deshmukh khadse danve shinde

सासुरवाडीत ‘जावई’ हा प्राणी अपार कौतुकाचा असला तरीही, रक्तदाब - मधुमेहासारखीच ‘चिंता’ वाढवणाराच असतो. जावई खूपच प्रेम करतात, आमचा तो मुलगाच आहे असे कितीही म्हटले, तरी जावई ही विलक्षण जमात आहे.! नऊ ग्रह राशीला अपुरे ठरतात, म्हणून हा जावई नावाचा दहावा, तोही नेहमी कन्या राशीस असतो. राजकारणात हे दशमस्थान मोठे चमत्कारिक असते. असे समजू की, त्याची सत्ता सासऱ्याच्या धन व कार्यस्थानाजवळ असते.

    गवताच्या गंजीतून सुई शोधण्याइतकी कर्मकठीण गोष्ट कोणती असेल तर – जावईशोध ! हल्ली जावई शोधण्याच्या तंत्रात बदल आला असला तरी, जोडे झिजवणे, नवस-सायास, एखादं व्रत, उपास-तापास आणि हे करता करता मुलीच्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्यांची सर्वत्र सारखी दशा आहे. हे कमी की काय वटपौर्णिमा अथवा हरतालिका असतेच !! म्हणजे, प्रेमविवाह असो की नियोजित, जावई म्हणजे, घरातील मानाचा एक नंबर ! राजकारणात अनेक मोठ्या नेत्यांचे जावई आमदार-खासदार आहेत. काही होते. आणि, ते नेते व त्यांचे जावई आपापल्या राजकारणात माहीर आहेत. सगळेच जावई सासरच्यांना अडचणीत आणणारे नसतात. बरेचदा उलटही असते. अनेकदा राजकीय विचारसरणीमुळे कटुता येते. बरेचदा, आर्थिकबाबतीतही गैरसमज होतात. असेही दिसते की, अनेक जावई आपली राजकीय सासुरवाडी लोकांना सांगत नाहीत. ‘मी बरा आणि माझा संसार बरा…’असे गृहीतक असणारे असतात. काही मोठ्या घराण्यातील जावई वैचारिक लढाई जाहीरपणे लढतात. साधारणपणे साठ- सत्तरच्या दशकात हा प्रकार अधिक होता. त्यातूनच ‘घरजावई’ हा प्रकारही चांगलाच गाजला. त्याच्या नात्यात राजकारणातील त्राग्यातून अनेकदा गुंता झाल्याचेही बघायला मिळते. तो कधी जावयाने सोडवण्याचा प्रयत्न केला तर कधी, सासरा किंवा अख्खी सासुरवाडीच या कामात गुंतल्याचे आढळते. निवडणुकीच्या हंगामात अनेक मतदारसंघात ‘जावयांचे प्रताप’ चर्चेचे ठरतात. अर्थात, जावई प्रतापीचं असतात म्हणा !!

    सासुरवाडीत ‘जावई’ हा प्राणी अपार कौतुकाचा असला तरीही, रक्तदाब – मधुमेहासारखीच ‘चिंता’ वाढवणाराच असतो. जावई खूपच प्रेम करतात, आमचा तो मुलगाच आहे असे कितीही म्हटले, तरी जावई ही विलक्षण जमात आहे.! मुलीचे सुख, तिचे सौभाग्य, तिचा कुटुंबकबिला आणि कुटुंबातील जीव लावणारा गोतावळा म्हणूनही विलक्षण कौतुक असतेच. पण जावईबाप्पूच्या खोड्या काही कमी नसतात. काही दिसतातही सज्जन! पण, त्याचीही भीती असतेच. काही प्रसंगी ऐन मोक्याच्या क्षणी जेव्हा त्यांच्या अंगात येते तेव्हाच्या न संपणाऱ्या कथा ‘तापदायक’ या कौटुंबिक श्रेणीत मोडतात. आणि प्रसंगपरत्वे चर्चेला उधाण आणतात. कदाचित यामुळेच, ‘सदा वक्रा: सदा रुष्ट: सदा पूजाम अपेक्षते। कन्या राशि स्थिति नित्यं जामातो दशमग्रह:।।’असे सुभाषित आहे. याचा अर्थ इतकाच की, नऊ ग्रह राशीला अपुरे ठरतात, म्हणून हा जावई नावाचा दहावा, तोही नेहमी कन्या राशीस असतो. म्हणजेच, ‘जावई हा दशमस्थानातील ग्रह असतो.’ त्याचे वर्णन कुटुंबपरत्वे बदलत जाते. राजकारणात हे दशमस्थान मोठे चमत्कारिक असते. असे समजू की, त्याची सत्ता सासऱ्याच्या धन व कार्यस्थानाजवळ असते.

