कोरोना नियम आणि फोबिया

महाराष्ट्रातील अनेक शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या महिनाअखेरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट येणार की काय अशी भ्रीती व्यक्‍त केली जात आहे.

    कोरोना महामारीचा फैलाव पुन्हा वाढतो आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आपण सगळे दुसऱ्या लॉकडाऊनच्या दिशेने निघालो आहोत, हे टीव्हीवर ऐकताना जवळजवळ सगळ्यांच्याच पोटात गोळा येतो. पण घरातून रस्त्यावर आल्याबरोबर सगळेच जण ही बातमी विसरून जातात. शासन आणि प्रशासन दररोज कानीकपाळी ओरडून आपल्याला सांगत असते की, नियम पाळा आणि लॉकडाऊनचा कटू अनुभव टाळा. परंतु एरवी शिस्तप्रिय म्हणून परिचित असलेली; किंबहुना संधी मिळताच इतरांना शिस्त शिकवणारी माणसंसुद्धा या बाबतीत शिस्त पाळत नाहीत, असे आमच्या निदर्शनास आले आहे.

    ‘सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा’ हे शब्द ‘सीसीटीव्हीत कैद’ या शब्दांसारखेच रूढ आणि निरर्थक वाटू लागलेत. शब्द अशा प्रकारे घासून- घासून गुळगुळीत होतात; म्हणूनच कदाचित त्यातला अर्थ निघून जातो आणि हातात भोपळाच उरतो. एकीकडे लसीकरण सुरू असतानाच दुसरीकडे सर्व नियम धाब्यावर बसवून दैनंदिन व्यवहारात गुंतलेल्यांची संख्याही काही कमी नाही. लग्न समारंभ, सार्वजनिक सभा, कार्यक्रम, राजकीय मेळावे आदींना गर्दी होऊ लागली आहे. कोठेही खबरदारी घेताना दिसत नाही. त्यामुळेच मार्चअखेरपर्यंत दुसरी लाट येणार, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

    टीव्हीवर सध्या इतक्या बाजारांची दृश्ये दाखवतात की, ती गर्दी पाहूनच धडकी भरते. परंतु आपण स्वतः जेव्हा अशाच एखाद्या बाजारपेठेत जातो, तेव्हा आपण त्या गर्दीचाच भाग असतो आणि उंटावर स्वार होणारा माणूस ज्याप्रमाणे आपला उंट सोडून बाकीचे उंट मोजतो, तसेच आपले होऊन जाते. यात काही चूक, गुन्हा किंवा पाप आहे, असे मानण्याची गरज नाही. आपल्याला ज्यावेळी जे करायला सांगितले जाते, त्याच्या बरोबर विरुद्ध करायचे, ही आपली मानसिकताच बनून गेलीय. त्यामुळे दारात अँम्ब्युलन्स येईपर्यंत ही गोष्ट सीरिअसली घेण्याचे कारण नाही.

    ‘ल़ॉकडाऊन हा शब्द काढला तरी अनेकांना हल्ली इतका राग येतोय, जणू घराबाहेर पडल्याशिवाय, चारचौघांशी बोलल्याशिवाय हे लोक जगूच शकत नाहीत. वस्तुतः यातले अनेकजण चारचौघँत बसूनसुद्धा कुणाशीच बोलत नाहीत, इतकी आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर केल्यावर अशा मंडळींना आतून बरे वाटेल, असे वाटले होते. पण हीच मंडळी घरात बसून जास्त कंटाळली. ही मानसिकता लक्षात घेऊन शासन-प्रशासनाने आदेश काढायला हवेत. मास्कच्या बाबतीत हीच गोष्ट अगदी ठळकपणे दिसते. वस्तुतः किमान शहरी महिलावर्गाला तरी मास्क ही वस्तू नवीन असली तरी अनुभव नवीन नाही.

    प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी फक्त डोळे उघडे ठेवून पूर्ण चेहरा झाकण्याची सवय त्यांना कोरोनाच्या आधीपासूनच होती. पण आता मास्कची सकती म्हणजे जुलूम वाटतो. सर्वकाही करू; पण आमच्या मनाने, अशी ही मानसिकता आहे. ‘नियम’ म्हणून काही करणे आपल्याला मान्यच होत नाही. खरे तर एक छोटासा मास्क खूप मोठे काम करतो. परंतु, अनिवार्य असतानासुद्धा तो नकोसा का वाटतो यावर अभ्यास कुणीच करत नाही. डायरेक्ट दंडात्मक कारवाई सुरू होते.