वादविवाद, संताप अंगावर घेऊनही न डगमगता धाडसी निर्णय करणारे शरदराव!!

आता २०२४ ला काय होईल याच्या अटकळी बांधल्या जात असताना काँग्रेसचे (Congress) कमी झालेले महत्व पाहून भाजपा (BJP) विरोधात प्रादेशिक पक्षांची निराळी फळी उभी करण्याचे डावपेच शरद पवार (Sharad Pawar) आखात आहेत. त्यांच्या त्या प्रयत्नांना यश येईल की नाही हे काळच सांगू शकेल. पण प्रकृतीच्या इतक्या तक्रारी व जिवावरच्या दुखण्यांवर दोनदा तीनदा मात करूनही हा जिद्दी म्हातारा आणखी एकदा सिंहगड सर करायला घोरपड बांधून सज्ज होतो आहे! त्यांच्या या जिद्दीला आणि उमेदीला सलाम केल्याशिवाय राहवत नाही....!!

    शरद पवारांनी (Sharad Pawar) एकाच वेळी लाखो तरुणांना प्रेमाचे आनंदाचे भरते दिले, तर त्याच वेळी तितक्याच मोठ्या प्रमाणात द्वेषाच्या ज्वाळाही चेतवल्या. हे त्यांनी मुद्दाम ठरवून घडवले, असे मुळीच नाही. शरद पवार त्यांच्या आयुष्याच्या धेय्याकडे लक्ष ठेवून वाटचाल करत राहिले. कुणी कितीही विरोध केला तरी ते थांबले नाहीत, त्यांनी सहकाऱ्यांनाही सातत्याने पुढे स्वतःसोबत नेले. ते विरोधकांची पर्वा न करता चालत राहिले. समजाच्या व राज्याच्या हिताचा निर्णय (Decision In The Interest Of The State) घेताना त्याला विरोध होईल म्हणून ते बिचकले नाहीत, वा त्यांनी निर्णयात बदलही केले नाहीत.

    आयुष्यात जेव्हा एक हजार पौर्णिमा बघून होतात त्याला सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा असे म्हणतात. वयाची ८१ वर्षे पूर्ण करणाऱ्या कोणालाही उभ्या आयुष्यात तितक्या चंद्रांचे दर्शन झालेलेच असते. पण ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या आयुष्याचा आढावा या वयाच्या महत्वाच्या टप्प्यावर घ्यायचा तर त्यांनी टीकेचे दशसहस्त्र चंद्रही बघितले, पचवले आणि पराक्रमाच्या तेजाचेही तितकेच रवी अनुभवले असे म्हणता येईल.

    महाराष्ट्रात आपण सारेच राजकारण या विषयात प्रचंड गती आणि मोठा रस रुची असणारे आहोत. कोणत्याही नाक्यावर, बसची वाट पाहताना, वा चहाच्या टपरीभोवती घोटाळताना अथवा जेवणाच्या टेबलावर हात सुकेपर्यंत गप्पा हाणत राहताना एकच विषय असतो व तो म्हणजे राजकारण . अशा चर्चांमध्ये शरद पवारांचे नाव निघताच हमखाक दोन तट पडतात. एकाकडे पवरांविषयी टोकाची वाईट मते असतात तर दुसरा गट पवारांच्या चांगल्या बाजू माडंण्याच्या प्रयत्नात असतो. पण शरद पवारांचे राजकारण इतके परिणामकारक राहिले आहे की त्यांच्या टीकाकारांच्या संतापाचा पारा कमीच होत नाही. इंग्रजीत म्हणताता ना की तुम्ही त्याच्यावर प्रेम करता वा त्याचा द्वेष करता, पण त्याला टाळून वा नाकारून तुम्ही पुढे जाऊच शकणार नाही, तसे सध्याच्या राजाकारणातील देशस्तरावरचे एक व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार.

    शरद पवारांनी एकाच वेळी लाखो तरुणांना प्रेमाचे आनंदाचे भरते दिले, तर त्याच वेळी तितक्याच मोठ्या प्रमाणात द्वेषाच्या ज्वाळाही चेतवल्या. हे त्यांनी मुद्दाम ठरवून घडवले, असे मुळीच नाही. शरद पवार त्यांच्या आयुष्याच्या धेय्याकडे लक्ष ठेवून वाटचाल करत राहिले. कुणी कितीही विरोध केला तरी ते थांबले नाहीत, त्यांनी सहकाऱ्यांनाही सातत्याने पुढे स्वतःसोबत नेले. ते विरोधकांची पर्वा न करता चालत राहिले. समजाच्या व राज्याच्या हिताचा निर्णय घेताना त्याला विरोध होईल म्हणून ते बिचकले नाहीत, वा त्यांनी निर्णयात बदलही केले नाहीत.