    डॉ. गौरव चतुर्वेदी
    महाराष्ट्रात कोरोना खालोखाल ज्या विषयाची चर्चा आहे, ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप असलेले प्रकरण. या आठवड्यात या प्रकरणात देशमुखांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांची एन्ट्री विलक्षण नाट्यमय झाली. म्हणजे, एखाद्या रंगमंचावर पाठीला दोर लावून नायक जसा अवतरतो तशी. चौकशीसाठी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. पण ती कारवाई करताना अकस्मात त्यांचे १० जणांनी अपहरण केल्याचा आरोप करणारी धक्क्कादायक बातमी देशमुख यांच्या गोटातून बाहेर आली आणि जावईबापू चर्चेत आले. सीबीआयचा क्लीन चिट देणारा कथित अहवाल लीक केल्याप्रकरणी जावईबाप्पू चौकशीच्या घेऱ्यात आल्याचे बोलले जाते. सीबीआयने देशमुख यांच्या वकिलांना अटक केली; आणि प्रकार खूप रहस्यमय असल्याचे यावरून पुढे येत आहे. अर्थात, देशमुखांच्या या जावईबाप्पूचा रोल यामध्ये किती असेल, हे गुलदस्त्यात असले तरी, डॉ. चतुर्वेदी हे देशमुख यांच्या घरीच राहतात. त्यामुळे ज्या घटना घडामोडी घडत आहेत त्यांची माहिती त्यांना असावी असा तर्क लावला जातो. चतुर्वेदी मूळचे जयपूरचे. ते नाक-कान-घशाचे डॉक्टर आहेत. नागपूरच्या मेडिकल कॉलेजला ते शिकायला आले, आणि देशमुख यांचे जावई झाले. अनिल देशमुख यांची कन्या पूजा ऊर्फ पायल यांचे ते यजमान आहेत. पूजा नेत्रतज्ज्ञ आहेत. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये चतुर्वेदी नोकरी करतात.

    समीर खान
    महाराष्ट्र सरकार सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज रॅकेट प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली. समीर यांच्या घरातून तब्बल २०० किलो गांजा जप्त करण्यात आला. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानी आणि समीर खान यांच्या आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे आढळल्याचा दावा एनसीबीने केला. करण ब्रिटिश नागरिक आहे, तर समीर खान यांची क्रिकेट लीग, फुटबॉल लीग आणि सलूनच्या दुकानांची साखळी आहे. जावयाच्या अटकेनंतर मंत्री नवाब मलिक यांनी,‘कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कोणताही पक्षपात न करता कायद्याने काम केले पाहिजे. कायदा त्याचे काम करेल आणि सत्य लवकर समोर येईल.’ असे म्हटले होते.

     हर्षवर्धन जाधव
    केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव नेहमी चर्चेतच राहिले. हर्षवर्धन हे सनदी अधिकारी व माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले रायभान जाधव याचे पुत्र. ते कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. पराभव, विजय, वाद अगदी टोकाचा संघर्ष करत सासरे भाजपाचे केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष असतानाही हर्षवर्धन सतत वादात राहिले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वेरूळला दौऱ्यावर असताना पोलिसांशी वाद घातल्याने त्यांना मार खावा लागला. पुढे जाधव हे आपल्या कुटुंबातील वादामुळे पुन्हा चर्चेत आले. कौटुंबिक छळप्रकरणी त्यांचाच पत्नीने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यांनतर एका प्रकरणात जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. वाद आणि हर्षवर्धन जाधव हे काही आता नवीन राहिले नाही, आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे त्यांचे नातेही पूर्वीसारखे गोडीगुलाबीचे आहे असे दिसत नाही.

    गिरीश चौधरी
    पुण्यातील भोसरी वादग्रस्त भूखंड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना अटक केली. २०१६ मध्ये खडसे हे राज्याचे महसूलमंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. खडसे यांनी तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला, असा आरोप आहे. या प्रकरणात नाव येण्यापूर्वी चौधरी फार चर्चेत नसायचे.

     राज श्रॉफ
    दिवाळखोरीत निघालेल्या दिवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (एचडीएफएल ) प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवानसंबंधत असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची कमर्शियल संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अंधेरी पूर्व येथील कालेडोनिया बिल्डिंग येथील ही संपत्ती आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकने दिवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडला दिलेल्या ३६८८.५८ कोटी रुपयांचे कर्ज फ्रॉड घोषित केले. राज श्रॉफ यांनी आमदारकीची स्वप्ने पाहिली. मलबारहील मतदारसंघ निवडला. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री आपले सासरे असल्याने निवडून येऊ असे त्यांना वाटत असावे. पण, जुळून आले नाही.

    वादळी जावई
    पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे जावई फिरोज यांनी नेहरू यांच्याविरुद्ध मुन्ध्रा प्रकरणात १९५७ साली आघाडी उघडली. यानंतर तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णमचारी यांना राजीनामा द्यावा लागला होता.दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची मानसकन्या नमिता हिचे यजमान रंजन भट्टाचार्य हे वाजपेयींचे ओएसडी होते. त्यांनी पंतप्रधान कार्यालयात धूम केली होती. ते काही प्रकरणात वादग्रत ठरले. बंगाली बाबू , बापजी ते सरकारी दामाद असा त्यांचा राजकारणातील प्रवास राहिला.

    द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचे जावई व कनिमोळी यांचे पती अरविंदम यांनी मांडलेला उच्छाद म्हणजे दक्षिणेतील राजकारणाचे भयानक पर्व मानले जाते.काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांकाचे पती रॉबर्ट वाड्रा हे कायमच वादग्रस्त ठरले. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे जावई देवेंद्रकुमार हेसुद्धा चर्चेत आले होते.

    लाडके जावई
    वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड शहर म्हणजे, ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गावातील द्रव्य (सोने, पैसा) नेवून स्वराज्यासाठी वापर केला, अशी ख्याती आहे. हे शहर त्याकाळी खूप श्रीमंत होते, असा त्याचा अर्थ आहे. स्वराज्यासाठी कारंजा लुटले होते, असेही दाखले आहेत. सध्या येथील तीन जावई राज्याच्या विविध भागातून विद्यमान आमदार आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (अंबेगाव शिरुर), आमदार हरीश पिंपळे (मूर्तिजापूर), राम सातपुते (माळशिरस) हे आमदार कारंजाचे जावई आहेत. विशेष म्हणजे, तिघेही कारंजाचे लाडके जावई आहेत.

    – raghunath.pande@navabharatmedia.com