तिसऱ्या लाटेपासून सावधान

ऑक्टोबर अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी यासारख्या गर्दीच्या सणांत काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेत्यांच्या नियमपालनाबाबतीत कुचराईमुळे तिसरी लाट वेगाने वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या ढिलाईने आणि लसीकरणाच्या अभावामुळे तिची व्याप्ती खूप जास्त असेल. कदाचित दुसऱ्या लाटेपेक्षा ती दीर्घकाळ टिकेल आणि उपचारांबाबतच्या सरकारी उदासीनतेमुळे मृत्यूदर पुन्हा एकदा वाढण्याची भीती आहे.

  -डॉ. अविनाश भोंडवे

  माजी अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र राज्य

  भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रश्न एवढाच आहे की ती कधी येईल? कितपत व्यापक असेल? किती दिवस टिकेल? आणि किती संहारक असेल?. समुद्रकिनारी आपण उभे राहिलो असता, एका मागून एक अशा लाटा सतत येताना दिसतात. विषाणूंच्या विश्वव्यापी महासाथींमध्ये नेमके हेच होत असते, लाटांमागून लाटा येत राहतात. जेव्हा विषाणूचा नव्याने उद्रेक होतो, त्या आजाराची साथ जेंव्हा भौगोलिक सीमांच्या पलीकडे सर्वदूर पसरते आणि मोठ्या प्रमाणावर लोक बाधित होऊ लागतात, त्याला पहिली लाट म्हणतात.

  आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने कोरोनाची पहिली लाट ९ मार्च २०२०ला सुरु झाली, ११ सप्टेंबर २०२० रोजी एका दिवसात २४ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आणि पहिल्या लाटेचा परमोच्च बिंदू गाठला गेला. त्यानंतर रुग्णसंख्या कमी कमी होत जानेवारी २०२१ अखेर दिवसाला १८०० रुग्णांची नोंद होऊ लागली. पण या लाटेत महाराष्ट्रात सुमारे ४९००० माणसे दगावली. लोकांना वाटले की लाट संपली. पुन्हा सर्वत्र गर्दी सुरु झाली, नवा डेल्टा व्हेरियंट विषाणू आला आणि बघता बघता दुसरी लाट एखाद्या सुनामीसारखी पसरली. फेब्रुवारी २०२१ पासून रुग्णसंख्या एवढी वाढू लागली की पहिल्या लाटेचा एका दिवसातल्या २३००० रुग्णांचा परमोच्च बिंदू या दुसऱ्या लाटेत १५ मार्चलाच ओलांडला गेला. १७ एप्रिल २०२१ रोजी एका दिवसात ६८,६३१ रुग्णांची नोंद झाली. मे महिन्यापासून हळूहळू रुग्णसंख्या कमी होऊ लाली आणि जुलैच्या अखेरीस ४ हजारांच्या घरात गेली. पण गेले सव्वा महिना ती ४ ते ५ हजारांच्या घरात घुटमळत आहे. आजवर दोन्ही लाटांत महाराष्ट्रामध्ये १ लाख ३८ हजार नागरिकांनी आजवर प्राण गमावले आहेत.

  ही दुसरी लाट संपायला आणखीन कदाचित महिना ते दीड महिना लागेल. त्यामुळे तिसरी लाट ऑक्टोबरच्या मध्यावर सुरु होईल असा पक्का अंदाज आहे.

  लाट येण्याची पूर्वपीठिका

  कोणत्याही विषाणूच्या महामारीत नवी लाट येण्यापूर्वी काही अंतस्थ आणि काही बाह्य कारणे दिसून येतात.

  १. आधीची लाट ओसरत जाणे पण पूर्ण नाहीशी न होणे- आजमितीला महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. दुसरी लाट कमी होत चालली आहे. पण कोरोना बाधितांची संख्या रोज ४ ते ५ हजाराने वाढतेच आहे. त्यामुळे काही काळाने तिसरी लाट येणार हे नक्कीच.

  २. विषाणूचा नवा प्रकार- महाराष्ट्रात पहिल्या लाटेला मूळचा सार्स-कोव्ही-२ हा विषाणू कारणीभूत होता. दुसऱ्या लाटेसाठी त्याचा नवा प्रकार ‘बी.१.६१७.२’ म्हणजेच डेल्टा व्हेरियंट. हा डेल्टा जगात प्रथम महाराष्ट्रात अमरावतीमध्ये मिळाला. आणि आता या डेल्टामध्येही म्युटेशन होऊन तयार झालेला डेल्टा प्लस. एवाय.१, एवाय.२ आणि एवाय.३ असे त्याचे तीन उपप्रकारही सापडलेत. आणि नुकत्याच झालेल्या नमुना चाचण्यांमध्ये हा विषाणू महाराष्ट्रासह १२ राज्यात सापडलाय आणि महाराष्ट्रातल्या १०-१२ जिल्ह्यात याच्या जून २०२१ पर्यंत ६५ केसेस सापडल्यात. हा डेल्टा प्लस आता कदाचित कमी प्रमाणत असेल, पण काही दिवसात त्याचा प्रादुर्भाव वाढणार हे निश्चितच. आणि हा डेल्टा प्लसच महाराष्ट्रात तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरेल. आणि तो लसींना दाद देत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढणार. परमोच्च बिंदूला दिवसाला एक ते दीड लाखांपर्यंत रुग्णसंख्या वाढणार अशी चिन्हे दिसतायत.