    सध्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर प्रेम करणाऱ्यांनाही मोठा राजकीय आवाज लाभलेला आहे. एकेकाळी सावरकर भक्त हे राजकारणाच्या एका कोपऱ्यात नांदत होते. त्या जुन्या काळातही स्वा. सावरकरांच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती करणारे शरदरावांचे एक जुने भाषण सध्या अनेकदा सांगितले व ऐकवले जाते. तो काळ बहुधा पुलोद सरकारचा होता. महाराष्ट्रात शरद पवारांनी तो एक नवाच आणि तत्कालीन अनेकांना धक्कादायक वाटलेला, कित्येकांची झोप उडवणारा असा प्रयोग केला होता. पुरोगामी लोकशाही आघाडी या नावाने त्यांनी एक राजकीय फळी उभी केली होती व सत्ता हाती घेतली होती. तोवर शरद पवार हे महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या राजकारणात एक मोठे नाव होते, पण पक्षातील ज्येष्ठतम मराठी नेते यशवंतराव चव्हाण यांचा वैचारिक वारसा पुढे नेणारा एक तरूण मंत्री इतकेच त्यांचे महत्व होते.

    पुलोदच्या प्रयोगानंतर शरद पवारांचे नाव देशात सर्वत्र ऐकू येऊ लागले. चव्हाण-रेड्डी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे भक्कम बहुमताचे राज्यातील सरकार उलथून टाकून ते मुख्यमंत्री बनले होते. देशातील सर्वात तरूण मुख्यमंत्री हे बिरुद तेव्हा त्यांनी मिरवले. त्यांच्या नंतर देशतील तरूण मुख्यमंत्री हा मान थेट चंद्राबाबू नायडूंना तीस वर्षांनंतर मिळाला. तोवर राजकीय इतिहासात सर्वाधिक कमी वयात राज्याचे सर्वोच्चपद हस्तगत करणारे नेते शरदरावच होते.

    विद्यमान राजकीय व्यवस्थेची सारी घडी विस्कटून एक नवीन व्यवस्था उभी कऱण्यासाठी जे धाडस लागते, जी चतुराई लागते ती सारी शरद पवारांनी तेंव्हा दाखवली. १९७८ च्या जुलैमध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार पवारांनी पाडले, त्या वेळी दादांनी त्या घटनेचे वर्णन, “शरदने माझ्या पाठीत खंजीर खुपसला…” असे जरी केले होते तरी नंतर तेच दादा पवारांच्या पाठीशी उभे राहिले होते. शंकरराव चव्हाणांना बदलून शरदरावंना मुख्यमंत्री करा असा आग्रह राजीव गांधींकडे धरणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये दादांचाही समावेश होता.

    पुलोदचा तो प्रयोग का व कसा घडला याचे उत्तर दादांचे ते सरकार ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडेंनी हायजॅक करावे तशा पद्धतीने ताब्यात घेतले होते, त्यात शोधावे लागेल. तिरपुडे हे जनता लाटेतली महाराष्ट्रात इंदिरा गांधींच्या नावे ६२ आमदार निवडून आणणाऱ्या काँग्रेस आयचे राज्यातली प्रमुख नेते होते. तर यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वात जुन्या काँग्रेसचा डोलारा सावरणारे राज्यातील महत्वाचे नेते वसंततदादा पाटील होते. त्यांच्या पाटी ६९ आमदार होते. त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व गृहमंत्री तिरपुडे यांचे वागणे बोलणे, त्यांचा सहकारावर असणारा आकस, त्यांचे जुन्या काँग्रेसवाल्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न, यशवंतरावांना व त्यांना मानणाऱ्या काँग्रेस नेत्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा निर्धार यांनी रेड्डी-चव्हण काँग्रेस मधील मोठा गट अस्वस्थ झालेला होता आणि त्यांनी चव्हाणांच्या मागे घोषा लावला होता की तिरपुडेंना आवरण्यासाठी हे सरकार घालवावे लागेल. दुसरा इलाज दिसत नाही. त्या नाराज गटाचे नेते शरदराव नव्हते तर इचलकरंजीचे आबासाहेब कुलकर्णी, साताऱ्याचे किसन वीर अशी मंडळी होती.

