‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी’

वारी ही वारकऱ्याची साधना आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे या साधनेत व्यत्यय निर्माण झाला असला, तरी ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थ,व्रत’ हा वारकऱ्याचा निश्चय कायम आहे. दु:खनाश, संतसंगती, पारलौकिक सुख आणि धर्म या चार गोष्टींसाठी वारी महत्त्वाची मानली जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा वारीविषयीचा खास लेख.

    आषाढ शुद्ध एकादशी(Ashadhi Ekadashi 2021) जसजशी जवळ येते, तसतशी प्रत्येक वारकऱ्याच्या अंत:करणात भगवान पांडुरंग परमात्म्याला भेटण्याची ओढ लागून राहते. मग ‘संपदा सोहळा नावडे मजला, लागला लळा पंढरीचा’, अशी अवस्था होते. गेली दोन वर्षे जगावर ओढावलेल्या कोरोना(Corona) महामारीमुळे पंढरीची वारी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.

    कदाचित त्यांच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असेल ही, कारण ते भौतिक दृष्टीने याकडे पाहतात. पण वारकऱ्याची अवस्था ‘जीवनाविना मासोळी, तैसा तुका तळमळी’ अशी झालेली आहे. आपल्या प्राणप्रिय पंढरीरायाच्या दर्शनाविना त्यांना अन्न गोड लागेना की संसारात मन रमेना.

    वारी(Wari) ही वारकऱ्याची साधना आहे. ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थ,व्रत’ हा वारकऱ्याचा निश्चय आहे. एवढेच काय, देवाकडे मागतानासुद्धा, ‘पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी’ हेच मागणे आहे. भगवान परमात्माही नामदेवरायांना हेच सांगतात ‘आषाढी, कार्तिकी विसरु नका मज, सांगतसे गुज पांडुरंग’, त्यामुळे वारकऱ्यांची मुख्य साधना असणारी वारी बंद झाल्यामुळे वारकरी तळमळत आहेत. तसाच देवदेखील भक्तांच्या भेटीकरिता तळमळत असेल. काही मंडळी प्रवास करत आतल्या गावांतून पंढरपूरला पोहचण्याचा प्रयत्नही करीत आहेत, पण वारीचा मुख्य हेतू संतसमागम तो साध्य होत नाही. हा हेतू साध्य करायचा असेल तर संत संगतीत वारी घडायला हवी.

    पंढरीसारख्या क्षेत्राचा महिमा तुकोबारायादी अनेक संतांनी अभंगातून सांगितला आहे. पंढरी क्षेत्राची वारी सामान्यांकडून घडावी, हा या मागचा हेतू आहे. पंढरीसारखं क्षेत्र वेगळं आणि एखादं सामान्य गाव वेगळं. सर्वसामान्य स्थूल दृष्टीने पाहिले असता, या क्षेत्राचा महिमा आपल्याला कळणार नाही. ज्या वस्तूचं महात्म्य जाणण्यासाठी जी दृष्टी आवश्यक असते, ती दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय त्या वस्तूचं महात्म्य दिसत नाही.

    या भूमंडळावर असणाऱ्या सर्वच तीर्थांच्या बाबतीत आधुनिक विचारवंतांची फारक विकृत मते आपणास ऐकावयास मिळतात. हे लोक म्हणतात, ‘ तुमच्या  इतिहासकारांनी, साधुसंतांनी अत्यंत धूर्तपणे, विनाकारण काही गावांचे, काही नद्यांचे, काही पर्वतांचे महत्त्व वाढवून ठेवले आहे. इतर गावांप्रमाणेच काढी, पंढरीसारखी गावे आहेत. इतर नद्यांप्रमाणेच गंगा, चंद्रभागा नद्या आहेत. इतर पर्वतांप्रमाणेच हिमालय, ब्रह्मगिरी पर्वत आहेत. मग पंढरी, काशी, गंगा, चंद्रभागा, इंद्रायणी, हिमालय यांनाच महत्त्व का ? उलट स्वच्छता, टापटीप, सौंदर्य, ऐहिक सुखसाधनांची रेलचेल, स्वभावता व कृत्रिमरित्या निर्माण झालेली प्रेक्षणीयता इ. दृष्टींनी पाहता पॅरिस, रोमसारखी कितीतरी समृद्ध शहरे जगाच्या पाठीवर असताना तुम्ही याच गावांचे महत्त्व सांगता, गोडवे गाता हे अयोग्य आहे. योग्य नाही.’
    हे त्यांचे म्हणणे सकृतदर्शनी तर्कसंगत वाटणारे असले तरी योग्य विचारांती पटणारे नाही. भारतीय संस्कृतीच्या जिव्हाळ्याचा अभाव आणि भारतीय संस्कृतीचा संदर्भ पाश्चात्य संस्कृतीत बसवण्याची करंटी सवय, या दोन कारणांमुळे ही मंडळी असा विचार मांडताना दिसतात.

    प्रत्येक संस्कृती संदर्भाचे मूळतत्व पाहण्यासाठी वेगळी, स्वतंत्र शास्त्रदृष्टी आवश्यक असते. त्या वैशिष्ठ्यांकडे पाहाण्यासाठी लागणाऱ्या दृष्टीवाचून, ते ते वैशिष्ठ्य दृष्टीसमोर येणार नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर अर्जुनाने विश्वरुप दाखव अशा प्रार्थनेनंतर भगवंताने ते दाखवले, पण दिव्यदृष्टीविना अर्जुनाला ते दिसेना. तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली आणि त्यानंतर त्याला परमात्म्याच्या विश्वरुपाचे दर्शन घडविले. या अर्जुनाच्या दृष्टांतावरुन, विशिष्ठ दृष्टीवाचून वैशिष्ठ्ये दिसत नसतात, हे कळते.

