विधिमंडळातील दीपस्तंभ भाई गणपतराव देशमुख

अधिवेशनांचा कालावधी महिन्यांवरून दिवसांवर ढासळतो आहे. त्यामुळे कोणा आमदारांचे कार्य-कर्तृत्व फारसे चमकण्याचे, जाणवण्याचे कारणच पडत नाही. जाणवते कोणाचे अस्तित्व ? तर, जे ओरडा करतात, मोठ्यांदा घोषणा देऊन गोंधळ करून सभागृह बंद पाडतात अशा गडबड गोंधळ करणाऱ्यांचे ! तसे प्रसंग अल्प कालीन अधिवेशनात येतच असतात. पण अशा गोंधळींच्या ओरड्यातूनही ज्यांचा शांत पण कणखर स्वर उमटत होता त्या गणपतरावांच्या बोलण्याची वागण्याची आठवण विधिमंडळात नेहमी येत राहील. देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक भाई गणतपतरावांनी नोंदवला होता. जसे कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्त्यांना नेत्यांना कॉम्रेड म्हणायची प्रथा आहे तसेच शे.का.पमध्ये सर्व नेते भाई असतात.

  भाई गणपतराव ऊर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधाने एक दीपस्तंभ निमाला, एका पर्वाची अखेर झाली. त्यांचे विधानसभेतील अस्तित्व हे नव्यांना प्रेरणा देणारे आणि जुन्यांना आधार देणारे होते. गेले कागही दिवस ते आजारीच होते. प्रकृती आता साथ देत नव्हती. ते विद्यामान विधानसभेत आले नाहीत. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय 2019 मध्ये घेतला. त्यांनी पक्षाला, शेतकरी कामगरा पक्षाला,  असे अजिबात सांगितले नव्हते की माझ्या घरातील कोणाला तरी उमेदवारी द्यावी. पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पक्षाने त्यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख यांना तिकीट दिले. पण त्याचा निसटता पराभव झाला.  तसे म्हटले तर गेली काही वर्षे विधिमंडळाचेच अस्तित्व उणावत आहे. अधिवेशनांचा कालावधी महिन्यांवरून दिवसांवर ढासळतो आहे. त्यामुळे कोणा आमदारांचे कार्य-कर्तृत्व फारसे चमकण्याचे, जाणवण्याचे कारणच पडत नाही. जाणवते कोणाचे अस्तित्व ? तर, जे ओरडा करतात, मोठ्यांदा घोषणा देऊन गोंधळ करून सभागृह बंद पाडतात अशा गडबड गोंधळ करणाऱ्यांचे ! तसे प्रसंग अल्प कालीन अधिवेशनात येतच असतात. पण अशा गोंधळींच्या ओरड्यातूनही ज्यांचा शांत पण कणखर स्वर उमटत होता त्या गणपतरावांच्या बोलण्याची वागण्याची आठवण विधिमंडळात नेहमी येत राहील.

  देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक भाई गणतपतरावांनी नोंदवला होता. जसे कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्त्यांना नेत्यांना कॉम्रेड म्हणायची प्रथा आहे तसेच शे.का.पमध्ये सर्व नेते भाई असतात. भाई गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात  शुक्रवारी रात्री निधन झाले तेंव्हा ते ९४ वर्षांचे होते.  देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटीलेटरवरच होते.

  गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या एकाच मतदारसंघातून आणि शेतकी कामगार या एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरा वेळा विधानसभेत  निवडून आले. एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडला होता. इतक्या ज्येष्ठ सदस्याला मानमरातब मात्र तितका मिळाला नाही हे नोंदवावे लागेल. शरद पवारांनी विधीमंडळ व संसदीय कामकाजाची पन्नास वर्षे पूर्ण केली तेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा सोहळा केला होता. त्याही वेळी पवारसाहेबां इतकेच वैधानिक कर्तृत्व दाखवणाऱ्या गणपतारावांना मात्र थोडे डावलल्या सारखेच झाले. त्याची करणे दोन असावीत. एकतर त्यांचा पक्ष पवारांच्या पक्षा इतका मोठ्या उपद्रवमूल्याचा नाही. आणि दुसरे गणपतरावांच्या नेतृत्वाने राज्याच्या सीमा कधी ओलांडल्या नाहीत. विधिमंडळात मात्र त्यांचा आवर्जून गौरव करण्यात आला होता.

