमाणे मिसळता येणार नाही. मुलामुलांमधील खेळीमेळीचे वातावरण हे शाळेचा सकस अनुभव मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू असल्याने मुलांना एकमेकांमध्ये असे सहज मिसळता येणार नाही. शाळा पुन्हा सुरू होत असल्याचे ऐकून मुलांच्या मनात अशा काही भ्रामक अपेक्षा तयार होऊ नयेत यासाठी शाळेतील नवे वातावरण समजून घेण्यास पालकांनी त्यांची मदत केली पाहिजे.

  हायब्रिड कार्यपद्धती :

  सध्या शाळा कदाचित हायब्रिड कार्यपद्धतीनुसार चालतील जिथे विद्यार्थी आणि शिक्षकांचा कमीत कमी संपर्क यावा यादृष्टीने काही कामे किंवा असाइनेट्स आणि सबमिशन्ससारख्या गोष्टी व्हर्च्युअल पद्धतीने सुरू राहतील.

  मुलांना आरोग्यपूर्ण सवयी लावणे :

  या परिस्थितीमध्ये वैयक्तिक स्वच्छता जपण्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी मुलांची मदत करा. हात व्यवस्थित धुणे, फेसमास्क्स घालणे, मित्रांशी बोलताना सुरक्षित अंतर राखणे इत्यादी गोष्टींचे पालन करून स्वत:ला आणि इतरांनाही सुरक्षित ठेवण्याचे धडे त्यांना शिकवा व तसे करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.

  धीर द्या, आशा जागवा :

  आपण स्वच्छतेचे नियम पाळले आणि आपल्या वर्गातील मुलांनाही ते पाळण्यासाठी प्रोत्साहित केले तर ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही याची खात्री त्यांना द्या. यामुळे मुलांना या आव्हानात्मक काळातून बाहेर पडण्यासाठी मदत मिळेल.

  लसीकरण हा मूलमंत्र :

  लहान मुलांसाठी कोव्हिड-१९ लस लवकरच उपलब्ध होईल. त्यांचे लसीकरण करून घ्या. तोवर त्यांना वेळोवेळी फ्लुचे इंजेक्शन द्या. तसेच पुढच्या काळामध्ये मुलांवर घरच्याघरी लक्ष ठेवणेही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांचा ताप, पल्स रेट, ऑक्सिजनची पातळी आणि लघवीचा रंग या गोष्टींवर घरच्याघरी देखरेख ठेवावी लागेल.

  शाळा आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगली तयारी कशाप्रकारे करता येईल :

  शाळा सुरक्षितरित्या पुन्हा सुरू होण्यामध्ये पाणी आणि स्वच्छतेच्या सोयीसुविधांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. शाळेच्या प्रशासकांनी स्वच्छतेसाठीच्या उपाययोजनांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या जागा शोधायला हव्यात. विशेषत: शिक्षकांनी हात धुणे, खोकण्याशिंकण्याची शिस्त (हाताच्या बाहीमध्ये खोकणे वा शिंकणे), शारीरिक अंतर राखण्यासाठीच्या उपाययोजना, इमारतीची स्वच्छता करण्याचे काम आणि अन्न सुरक्षितरित्या तयार करण्याची पद्धत अशा सर्व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींवर देखरेख ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षकांना शारीरिक अंतर राखण्याचे नियम आणि शाळेच्या स्वच्छतेच्या कार्यपद्धती या विषयांचे प्रशिक्षण दिले पाहिजे. इतकेच नव्हे तर शिक्षकांनी मुलाशीही अधिक धीराने वागले पाहिजे आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्याची वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे.

  या झाल्या काही खबरदारीच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना, पण त्याचबरोबर पालकांनी ही खडतर परिस्थिती पार करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास आपल्या मुलांच्या मनात जागविला पाहिजे. कोव्हिड आधीच्या आपल्या जगण्याच्या पद्धतीकडे घाईघाईने परतणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. नवे आयुष्य पूर्वीसारखेच असेल अशी अपेक्षा ठेवणेही व्यर्थ आहे. राज्य सरकारने शिफारस केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबरोबरच आपण या नव्या परिस्थितीशी किती सहजतेने जुळवून घेऊ शकतो याचेही मूल्यमापन करायला हवे. नवा बदल स्वीकारताना आधीच्या परिस्थितीचा राहून गेलेला ताण काही महिन्यांपर्यंत आपल्या मनात रेंगाळत राहणे अगदी शक्य आहे. तेव्हा शांत रहा, जागरुक रहा आणि आपल्या मुलांना आनंदी व निरोगी ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा.

  (लेखक कन्सल्टन्ट-पीडिॲट्रिशियन, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण येथे कार्यरत आहेत.)