कोरोनाचं घडतंय-बिघडतंय गणित आणि उपचारात होत गेलेले बदल

कोरोनाचा (Corona Virus) कहर जगभरात वाढू लागला, तेव्हा एप्रिल २०२०मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एचसीक्यू (HCQ) हे संधिवातावर दिले जाणारे औषध, आणि ॲझिथ्रोमायसीन हे जीवाणूजन्य संसर्गामध्ये वापरले जाणारे प्रतिजैविक (अँटिबायोटिक) कोरोनावर उपयुक्त ठरते असे जाहीर केले.

  -डॉ. अविनाश भोंडवे

  जानेवारी २०२०च्या पहिल्या आठवड्यात कोरोना विषाणू जगाला सर्वप्रथम माहिती झाला. आजवर अज्ञात असलेल्या या विषाणूला काय नावाने ओळखायचे इथपासून ते त्याची रचना, त्याचे गुणधर्म, त्याची लक्षणे इथपर्यंत कशाचीच माहिती वैद्यकीय जगाला नव्हती. त्यामुळे त्याच्यावर उपचार कसे करायचे याबाबतही जगभरातील संशोधकांना काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे सुरुवातीपासून अनेक औषधांच्या ट्रायल्स केल्या गेल्या. या औषधांची सर्वसाधारण वर्गवारी करायची झाली तर-

  • पूर्वीपासून इतर आजारांसाठी वापरली जाणारी औषधे
  • कोरोनाची महामारी येण्यापूर्वी आलेल्या सार्स, मर्स या विषाणूजन्य आजारात वापरली गेलेली औषधे
  • नव्याने शोधून काढलेली विषाणूविरोधी (अँटिव्हायरल) औषधे
  • नव्याने शोधल्या गेलेल्या अँटिबॉडीज असलेली औषधे
  • पूर्वी केले गेलेले काही उपचार यांचा समावेश होता.

  कोरोनाचा कहर जगभरात वाढू लागला, तेव्हा एप्रिल २०२०मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एचसीक्यू हे संधिवातावर दिले जाणारे औषध, आणि ॲझिथ्रोमायसीन हे जीवाणूजन्य संसर्गामध्ये वापरले जाणारे प्रतिजैविक (अँटिबायोटिक) कोरोनावर उपयुक्त ठरते असे जाहीर केले.

  भारत सरकारवर दबाव आणून त्यांनी भारतातून एचसीक्यू मोठ्या प्रमाणावर खरेदी केले. जगभरात या गोष्टीचा बोलबाला झाला आणि तमाम भारतीय जनतेने हे औषध एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याचा साठा केला की ते काही काळ संधिवातासाठी घेणाऱ्या लोकांनाही मिळणे दुरापास्त झाले. महिन्याभरातच जागतिक आरोग्यसंघटनेने जाहीर केले की हे औषध कोरोनावर अजिबात उपयोगी नाही.

  इंग्लंडमध्ये झालेल्या एका संशोधनात हे रक्तदाब आणि हृदयविकाराच्या रुग्णांना हे औषध दिल्यास त्यांच्या हृदयाचे रक्ताभिसरण बिघडू शकते असे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार नंतर भारतातही हे औषध वापरू नये असे आयसीएमआरनेदेखील जाहीर केले.

  याचबरोबर आयव्हरमेक्टिन हे जंतासाठी किंवा खरजेसाठी वापरले जाणारे औषधही प्रचलित झाले, मात्र ते वापरू नये असे तब्बल २ वर्षांनी म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये नुकतेच जाहीर केले गेले.

  ॲझिथ्रोमायसीन या प्रचलित अँटिबायोटिक प्रमाणेच डॉक्सिसायक्लिन हे गेली पाच दशके वापरल्या जाणाऱ्या अँटिबायोटिकचासुध्दा कोरोनाच्या उपचारात काहीही उपयोग नाही म्हणून प्रमाणित उपचारांच्या यादीतून ती काढली गेली. कोरोनापूर्वी आलेल्या सार्स आणि मर्स या विषाणूजन्य आजारांमध्ये उपयुक्त ठरलेली रेम्डेसिव्हीर, लोपिनव्हिर,फ्लॅबीपिराव्हिर अशी औषधे ऑक्टोबर २०२०पसून प्रचलित होऊ लागली.

  भारतातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान रेमडेसिव्हिर हे औषध कोरोनाविरोधी संजीवनी असल्यासारखे वापरले गेले. पण अगदी आजाराच्या अगदी सुरुवातीला ते वापरल्यास रुग्ण लवकर करोनामुक्त होतो असे जगभरातील डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना ते वारेमाप वापरले गेले.

  या औषधाच्या साठ्यापेक्षा शंभर पटीने जास्त प्रमाणात त्याला मागणी होती. साहजिकच त्याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार झाला. परंतु मे २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारतातील आणि आंतरराष्ट्रीय संशोधनामध्ये रेम्डेसिव्हिरमुळे कोरोनाच्या रुग्णांवर हवा त्या प्रमाणात परिणाम होत नाही असे लक्षात आल्यावर तेही औषध कोरोनाच्या उपचारांच्या यादीतून वगळण्यात आले. नुकतेच डिसेंबर २०२१मध्ये मॉलनुपिराव्हिर हे विषाणूप्रतिबंधक औषध गाजावाजा करून बाजारात आणले गेले. परंतु आयसीएमआरच्या जानेवारीमध्ये जाहीर झालेल्या यादीत या औषधाचा समावेश केलेला नाही.