  मोहोळ तालुक्यातील मूळचे गणपतराव वकिली व्यवसायामुळे सांगोला येथे स्थायिक झाले. त्यावेळी सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी झोकून दिले. १९६२ साली देशभरात काँग्रेसचे वर्चस्व असतानाही सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापकडून देशमुख उभे राहिले आणि वयाच्या ३४ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. १९७२ साली त्यांना पराभव पत्करावा लागला. पण त्यीह विधानसभेत ते आलेच होते. कारण तेंव्हा विजयी झालेले आमदार काकासाहेब साळुंखे यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. त्यातही पुन्हा  गणपतराव देशमुख निवडून आले.

  नंतर १९९५ सालचा अपवाद वगळता ते २०१९ पर्यंत म्हणजे तब्बल ५२ वर्षे आमदार राहिले. आमदारकीचा बहुतांशी काळ ते विधिमंडळात विरोधी बाकांवरच बसले. १९७८ साली शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये आणि नंतर १९९९ साली शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा देशमुख यांनी मंत्रिपद सांभाळली. भोगली नाहीत ! कारण तो तायंचा स्वभावच नव्हता. त्यामुळे गणपतावांच्या मंत्री कार्यालयात कामे करायला कर्मचारी उत्सुक नसत. कारण साहेबच इतके साधे होते की पीएंचा रुबाब कोण बघणार !

  चार पिढ्यांतील मतदारांशी नाळ जोडणारे गणपतराव देशमुख हे साधी राहणी, स्वच्छ  प्रतिमा, वैचारिक ध्येयनिष्ठा यासाठी ओळखले जात. विधिमंडळात अनेक विधेयकांवर त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे आजही संस्मरणीय ठरतात. मनोहर जोशी व नारायण राणे यांचा अपवाद वगळता यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जवळपास सर्व मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ त्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवला होता.

  1995 च्या विधानसभेत ते सदस्य नव्हते. त्या अर्थाने ते एकदाच पराभूत झाले होते. तेही अगदीच शेसव्वाशे वा दोनशे मतांनी. त्यांचे कार्यकर्ते तेंव्हा आग्रह धरत होते की आपण पुन्हा मतमोजणी घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे भांडूया,  पण त्याला त्यांनी मान्यता दिली नाही. पराभव पत्करून ते पाच वर्षे शांत राहिले. त्यांची विचारसरणी ही कट्टर डावी राहिली. त्यांत त्यांनी कधीच तत्वांशी तडजोड केली नाही. म्हणून शेतकरी कमगार पक्षातील अलिकडच्या नेतृत्वाशी त्यांचे फारसे पटलेही नाही. पण त्यांनी कधी आवाज चढवला वा कधी भांडण केले असेही घडले नाही. जे पटत नाही त्यापासून चार हात लांब राहण्याचा त्यांचा स्वभाव होता.

  पण गणपतराव होते म्हणूनच शिवसेना व भारतीय जनता पक्षांच्या सरकारला शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा लाभला नव्हता. एरवी रायगड मधील शेकापचे नेतृत्व गोपिनाथ मुंडेंच्या मैत्रीखातर भाजपाला पाठिंबा द्यायला तयारच होते. पण तत्व ते  तत्व या विचाराने चालणारे गणपतराव खंबीर राहिले.

  1999 नंतर विलासराव देशमुखांच्या नेतृत्वातील सरकार हे आघाडीचे होते व त्यात शेतकरी कामगार पक्षाचा सक्रीय सहभाग होता. सांगोल्याचे गणपतराव कॅबिनेट तर आणि अलिबागच्या आमदार मीनाक्षीताई प्रभाकर पाटील या राज्यमंत्री असा हा सहभाग राहिला. कोल्हापूरचे शेकपचे सर्वात वरिष्ठ नेते, प्रा एन. डी. पाटील हे त्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या समन्वय समितीचे प्रमुख होते. शेतकरी कामगार पक्षाच्या आग्रहामुळेच त्या सरकारने एनरॉनचे करार मोडीत काढले होते.

