भेटीलागी जीवा लागलीसे आस

आषाढी एकादशी म्हटले की, आपल्याला माहीत असते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी . हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो . महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात.

  अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेवर देशातच नाही तर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरू आहे. यादिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. इतके दिवस ज्या विठ्ठलासाठी चालत आलो तो अखेर भेटल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात. शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करून मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात.

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीवर बंदी असली तरी वारकऱ्यांचा उत्साह मात्र तोच आहेत. मानाच्या पालख्या व मर्यादित वारकरी यांसह विठ्ठलाची यथोचित पूजाअर्चना करून वर्षांनुवर्षांची परंपरा कायम राखली जाणार आहे. हे सगळे असले तरीही या एकादशीचे नेमके महत्त्व काय आहे ते समजून घ्यायला हवे. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते.

  दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला “देवशयनी” (देवांच्या निद्रेची) एकादशी असे म्हणतात. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.

  या दिवशी रोजच्या पूजेबरोबरच श्रीविष्णूची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास मनोभावे पूजा केली जाते. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्‍वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्‍वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

  आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करून वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते.

  महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला-म्हणजेच आषाढ शुध्द एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात.

  या दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पाळखीही सासवड येथून निघून पंढरपूरकडे रवाना होते. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचलेला हा सांस्कृतिक वारसा आहे.

  Ashadhi Ekadashi 2021 bheti lagi jiva laglise aas