    श्री निळोबाराय एका गवळणीमध्ये, संतांनी भगवत दर्शन घडण्यासाठी अनुकुल दृष्टी प्राप्त होण्यासाठी, बुद्धीचा मळ घालविला असे वर्णन केले आहे.

    ‘धन्य हे आनंदाची सापडली वेळ, तेणे संतसज्जन भेटले कृपाळू
    त्यांनी फेडियेला बुद्धिचा तो मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ वो’

    असा बुद्धीला जडलेला द्वैताचा मळ गेल्यावाचून परमात्मादर्शन घडणे शक्य नाही. तो मळ जाण्याकरिता संतसंगत, आणि संतसंगत घडावी म्हणून वारी.असं पंढरीसारखं तीर्थक्षेत्र, या तीर्थाची यात्रा करणे हा महत्त्वाचा धर्म आहे, असं संतांनी सांगितलंय, कारण तीर्थक्षेत्राला शास्त्रात धर्माचे स्थान आहे. धर्माचा आचार ही बाब अत्यंत महत्त्वाची म्हणून शास्त्रकारांनी मान्य केली आहे.

    ‘सुखार्था: सर्वभूतानां मता: सर्वा: प्रवृत्तय
    सुखंतु न विना धर्मात तस्मात धर्मचरोभवेत’

    सुखप्राप्तीसाठी धर्माचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. धर्माचरणाविना सुख मिळणे शक्य् नाही, हे आयुर्वेदासारख्या भौतिक शास्त्रानेही मान्य केले आहे. मग धर्म म्हणजे काय?

    ‘अथ को धर्म: किंतस्य लक्षणं इतिचेदुच्यते’

    या धर्माचे दोन प्रकार आहेत, पहिला साधारण धर्म आणि दुसरा विशेष धर्म. सर्व जनांना पाळता येईल असा जो धर्म आहे, त्याला साधारण धर्म असे म्हणतात. एखाद्या विशिष्ट अधिकारी व्यक्तिलाच त्याच्या अधिकारानुसार पाळता येईल असा जो धर्म आहे त्याला विशेष धर्म असे म्हणतात.

    तीर्थयात्रा हा साधारण धर्म आहे. त्यामुळे विशिष्ट व्यक्तीनेच तीर्थयात्रा करावी, असे सांगितलेले आपणास कुठे पहावयास मिळणार नाही. तो कोणत्याही वर्णाचा, कोणत्याही आश्रमाचा असो, कोणत्याही निमित्ताने प्रवृत्त झालेला असला तरी त्यावे तीर्थयात्रा या धर्माचे आचरण करावे.

    पंढरीची वारी हा आपल्यासाठी शास्त्रांनी, संतांनी साधारण धर्म सांगितला आहे. कोणत्याही कारणाने का होईना, ही पंढरीची वारी सामान्यांकडून व्हावी, म्हणून या वारीचं महत्त्व संतांनी अनेक प्रकारांनी संगितलेले आहे.

    कधी ते पंढरीचं महत्त्व सांगतात, कधी ते चंद्रभागेचं महत्त्व सांगतात, कधी ते पुंडलिकरायाचं, तर कधी पंढरीनाथाचं महत्त्व सांगून जनांनी वारीला प्रवृत्त व्हावं , यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पंढरीचं महत्त्व संत सांगतात.

    मनुष्याला कोणत्याही कार्यात प्रवृत्त होण्यासाठी शास्त्राने चार हेतू सांगितलेत. ‘दु:खनाश:, सुखप्राप्ती:, ऐहिकी पारलौकिकी, स्वधर्माधीश्च चत्वारौ कर्मेच्छा हेतवोभता:’

    दु:खनाश, इहलोकीचे सुख, पारलौकिक सुख आणि आपला धर्म या चार हेतूने मनुष्य कोणत्याही कार्यास प्रवृत्त होतो.

    पंढरीची वारी केल्याने दु:खनाश होतो, सगळ्या दु:खाचे मूळ असलेलं पाप पंढरीवारीत लयास पावते. पंढरीच्या वारीने इहलोकीचे आणि आध्यात्मिक सुखप्राप्ती होते. यथायोग्य प्दधीतने पंढरीची वारी केली तर जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. पंढरीच्या वारीत भक्तीसुखाचा आनंद ओतप्रोत मिळतो, या दृष्टीने विचार करता ऐहिक सुख प्राप्त होते. पंढरीच्या वारकऱ्याला वैकुंठप्राप्ती होते, म्हणजे पारलौकिक सुख मिळते. पंढरीची वारी करणे म्हणजे स्वधर्माचरणही आहेच.

    हे चारही हेतू पंढरीच्या वारीने सहजसाध्य होतात. संतांनी सगळ्यांना वारीची शिकवण दिली आहे.

    ‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी’, अशी पंढरीची आषाढी वारी चुकल्याचं दु:ख लाखो वारकऱ्यांच्या मनात आहे, तेव्हा पंढरीनाथा आता तूच कृपा कर आणि आम्हा लेकरांची वारी पूर्ववत सुरु कर. एवढीच पंढरी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना.

    – ह. भ. प. अजित महाराज गद्रे
    ajitumeshgadre@gmail.com