  शेतकरी कमगार पक्षाने शहरी कामगार आणि ग्रामीण भागाताली शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळतच पक्षाला एक घट्ट पाया एकेकाळी मिळवून दिला होता. सत्तरच्या दशकात हा पक्ष महाराष्ट्रातील एक प्रभावी व प्रमुख राजकीय पक्ष होता. नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नगर, रायगड अगदी मुंबईतही पक्षाचे कार्यकर्ते नेते सक्रीय होते. एकाच वेळी दीड डझन आमदारही शेकापने दिले होते. खासदारकीसाठी त्यांच्या पक्षाला काही विभागात चांगली मते पडत होती.

  पण नंतरच्या काळात देशाचे आणि राज्याचे राजकारण जसे बदलत गेले तशी शेतकरी कमगार पक्षालाही उतरती कळा लागली. तरुणांचा ओढा शिवसेना आणि रा. स्व संघाच्या उजव्या विचारधारेकडे वळू लागला. एकूणच कामगार संघटनांना वाईट दिवस आले. कारण संपांनी अनेक गिरण्या कारखाने बंद पडले. कायदे बदलले. आर्थिक उदारीकरणानंतर देशातील कामगार चळवळीचाही अंत दिसू लागला. संप करण्यासाठी अन् मोर्चे काढण्यासाठीही लोक उत्साही राहिले नाहीत. आताही महागाईच्या नावने कितीही ओरडा झाला तरी लोकांनी रस्त्यावर उतरून महागाईच्या विरोधात मोर्चे काढले नाहीत. सत्तर ऐशीचाय दशकातील तो संप लढ्यांचा काळ मागे पडला. त्या मागे पडलेल्या काळाचे  एक पायीक गणपतराव होते. कामगार चळवळींप्रमाणेच शेतकरी चळवळीतही नवे नेतृत्व पुढे आले. ऊसाचा दुधाचा शेतकरी आता शरद जोशी आणि राजू शेट्टीच्या नेतृत्वात लढे करू लागला आणि एन. डी पाटील गणपतराव ही नाव  लढ्यातून बाजूला गेली.

  राजकारणचाच पोत जरी बदलला तरी गणपतरावांच्या मागे असणारा सांगोल्याचा मतदार काही बदलला नाही. त्यांचा ठाम विश्वास आबासाहेबांवरच होता. मागील दोन तीन निवडणुकांपासून आता आमदारकी नको, असे गणपतराव म्हणत राहिले. मागच्या 2014 च्या निवडणुकी वेळीही ते अर्जही भरायला पुढे येत नव्हते. लोकांनीच जाऊन त्यांना उभे केले व ते  आमदार म्हणून विजयी झाले. पण ती त्यंची अखेरची आमदारकी ठरली.

  ते अलिकडे थकले होते. विधानसभेत बोलातना त्यंचा जो टिपेचा आवादज पूर्वी यायाचा तितका जोर आता राहिला नव्हता हेही खरे होते. ते थकले होते पण थांबले नव्हते. गणपतारवांच्या साधेपणाचे अनेक किस्से सांगितले जातात. एसटीने फिरणारे फार थोडे आमदार आता सापडतील, त्यात गणपतराव नक्कीच होते. शरद पवारांनी स्थापन केलेल्या पुलोदच्या प्रयोगात शेतकरी कामगार पक्षही सहभागी होता. ते सरकार इंदिरा गांधींनी एके दिवशी अचानक बरखास्त केले. तसे होणार याची कल्पना येतच होती. १९८० च्या निवडणुकीत मोठ्या बहुमताने इंदिराजी पुन्हा विजयी झाल्या होत्या. जनता प्रयोगाची अखेर झालेलीच होती. शरद पवारांना बाईंनी दिल्लीत बोलावून घेतले होते आणि तुमच्या पक्षासह काँग्रेसमध्ये परत या मुख्यमंत्री तुम्हीच राहाल, अशी ऑफर दिली होती. ती पवारसाहेबांनी नाकारली. ते पुलोदचा प्रयोग गुंडाळयाला तयार नव्हते. त्यामुळे बाई आपले सरकार टिकू देणार नाहीत, याची खात्री त्यांच्यासह पुलोदच्या सर्वच नेत्यांना होती. जेंव्हा सरकार बरखास्त झाले तेंव्हा गणपतराव प्रवासात होते. बातमी रेडिओववरून सायंकाली ७च्या बातम्यात जाहीर झाली. ती ऐकून गणपतरावांनी तात्काळ प्रवासातील सरकारी मोटार सोडून दिली आणि पुढचा प्रवास एसटीने पूर्ण केला.