  ३. करोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली- सध्या लॉकडाऊन पुन्हा शिथिल झालेय. रस्त्यावर, बाजारात, दुकानात, हॉटेल्समध्ये सर्वत्र कमालीची गर्दी होतेय. त्यात राजकीय पक्षांची आंदोलने, रॅलीज, सार्वजनिक समारंभांची रेलचेल, नियमानुसार केवळ ५० जणांच्या उपस्थितीत करायचे असतात पण प्रत्यक्षात हजारोच्या संख्येत होणारे लग्न समारंभ याची सगळीकडे धूमधाम आहे. लोकल ट्रेन्स सुरु झाल्यात, प्रवासी बसेस आणि इतर मार्गाने लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करतायत. यामध्ये कुठेही सामाजिक अंतर ठेवण्याचे भान कुणालाही नाही. मास्क वापरणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. हात धुणे म्हणजे काय? हे बहुतेक जण आता सोयीस्करपणे विसरले आहेत. बंदी असूनही दहीहंडी बंडखोरपणे साजरी झाली.  त्यात आता गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी हे सर्व गर्दीचे सण येऊ घातलेत.

  पंढरपूरची वारी, दहीहंडी, गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करण्यावर सरकारने निर्बंध लादले आहेत. मंदिरांमध्ये, धार्मिक स्थळांवर गर्दी होऊ शकते, म्हणून ती अजूनही खुली केलेली नाहीत. यामध्ये गर्दीने कोरोनाचा प्रसार होतो हेच खरे कारण आहे. पण केवळ हिंदूंच्याच सणांवर बंदी घातली जाते, या अभिनिवेशाने याला राजकीय क्षेत्रातून विरोध होतो आहे. दहीहंडीप्रमाणे गणेश विसर्जनाच्या मिरवणुका बंदी असूनही काढल्या गेल्या तर कोरोना पसरणार हे नक्की.

  याबाबत काही महत्वाच्या गोष्टी अधोरेखित कराव्याशा वाटतात-

  • धार्मिक सणांवर बंदी नाही, त्यांच्या उत्सवांवर बंदी आहे. कारण गणपतीसारखा सण हा वैयक्तिक असतो,गणेशोत्सव हा सार्वजनिक असतो. घरच्या गणपतीत कोरोना प्रतिबंधक उपायांचे उल्लंघन होत नाही, पण उत्सवात ते होते. सार्वजनिक उत्सवांना एक राजकीय रंग आलेला आहे. आणि त्यामुळेच त्याला राजकीय पद्धतीने विरोध होतो आहे. हे सार्वजनिक उत्सव आणि त्या निमित्ताने त्या काळात होणारी खरेदीची अफाट गर्दी यामुळे कोरोणाचा संसर्ग वाढणार आणि तिसऱ्या लाटेला अनुकूल बैठक टायर होणार.
  • राजकीय पक्ष – आज सर्व राजकीय पक्षांकडून कोरोनाच्या प्रतिबंधक उपायांची पायमल्ली होते आहे. कोरोनाची महामारी ही अखिल मानवजातीवर ओढवलेली आपत्ती आहे. त्याचा सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे मुकाबला करायला हवा.

  “लोकांवर निर्बंध टाकण्यासाठी महाराष्ट्र सरकार तिसरी लाट येणार म्हणून गवगवा करते आहे”.

  “सर्व सामान्यांसाठी कठोर नियम आणि दंडात्मक कारवाई आणि सरकार पक्षाच्या नेत्यांसाठी ते नियम लागू केले जात नाहीत.”

  “सरकार सतत लॉकडाऊन करते आहे, त्यामुळे धंदे बुडाले आणि लोकांची उपासमार होते आहे. त्यामुळे आम्ही लॉकडाऊन असला तरी दुकाने उघडणारच.”

  “मदिरालये सुरु मग मंदिरे का बंद?”

  राजकीय नेत्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे जनतेमध्ये चुकीचे संदेश जातायत. सरकार कोरोनाचे भय उगाचच दाखवते आहे असे बहुसंख्य जनतेचे मत होऊ लागले आहे. त्यामुळे प्रतिबंधक उपायांची सर्रास पायमल्ली होऊ लागली आहे. आणि सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांकडूनही प्रतिबंधक नियम न पाळण्याच्या घटना घडत असल्याने लोकांचा हा समज पक्का होत चाललेला आहे.

  ४. प्रशासकीय चालढकल- कोरोनाच्या नियंत्रणाचे तत्व आहे, टेस्टिंग, आयसोलेटिंग आणि ट्रीटिंग. या तिन्ही बाबतीत खूप आंधळा कारभार आहे.