    शरदरावांकडे त्या गटाचे नेतृत्व आले कारण ते चाणाक्ष व चतुर तर होतेच पण यशवंतरावाच्या पूर्ण विश्वासातील होते. शरदरावांनी ती ऐतिहासिक संधी नाकारली नाही इतकाच त्यांचा जर दोष म्हणायचा तर तो म्हणता येईल. शरदरावांनी रेड्डी काँग्रेसच्या नाराज गटाच्या समर्थनासाठी व संभाव्य सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी जनता पक्षाच्या नेत्यांचे मन वळवले. एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे यांचे व पवारांचे घनिष्ठ संबंध होते त्याचा उपयोग त्यांना त्या प्रयोगात झाला. आणि एके दिवशी दादांचे सरकार विधानसभेचे अधिवेशन सुरु असतनाचा कोसळले.

    त्यांच्या सोबत रेड्डी चव्हाण काँग्रेसमधील ४० तरूण आमदार बाहेर पडले. दादांचे व तिरपुडेंचे सरकार अल्पमतात गेले व जनता पार्टीच्या ९९ आमदारांसह पवारांनी सत्ता स्थापन केली. पण ९९ आमदार असतानाही जनता पार्टीने मुख्यमंत्रीपद घेतले नाही. कारण त्यांच्याकडे सरकार चालवण्यासाठी अनुभवी नेतृत्वच नव्हते. त्या विधानसभेत जनता पक्षातील पूर्वाश्रमीचे जनसंघाचे उत्तमराव पाटील एकीकडे आणि जुन्या समाजवादी विचारंचे सदा वर्दे, शंकापचे गणपतराव देशमुख दुसरीकडे असे मंत्री घेऊन पवारांनी सरकार चालवले. पण पहिल्या अधिवेशनात कोणीच मंत्री अनुभवी नसल्याने सर्वच प्रश्नांना उत्तरे स्वतः पवारच देत होते…! तिरपुडेंना घरी पाठवण्याच्या त्या उद्दिष्टात दादाही दुखावले गेले. आणि इतिहासातून ता तिरपुडेंचे नाव जवळपास पुसले गेले असले तरी दादांच्या पाठीत पवारांनी खंजिर खुपसला या वाक्याच्या रूपाने तो कटु इतिहास मात्र आजही लोकांच्या स्मरणात रहिला. पण ती ऐतिहासिक अपिरहार्यता होती हे राजकारणाचा अभ्यास करणारे कोणीही सांगू शकतील.

    शरद पवारांनी राज्यासाठी व देशासाठी काय केले असेही प्रश्न त्यांचे विरोधक विचारतात. पण अनेक गोष्टींकडे डोळेझाक करूनच विरोधासाठी विरोध या चालीवरच तसे प्रश्न विरोधक विचारत असतात. शरद पवारांनी राजकारणात काही चांगली तत्वेही जपली आहेत, याकडे ही मंडळी पाहात नाहीत. त्या गोष्टी सांगत तर त्याहूनही नाहीत. शरद पवारांनी दादांचे सरकार पाडल्या नंतर दीड वर्षाच्या आतच दिल्लीतील जनता प्रयोग साफ फसला. मोरराजी देसाईंचे सरकार कोसळले आणि देशात पुन्हा निवडणुका झाल्या. १९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने निवडून आल्या. केंद्रातील सत्ता हाती घेतल्यानंतर इंदिराजींनी आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू आदि राज्यातही स्वविचाराची सरकारे येतील यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांचे लक्ष अर्थातच महाराष्ट्राकडेही होतेच. त्यांनी शरद पवारांना दिल्लीत बोलावून घेतले आणि सांगितले की तुम्ही काँग्रेस फोडून जितके आमदार घेऊन गेला होतात, त्यांच्यासह परत कँग्रेसमध्ये, म्हणजेच काँग्रेस आयमध्ये परत या, तुमचे मुख्यमंत्रीपद आपण शाबूत ठेवू. पण जतना पक्षातील जुन्या सहकाऱ्यांना स्थिर सरकारचे जे वचन दिले होते, त्याचा भंग करून इंदिरा चरणी लीन होण्यास पवारांनी नकार दिला.

