नाराजीला थोपविताना भाजपातही घराणेशाही; …मग भाजप याला अपवाद कसा?

कर्नाटकात बोम्मई यांची निवड करताना ज्या घराणेशाहीला भाजपा विरोध करत आहे ती घराणेशाहीच कायम ठेवली आहे. बसवराज बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर . बोम्मई यांचे पुत्र. येदियुरप्पा आणि बसवराज दोघेही कर्नाटकातील राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि लोकसंख्येच्या २० टक्‍के असलेल्या लिंगायत समाजाचे.

  अर्थात, भाजपाने एका लिंगायत समाजाच्या नेत्याला बदलून दुसर्‍या लिंगायत नेत्यालाच आणण्याचे राजकारण खेळले आहे. पण हे करताना दुसर्‍या पक्षातून आलेल्या नेत्यालाच प्रमुख पद देऊन आपल्या पक्षातील जुन्या नेत्यांवर अन्याय केला आहे. अशीच घराणेशाही कायम राखण्यास भाजपाने हरियाणात मदत केली आहे दुष्यंत चौटाला यांना.

  देवीलाल यांचे पणतू भाजपाच्या साह्याने आज उपमुख्यमंत्री आहेत. अनेक नेत्यांना सक्तीने सेवानिवृत्त होण्यास भाग पाडणारी मोदी-शाह ही जोडी येदियुरप्पा यांच्याबाबतीत बरीच ‘सॉफ्ट’ राहिली. त्याचं कारण होतं मुख्यत्वे येदियुरप्पा यांनी भाजपाला दक्षिणेत सत्तेचा दरवाजा उघडून दिला. येदियुरप्पा यांची मुलगी, जावई, मुलगा यांच्यावर भ्रष्टाचाराचे, जमीन हडपण्याचे आरोप झाले तरीही पक्ष त्यांना संरक्षण देत राहिला.

  हे आरोप गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्या उत्तरप्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल यांच्यावरही झाले होते. पण त्यांचे वय ७५ वर्षे झाले म्हणून हटविण्यात आले आणि लगेच मध्यप्रदेश आणि आता उत्तरप्रदेशच्या राज्यपालपदी बसविण्यात आले. येदियुरप्पा यांचं तसेच पुनर्वसन होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

  मात्र, मुख्यमंत्रिपदावर अनुक्रमे तीन आणि दोन  वर्षांसाठी बसण्याआधी ‘ऑपरेशन लोट्स’च्या सहाय्याने दोन वेळा मिळून पंचवीसहून अधिक विरोधी आमदारांचे राजीनामे घेऊन त्यांना पुन्हा भाजपाचे उमेदवार म्हणून निवडून आणले गेले. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला जातो. ऑपरेशन लोट्सची सुरुवात २०१८ साली कर्नाटकपासून झाली, असे म्हणण्यास हरकत नाही.

  अर्थात, राजीनामा देण्याआधी खास प्लेनने दिल्लीत जाऊन शिमोग्याचा खासदार असलेल्या आपल्या मुलाला बी. एस. राघवेंद्र यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करण्यासाठी प्रयत्न केला होता. पण मोदी- शाह यांनी त्यांचं म्हणणे मानले नाही. मुलाऐवजी त्यांनी शोभा करंदलाजे यांचा कृषिराज्यमंत्री म्हणून समावेश केला.

  ‘शोभाक्‍का’ म्हणून कर्नाटकात प्रसिद्ध असलेल्या या महिला येदियुरप्पा यांच्या अतिशय निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे मुलगा नाही तरी येदियुरप्पा यांच्या निकटवर्तीयालाच मोदींनी मंत्रिमंडळात घेतले. लिंगायत समाज हा एकूण लोकसंख्येच्या सुमारे २० टक्‍के तर वोक्‍काळीग समाज एकूण लोकसंख्येच्या सुमारे १८ टकके प्रमाणात कर्नाटकात आहे. देवेगौडा ‘वोक्‍काळीग समाजाचे. त्यामुळे कर्नाटकात सत्तांतर घडवताना जात, परिवारवाद आणि ज्येष्ठता या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे.

  कर्नाटकात आतापर्यंत दोन पिता-पुत्र मुख्यमंत्री झाले. देवेगौडा-कुमारस्वामी आणि एस. आर. बोम्मई आणि बसवराज बोम्मई. संपूर्ण देशात आतापर्यंत १५ राजकीय परिवाराने दोन किंवा त्याहून अधिक मुख्यमंत्री दिले आहेत, तर काही ठिकाणी मुलांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले. जम्मू- काश्मीरच्या अब्दुल्ला परिवाराने आतापर्यंत तीन मुख्यमंत्री दिले.

  BJP is also dynastic while suppressing resentment So how is the BJP an exception