corona positive 2020
मागोवा २०२० : कोरोना ‘पॉ‍झिटिव्ह’ २०२०

ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचे आगमन साबरमती आश्रमातील दौरा, नमस्ते ट्रम्प इवेंट, त्यानंतर त्यांचा ताजमहालच्या भेटीचा दौरा, इत्यादी भरगच्च कार्यक्रमातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या वातावरणाची नांदी घेऊनच जानेवारी आणि फेब्रुवारी महिनाअखेर सारा देश ट्रम्पमय झाला होता.

किशोर आपटे

नेमेचि येतो मग पावसाळा…या उक्तीनुसार आपण सन २०२०च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात येऊन पोहोचलो आहोत आणि मग ‘जुने जावू द्या मरणालागून, सावध ऐका पुढल्या हाका’ म्हणत नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. मात्र यावेळी जुन्या वर्षाला निरोप देताना भूतकाळात डोकावले आणि सिंहावलोकन केले तर ठळकपणाने सांगता येतील अशा महत्त्वाच्या राष्ट्रीय घडामोडींचे हे वर्ष होते, हे वेगळे सांगायची गरज नाही.

सन २०१९च्या अंतालाच आपल्याकडे चीनमध्ये आलेल्या भयानक कोविड-१९ विषाणूबाबतच्या बातम्या येत होत्या. मात्र हा विषाणू इतका घातक आहे आणि तो साऱ्या जगाला आपल्या कवेत घेणार आहे याची सुतराम कल्पना जगभरात कुणी केली नसावी. सन २०२० या वर्षाकडे पाहताना त्यामुळे साऱ्या जगात उत्सुकता होती ती अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची! अगदी भारतासोबत घट्ट मैत्रीची दुहाई देत त्यावेळी भारतात जानेवारी महिन्यात तयारी केली जात होती ती २४-२५ फेब्रुवारी २० रोजी गुजरात मध्ये होणाऱ्या ‘केम छो ट्रम्प’ आणि नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाची!

अमेरिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रपती ट्रम्प यांचा भारत दौरा आणि मोटेरा क्रिकेट स्टेडियम या नव्याने तयार करण्यात आलेल्या मैदानात १ कोटी भारतीयांच्या इव्हेंटच्या तयारीत मोदी सरकारने सारे लक्ष केंद्रीत केले होते. ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचे आगमन साबरमती आश्रमातील दौरा, नमस्ते ट्रम्प इवेंट, त्यानंतर त्यांचा ताजमहालच्या भेटीचा दौरा, इत्यादी भरगच्च कार्यक्रमातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या वातावरणाची नांदी घेऊनच जानेवारी आणि फेब्रुवारी महिनाअखेर सारा देश ट्रम्पमय झाला होता.

५ ऑगस्ट २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पार पाडला. शतकानुशतके ज्या भूमीवर भगवान रामचंद्रांचा जन्म झाल्याचा हिंदू भाविकांचा दावा होता त्या जागेवर मुघल शासक बाबराच्या सेनापती मीर बाकी याने सन १५१० मध्ये उभारलेल्या मशिदीमुळे या ठिकाणी मंदिर मशीद वाद होत राहिला. मात्र ९ नोव्हे.२०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात या विवादावर अंतिम निकाल देण्यात आला आणि राम मंदिराच्या शिलान्यासाचा मार्ग मोकळा करण्यात आला होता. तरीही कोरोना काळात शिलान्यास होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण या पूर्वीच्या काळात ‘मंदीर वही बनायेंगे’ असा नारा देत विश्व हिंदू परिषदेसह देशातील हिंदुत्वप्रेमी संघटनानी यात्रा काढत कारसेवेसाठी लाखांच्या संख्येने आयोध्येत गर्दी केली होती. त्यामुळे कोट्यावधी हिंदूच्या श्रध्देच्या या मुद्यावर आयोध्येत अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

साऱ्या देशात सामान्य जनजीवन ठप्प पडले असताना निवडणुकांचा कार्यक्रम मात्र सुरळीतपणाने राबविण्यात आल्याचे पहायला मिळाले. सभा, प्रचार दौरे यांच्या नेहमीच्या माहोलाचा नजारा शेवटच्या टप्प्यात कोरोना असतानाही नेहमीसारखाच राहिल्याचेही दिसले. तेजस्वी यादव यांच्या गर्दीच्या सभा हा त्यावेळी चर्चेचा विषय राहिला होता. अखेर २४३ जागांच्या बिहार विधानसभेत कोणत्याच पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी तेजस्वी यादव यांच्या राजदने सर्वात मोठा पक्ष म्हणून चांगली कामगिरी केल्याचे आणि सत्ताधारी जनतादल युनायटेडच्या नितीश कुमार यांच्या पक्षाची शक्ती कमी झाल्याचे पहायला मिळाले.

सन २०२० मधील कोरोनाचा काळ वगळता ठळकपणाने दखल घेण्यासारखी आणखी महत्वाची घटना म्हणजे सप्टेंबर २०२०च्या महिन्यात संसदेत कोरोना काळात झालेल्या अधिवेशनात मंजूर करण्यात आलेली कृषी सुधारणा विधेयके. लोकसभेत १७सप्टेंबर आणि राज्यसभेत २० सप्टेंबर रोजी चर्चेविना मंजूर करण्यात आलेल्या कृषी सुधारणा विधेयकांना पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यातून प्रखर विरोध करण्यात आला.

या दोन राज्यात सुरू असलेले आंदोलन केंद्र सरकारच्या दारात डिसेंबरच्या सुरुवातीलाच दिल्लीच्या वेशीवर येऊन पहोचले होते. हे कायदे शेती, आणि शेतक-यांच्या हिताचे नाहीत त्यामुळे ते रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते आग्रही आहेत. तर केंद्र सरकारला चर्चेच्या मार्गाने, पोलिसी बळाचा वापर करूनही ही आंदोलनाची कोंडी फोडण्यात यश आले नाही. सामान्य जनता कोरोनाच्या नंतरच्या टाळेबंदीने आर्थिक बदहालीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे, देशात लाखो लोकांनी रोजगार गमावला आहे.

अशावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यात ज्या शेतीक्षेत्राने आणि शेतकऱ्यांनी भरीव कामगिरी केल्याचे समोर आले आहे त्या अन्नदात्याला आपल्या मागण्या घेऊन सरकारच्या दारात थंडी आणि कोरोनाच्या जीवघेण्या संकटातही तिष्ठत बसावे लागले आहे. सरत्या वर्षात या बळीराजाला न्याय मिळो आणि कृषीप्रधान देशात बळी राजासाठी नवी पहाट उगवेल का?