    त्याच वेळी त्यांना माहिती होते की बाई आपले सरकार टिकू देणार नाहीत. त्यांनी सहकाऱ्यांना कल्पना देऊन ठेवली होती. त्यांचे सरकार गेले तोही प्रसंग खरेतर ऐतिहासिक आहे. पण त्याही पेक्षा शरद पवारांनी नंतर जे केले ते राजकारणात एक दीपस्तंभासारखे महत्वाचे मानले जाते. ज्या दिवशी इंदिरा गांधींनी महाराष्ट्रातील पुलोद सरकारबरोबरच इथली विधानसभा बरखास्त केली व राज्यात राष्ट्रपती राजवाट लागू केली, त्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा कसोटी सामना सुरु होता आणि शरद पवार सहकुटंब तो सामना पाहात बसले होते. त्यांना अधिकाऱ्यांनी येऊन सांगितले की तुमचे सरकार गेले आहे. ते ठीक आहे म्हणाले व सामन्यातून मध्येच उठून बाहेर पडले नाहीत! सामना संपल्यावर वर्षा या शासकीय निवासस्थानी परत आले व त्याच रात्री एका मित्राच्या फियाट गाडीतून त्यांनी शासकीय निवास सोडला आणि माहेश्वरी निवासातील आपल्या खाजगी फ्लॅटवर निघून गेले. त्यांचे विशेष असे सामान-सुमानही वर्षावर नव्हते. सरकार गेले त्याच सायंकाळी बंगला सोडण्याचा एक नवा आदर्शही त्यांनी त्या निमित्ताने नकळत प्रस्थापित केला होता.

    गरीब दलित मागासवर्गां विषयीचा जिव्हाळा हे शरदरावंच्या राजकारणाचे एक सूत्र राहिले आहे. त्याचा प्रत्यय त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनात दिला. जेंव्हा शरदराव प्रथम मुख्यमंत्री बनेल तेंव्हा त्यांच्याकडेच विद्यापीठ नामांतराचा ठराव विधिमंडळात मांडण्याची ऐतिहासिक जबाबादारी आली आणि दहा वर्षांनंतर ते जेंव्हा पुन्हा मुख्यमंत्री बनले तेंव्हा १९८९ मध्ये प्रत्यक्षात मराठवाडा विद्यापीठाच्या नावात डॉ बाबासाहेब आंबेडकारांचे नाव जोडण्याची किमायाही त्यांनीच करून दाखवली. बाबासाहेबांचे नाव देऊ नका तुम्हाला ताची राजकीय किंमत मोजावी लागेल असे इशारे शरदरावांना त्यांचे सहकारी देत होते पण न डगमगता घेतलेले कार्य तडीस नेण्याचे मनोधैर्य त्यांच्याकडे होते. म्हणून पवार मोठे ठरतात.

    १९८६ ते १९८९ या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी फलोद्यान योजना आणली आणि कोरडवाहू शेतकऱ्यांचे कल्याण केले. त्यांनी पुढे केंद्र सरकारमध्ये काम करताना ऐतिहासिक अशी कृषी कर्जमाफीची योजना रेटली आणि देशासह महाराष्ट्रातील करोडो शेतकऱ्यांचे सात-बारा उतारे कोरे करण्याचे काम करून दाखवले. त्यांनी महिलांना राजकारणात अर्धा वाटा देण्याचे धाडस दाखवत देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिलांना आरक्षणाचे विधेयक आणले.

    व्यक्तीगत आयुष्यातही महिलांचा सन्मान हेच धोरण त्यांनी राबवले. त्यांनी जाणीवपूर्व वंशाचा दिवा असल्या संकलप्ना न जोपासता एकाच मुलीवर कुटुंब नियोजित ठेवण्याचे त्या काळात क्वचित दिसणारे धाडस दाखवले. वागण्या बोलण्यातील अशा पुरोगामित्वामुळेच शरद पवारांनी नेहमीच राज्यातील प्रमुख बुद्धीजीवींमध्ये स्वतःचे पाठिराखे तयार केले. अनेक स्तरावर मैत्री जपताना नामवंत लेखक, संपादक, विचारवंत यांच्याशी शरदरावांचे संबंध वर्षानुवर्षे अबाधित राहिले.

