hosbale

  किशोर आपटे

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दत्ताजी या नावाने सर्वपरिचीत असलेल्या दत्तात्रय होसबाळे यांना पुढील तीन वर्षासाठी संघाच्या दुसऱ्या सर्वोच्च पदावर म्हणजेच सरकार्यवाह पदावर बढती देण्यात आली आहे. मातृभाषा कानडी असणाऱ्या दत्ताजींचे इंग्रजी, हिंदी, संस्कृत, तामिळ ,मराठी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. लोकप्रिय कन्नड मासिक ‘असिमा’चे ते संस्थापक संपादक आहेत.

  गेल्या बारा वर्षांपासून सुरेश ऊर्फ भैयाजी जोशी यांनी सरकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्याच कार्यकाळात भाजपला दोनदा संपूर्ण बहुमताने लोकसभेत विजय मिळाल्याची इतिहासात नोंद झाली आहे. मात्र वाढत्या वयोमानामुळे भय्याजी जोशी यांनी आपल्या पदासाठी तरूण स्वयंसेवकाची निवड व्हावी अशी इच्छा प्रकट केल्यानंतर होसबाळे यांची निवड करण्यात आली आहे.

   वयाच्या तेराव्या वर्षापासून संघकार्य

  कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील सोरबा तालुक्यातील होसबळे या छोट्या गावात १डिसे. १९५५ रोजी दत्ताजी यांचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी परिचित झाले. १९७२ मध्ये विद्यार्थी संघटन अखिल भारतीत विद्यार्थी परिषदेत त्यांनी कामाला सुरूवात केली. त्यानंतर १९७८मध्ये त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी चळवळीला वाहून घेतले. याच दरम्यान त्यानी बंगळुरू येथून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मैसूर विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयात स्नातक परिक्षा उत्तिर्ण केली. होसबाळे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा मनमिळावू स्वभाव! त्यामुळे ते साऱ्या संघटनेत सर्वाशी सहजपणे वावरू शकत असत, त्याचा त्यांच्या वक्तृत्व आणि कार्यशेलीवर प्रभाव राहिला. शिक्षण आणि साहित्य क्षेत्र होसबाळे यांचे आवडते प्रांत राहिले आहेत. कानडीमधील जवळपास सर्वच लेखक साहित्यिकांशी त्यांचे जवळचे संबंध राहिले आहेत. त्यातही वाय  एन कृष्णमूर्ती आणि गोपाळकृष्ण अधिगा यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध राहिला.

  आणिबाणीच्या लढ्यात तुरूंगवास

  १९७२ च्या आणिबाणीच्या काळात लोकशाहीच्या लढ्यात १९७५ ते १९७७ ते जयप्रकाश यांच्या आंदोलनातही सक्रीय राहिले. याच काळात सुमारे पावणेदोन वर्ष त्यांनी मिसा कायद्यांतर्गत तुरूंगावासही भोगला आहे. त्यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार दत्ताजी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात शिक्षकांचे लाडके म्हणून परिचित होते.

  विद्यार्थी चळवळीत मोलाचे योगदान
  पूर्वोत्तर भारतामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य विस्तारण्यात १५ वर्ष होसबाळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. गुवाहाटी येथे युवा विकास केंद्र संचालनात त्यांची भूमिका महत्वाची राहिली. त्याच प्रमाणे अंदमान- निकोबार भागातही त्यानी विद्यार्थी संघटना विस्तारात महत्वाचे योगदान दिले आहे.  दत्ताजी होसबाळे यांनी नेपाळ,रशिया, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका अशा देशात संघकार्यासाठी अनेकदा प्रवास केला असून संपूर्ण देशातही अनेक महत्वाच्या कार्यासाठी प्रवास केला आहे.

  काही वर्षांपूर्वी नेपाळच्या भूकंपानंतर मदत कार्यात प्रमुख जबाबदारी सांभाळणारे होसबाळे  सन २००४ मध्ये संघाच्या बौद्धीक वर्गाचे प्रमुख म्हणून कार्यरत झाले. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना सह सर कार्यवाह पदी बढती देण्यात आली. होसबाळे यांनी संयुक्त राज्य अमेरिका  तसेच ब्रिटन मध्ये हिंदू स्वयंसेवक संघ च्या संघटनात्मक कार्यात संरक्षक म्हणूनही मोलाचे कार्य केले आहे. कर्नाटकातून येणाऱ्या होसबाळे यांना  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नागपूरात लॉकडावूनमुळे प्रतिनीधी सभा होवू शकत नसल्याने बंगळुरू येथे योगायोगाने संघातील दुसऱ्या मोठ्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

  मनमिळावू स्वभाव

  होसबाळे यंना मातृभाषा कन्नड शिवाय मराठी इंग्रजी हिंदी तमिळ आणि संस्कृत या भाषा येतात. अनेक विदेशी भाषांचा त्यांचा अभ्यास आहे. फुटबॉलचे प्रशंसक असलेल्या दत्ताजी होसबाळे यांच्या मते वैश्विक एकतेचे प्रतिक फुटबॉल हा खेळ असू शकतो. आज निवड झाल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी ते संघाचे सरकार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडतील. मित्रता आणि सहजपणे मिसळून जाण्याच्या स्वभावामुळे ते येत्या काळात देशातील भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरणा-या अनेक निर्णयांचे कर्तधर्ते म्हणून आपल्या कार्याची छाप उमटवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दत्ताजींना त्यांच्या कार्यासाठी नवराष्ट्र परिवाराच्या शुभेच्छा!