  गणपतरावांच्या सडेतोड बोलण्यातूनच अलिकडच्या काळातील मोठा राजकीय पेचप्रसंग उभा केला होता. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विधिमंडळात काही चर्चा सत्रांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दिलीप वळसे पाटील हे विधानसभेचे अध्यक्ष होते. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. गोपीनाथ मुंडे, भाजपाचे तर रामदास कदम हे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते होते. त्या चर्चासत्रात राज्यातील सिंचनाच्या प्रश्नावर बोलताना गणपतरावांनी राज्याच्या त्या वर्षीच्या आर्थिक पाहणीच्या पुस्तकातील आकडेवारी पुढे ठेवली. सिंचनावर गेल्या साठ वर्षात खर्च झालेले सत्तर हजार कोटी रुपये गेले कुठे, कारण सिंचनाखालची जमीन काही त्या प्रमाणात वाढलली सरकारी आकड्यांवरून  दिसत नाही हा मुद्दा त्यांनी मांडला. त्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाणांनी जाहीर केले की या विषयावर सरकार एक श्वतपत्रिका नक्की प्रसिद्ध करेल.

  तो राष्ट्रवादीसाठी बाँबगोळा होता. सिंचन खाते उपमुख्यमंत्री या नात्याने अजितदादा पवार हाताळत होते. त्यांच्याकडे आणि त्यांच्या आधी सिंचन खाते सांभाळणारे सुनील तटकरे यांच्याकडे संशयाच्या सुया जाऊ लागल्या. विधिमंडळा बाहेर झालेले आरोप निराळे आणि ज्या विषयात प्रश्न उपस्थित होतात त्या मुद्दयाचा व्हाईटपेपर काढण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा निराळी. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील संघर्ष आणि शीतयुद्धाला मोठीच धार गणपतरावांच्या त्या सवालांनी आणि अर्थातच पृथ्वीराज च्वाहणांच्या चौकशीच्या घोषणेने प्राप्त झाली.

  दादांनी मंत्रीपद सोडून दिले ते चार सहा महिने साधे आमदार राहिले आणि सरकारने नेमलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांना निर्दोष ठरवले गेल्यावर ते गेले तसे अचानक पुन्हा उपमुख्यमंत्रीही बनले.

  गणपतरावांच्या नेतृत्वात आणखी ऐतिहासिक प्रसंग घडला तो २००९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर.  निवडणुका होऊन विधानसभेची पहिली बैठक भरते त्यात नव्याने निवडून आलेल्या आमदरांचा शपथविधी होतो व नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाते. त्या कामकाजासाठी एक तात्पुरते अध्यक्ष नेमले जातात. साधारण विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदारांकडे ते प्रोटेम स्पीकरची जबाबदारी येते. तशी ती गणपतारावांकडे तेंव्हा आली. प्रोटेम स्पीकरना राज्यपाल राजभवनात आमदारकीची शपथ देतात नंतर ते तात्पुरते अध्यक्ष विधानभवनातील बैठकीत अन्य सदस्यांना शपथ देतात. तो सदस्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरु होता. समजावादी पार्टीच्या अबू असीम आझमींना गणपतराव शपथ देत असतनाच अचानक मनसेचे राम कदम, ‘गोल्डमॅन’ रमेश वांजाळे आदि चार पाच आमदार पुढे धावले आणि त्यांनी अबु आझमीला रोखले, झटापट झाली, हाणामारीही झाली. तो सारा अभूतपूर्व प्रसंगाचे साक्षीदार आणि त्यातील निर्णय़ अधिकारी होते गणपतराव देशमुख !

  सर्वच राजकीय पक्षांच्यान तायंनी अतिशय आदराने व मनःपूर्वक तायंच्याविषयी सोकभावना व्यक्त केल्या आहेत. सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे मुख्यमंत्री म्हणतात. “आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील”, असेही ठाकरेंनी नमूद केले आहे.

  अनिकेत जोशी