    १९७८ नंतर शरदरावांनी धाडसी निर्णय घेऊन अनेक आघाड्यां स्थापन केल्या, चालवल्या. १९८० आणि १९८५ च्या विधानसभा निवडणुकापर्यंत विधिमंडळातील पुलोदचा प्रयोग राबवणयाची, पुढे नेण्याची धडपड त्यांनी केली आणि त्यात यश येत नाही हे पाहून १९८६ मध्ये ते राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये परतले. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेस दुसऱ्यांदा सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तो प्रयोग त्यांनी आता दोन दशकांनंतरही सुरु ठेवला आहे. पण पहिल्याच विधानसभा निवडणुकीतील आकडे हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारसाठी अनुकूल आले हे पाहताच त्यांनी क्षणभरात काँग्रेस बरोबर आघाडीचे सरकार चालवण्याचा निर्णय करून टाकला. त्या सरकारला शेतकरी कामगार पक्ष, जनता दल आणि कम्युनिस्टांचाही पाठिंबा घेतला. ते दुसरे पुलोदचे सरकार पूर्ण पाच वर्षे त्यांनी टिकवले.

    दादांच्या पाठीत खुपसलेला वा न खुपसलेला खंजीर पवारांची पाठ सोडत नव्हता. त्यातच त्यांनी दुसऱ्यांदा काँग्रेस सोडल्या पासून काँग्रेसमधील एक नेत्यांचा गट सातत्याने शरद पवारांवर आपाला विश्वास नाही, ते काहीही करतील, ते भाजपाची साथ देतील… असे सांगत राहिला. त्या कुजबुज ब्रिगेडवर मात करून पवारांनीच पडते घेऊन २००४ व २००९ मध्येही काँग्रेससह मित्रपक्षां बरोबरच राज्यात सरकार स्थापन केले. दिल्लीतही ते काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीत सहभागी झाले. ते सरकार दहाच वर्षे टिकले. पण महाराष्ट्रातील संपुआ सरकार पंधरा वर्षे टिकले. आणि आता २०१९ नंतरही त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सोबतच राहून तिसरे आघाडीचे सरकार स्थापन केले. आताचे महा विकास आघाडीचे सरकार चालवण्यातही शरदरावांचे योगदान मोठे आहे, हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांची विधाने पाहून ऐकून जाणवतेच. परवा ससंदेच्या आवारात पवारांना उभे राहायला लागू नये म्हणून संजय राऊत स्वतः खुर्ची घेऊन धावले म्हणून टीका करणारे विसरतात की दोन वर्षांपूर्वीही संजय राऊतांच्याच प्रयत्नांनी पवारांना सत्तेची खुर्ची राज्यात घेता आली आणि पवारांच्या पढाकारानेच ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद आले !!

    सातत्याने पंतप्रधानपदाची संधी हुकलेला नेता म्हणूनही शरदरावांकडे पाहिले जाते. २००९ मध्ये त्यांच्या सहाकाऱ्यांनी शरदरावांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत म्हणून धडपड केली. दिल्लीतील राजकारणात अधिक अस्थिरता आली असती तर कदाचित काँग्रेसला पवारांचे पंतप्रधानपद मान्यही करावे लागले असते. पण त्या निवडणुकीत काँग्रेसने २००४ पेक्षा उच्च प्रतीची कामगिरी करून दोनशे पेक्षा अधिक खासदार निवडून आणले. म्हणून तेंव्हा पवारांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पुन्हा भंगले.

    आता २०२४ ला काय होईल याच्या अटकळी बांधल्या जात असताना काँग्रेसचे कमी झालेले महत्व पाहून भाजपा विरोधात प्रादेशिक पक्षांची निराळी फळी उभी करण्याचे डावपेच शरद पवार आखात आहेत. त्यांच्या त्या प्रयत्नांना यश येईल की नाही हे काळच सांगू शकेल. पण प्रकृतीच्या इतक्या तक्रारी व जिवावरच्या दुखण्यांवर दोनदा तीनदा मात करूनही हा जिद्दी म्हातारा आणखी एकदा सिंहगड सर करायला घोरपड बांधून सज्ज होतो आहे! त्यांच्या या जिद्दीला आणि उमेदीला सलाम केल्याशिवाय राहवत नाही….!!