  टेस्टिंग- कोरोनाच्या सुरुवातीपासून आजपावेतो टेस्टिंग पुरेसे होत नाही. साधारणतः एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तर त्याचा २० पट टेस्टिंग व्हायला हवे. पण महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये ते २ पटीपेक्षा जास्त नसते. मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरांमध्ये जिथे दोन्ही लाटांच्या काळात हाहाःकार माजला होता, त्यावेळेसही जेमतेम ५ ते ८  पटीने चाचण्या होत होत्या. मे २०२१पासून तर हे प्रमाण आणखीनच घसरले आहे.

  कॉन्टॅक्ट ट्रेसिंग- एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर तो गेल्या ५ दिवसात ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला असेल त्यांचा मागोवा घेऊन त्यांचे टेस्टिंग करणे म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. पण दोन्ही लाटात या तत्वाचे पालन अखिल महाराष्ट्रात पुरेसे होत नाही. पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील व्यक्तींना तरी टेस्टिंग करून घेणे भाग पडले पाहिजे, पण या बाबतीत सर्वत्र पूर्ण अंधार आहे.

  ट्रीटमेंट- तिसरी लाट मोठी असेल असा अंदाज सरकार वरवत आहे, पण रुग्णांसाठी लागणारे आवश्यक बेड्स उपलब्ध करण्यासाठी तजवीज केली जात नाहीये. मागच्या दोन्ही लाटेत एकतर खाजगी हॉस्पिटल्सना वेठीस धरून, त्यांच्या ८० टक्के जागा अधिग्रहित करून आणि त्यांना सरकारच्या मनाप्रमाणे, अत्यंत अल्प तसेच न परवडणाऱ्या दरात रुग्णसेवा करायला लावून, बेड्सची संख्या फुगवलेली दाखवली. नाहीतर जम्बो कोव्हिड सेंटरसारखे ‘तात्पुरते हॉस्पिटल’ उभे करून एक अकार्यक्षम सुविधा केवळ शोभेपुरती उभी केली.

  याकरिता सरकारने नव्याने सरकारी इस्पितळे मोठ्या प्रमाणात सुरु करायला हवी होती. विशेषतः ग्रामीण भागात सुसज्ज हॉस्पिटल्सच्या अभावाने असंख्य रुग्णांचे अतोनात हाल झाले होते. शहरात आणि ग्रामीण भागात जी सरकारी रुग्णालये आहेत, तेथील बेड्स वाढवणे, सरकारी डॉक्टरांची, नर्सेसची, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, अत्यावश्यक औषधांचा साठा आणि नियमित पुरवठा वाढवणे अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे होते. पण त्याकडे पुन्हा एकदा कानाडोळा केलेला दिसतो आहे..

  दोन्ही लाटांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अगणित रुग्णांचा मृत्यू झाला. पण केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने याबाबत कानावर हात ठेवले. याही वेळेस आपल्यावरची जबाबदारी खाजगी हॉस्पिटल्सवर ढकलण्याच्या उद्देशाने त्यांनाच ऑक्सिजन प्लांट्स उभे करण्याची सक्ती केली जात आहे.

  या सगळ्या चालढकलीचा परिणाम तिसऱ्या लाटेत पुन्हा हॉस्पिटलमध्ये बेड्स, औषधे आणि ऑक्सिजन पुरवठा पुरेसा नसणे हे प्रश्न आ वासून उभे राहणार आणि त्याचा परिणाम मृत्यूदर वाढण्यात होणार.

  ५. मंदावलेले लसीकरण- १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेपैकी ४ कोटी ३० लाख लोकांचा म्हणजे साधारणतः ३३ टक्के जनतेचा १ डोस झालाय, तर केवळ एक कोटी साठ लाख नागरिकांचे म्हणजे १२.३ टक्के लोकांचे दोन्ही डोस झालेले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ज्यांचे अजिबात लसीकरण झालेले नाही अशांना मोठा प्रमाणत लागण होण्याची शक्यता आहे. साहजिकच किमान ८ कोटी नागरिकांपैकी अनेक जण या लाटेत संक्रमित होण्याची शक्यता आहे. यात तीन कोटी १८ वर्षाखालील लहान मुले आहेत. त्यांच्याकरीता अजूनही लसीकरण उपलब्ध नसल्याने त्यांची या लाटेत मोठीच परवड होणार आहे.

  थोडक्यात सांगायचे झाले तर, ऑक्टोबर अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येणार, सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेत्यांच्या नियमपालनाबाबतीत कुचराईमुळे ती वेगाने वाढण्याची शक्यता आहे, प्रशासनाच्या ढिलाईने आणि लसीकरणाच्या अभावामुळे तिची व्याप्ती खूप जास्त असेल. कदाचित दुसऱ्या लाटेपेक्षा ती दीर्घकाळ टिकेल आणि उपचारांबाबतच्या सरकारी उदासीनतेमुळे त्यात मृत्यूदर पुन्हा एकदा वाढण्याची भीती आहे.