  कोरोनाच्या संसर्गामध्ये शरीरात मोठ्या प्रमाणात दाह निर्माण होत असल्याने टोसिलीझुमॅब आणि त्याच्या वर्गवारीतील काही दाहशामक औषधे वापरली जाऊ लागली. ही औषधे खूप महागही होती आणि त्यांचे उत्पादनही कमी प्रमाणात होते. त्यांच्या वाढत्या मागणीमुळे या ही औषधांचा काळाबाजार झाला. २०२०च्या अखेरीस ही औषधे देखील कोरोना बारा करण्यात उपयुक्त नसल्याचे सिध्द झाल्याने अधिकृत उपचार यादीतून काढून टाकण्यात आली.

  कोरोनाच्या विषाणूंना कोरोनामुळे तयार झालेल्या अँटिबॉडीज रोखू शकतात, या सिद्धांताला अनुसरून कोरोना होऊन गेलेल्या रुग्णाच्या रक्तातीत प्लाझ्मा वापरून केली जाणारी कॉन्व्हॅलिसन्ट प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरतात असे जून २०२०मध्ये जाहीर झाले. त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या.

  अतिशय कमी खर्चात होणाऱ्या या उपचारासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी प्लाझ्मा संकलनाची मोठमोठी शिबिरे घेण्यात आली. दिल्ली सरकारने तर प्लाझ्मा बँक सुरु केली. पण जगभरात केलेल्या प्लाझ्माच्या वापरानंतर आणि अनेक ठिकाणी झालेल्या संशोधनपूर्वक चाचण्यांमध्ये हा उपचारदेखील कुचकामी ठरतो असे लक्षात आल्यावर प्लाझ्माला जुलै २०२१मध्ये तिलांजली मिळाली.

  अँटिबॉडीजच्या बाबतीत कृत्रिमरीत्या तयार केलेल्या दोन प्रकारच्या अँटिबॉडीजचे मिश्रण असलेली ‘अँटिबॉडी कॉकटेल’ ही औषधप्रणाली मात्र दुसऱ्या लाटेतील डेल्टा विषाणूबाबतीत कमालीची परिणामकारक ठरली आणि आजही त्याचा वापर होत आहे. दोन वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी निर्मित केलेल्या या अँटिबॉडी कॉकटेलचा आजही वापर होत आहे. मात्र नव्या ओमायक्रॉनच्या व्हेरियंटमध्ये गंभीर रुग्ण फारसे नसल्याने त्याच्याबाबतीत अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही. मात्र अँटिबॉडी कॉकतेलचा परिणाम ओमायक्रॉनवर कमी होतो आहे असा देशोदेशीच्या हॉस्पिटल्समधील अनुभव आहे.

  अँटिबॉडी कॉकटेलच्या आधी मार्च २०२१मध्ये मोनोक्लोनल अँटिबॉडी या कर्करोगावर वापरल्या जाणाऱ्या औषधाची खूप चर्चा झाली, परंतु तेही औषध प्रचलित यादीत नाही. भारताच्या डीआरडीओ या लष्करी संशोधन संस्थेने खूप गाजावाजा करून आणलेल्या २-डी-जी या औषधाबाबतही पुढे खात्रीलायक संशोधन न आल्यामुळे तेही औषध आज फारसे वापरात नाही.

  कोरोनावरील उपचारात पर्यायी औषधांमध्ये आयुर्वेदिक आणि युनानी काढे, कोरोनिलसारखी तथाकथित आयुर्वेदिक औषधे, ड जीवनसत्व, क जीवनसत्व अशी औषधे आणि वाफारा घेणे असे उपचार उपयुक्त ठरतात असे सोशल मिडियावरून अनेकदा सांगण्यात आले. परंतु ही औषधे आणि उपचार भारत सरकारने जारी केलेल्या अधिकृत उपचारात समाविष्ट नाहीत.

  कोरोनाच्या महामारीच्या २०२० मधील सुरुवातीपासून आज २०२२च्या जानेवारीपर्यंत केवळ खालील औषधे वापरली जातायत. हीच औषधे केवळ गेल्या दोन वर्षाच्या वापरात उपयुक्त ठरली आहेत.

  १. ऑक्सिजन
  २. रक्त पातळ ठेवणारी अँटिकोॲग्युलंटस
  ३. स्टीरॉइड्स
  ४. पॅरासिटॅमॉल

  कोरोनाच्या विषाणूला पूर्ण नष्ट करणारे कोणतेही औषध आजवर संशोधित झालेले नाही. मात्र नवे आलेले औषध आपत्कालीन वापरासाठी जनतेला सुपूर्त केले जाते. अधिक संशोधनानंतर ती उपयुक्त नसल्यास त्याची परवानगी काढून घेतली जाते. कोरोनाच्या उपचारांमध्ये सतत होणारे बदल हे या सातत्याने चाललेल्या संशोधनाचेच निदर्शक आहेत.

  (डॉ. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्सचे राष्ट्रीय अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.)