अफगाण मैत्री जरी, तरी चीन दलदलीत!

जगाच्या इतिहासात अफगाणिस्तानचा उल्लेख 'महाशकतींचे कब्रस्तान' असा केला जातो आणि इतिहासाची परंपरा राखून चीनसुद्धा अफगाणिस्तानमधील दलदलीत फसण्याची प्रचंड शक्‍यता आहे.

  तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यानंतर चीन आणि पाकने तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्य पूर्ण संबंध विकसित करू इच्छितो.

  अफगाणिस्तानात तालिबानने गुलामीच्या बेड्या तोडून टाकल्या आहेत, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करून देशाचा राज्य कारभार चालवण्याकरिता प्रचंड आर्थिक मदतीची गरज आहे. ती मदत सध्या फक्त चीनकडून मिळेल असे दिसत आहे. त्यामुळे तालिबानला चीनची गरज पडेल.

  बीआरआय प्रकल्पाच्या माध्यमातून आशिया आणि आफ्रिकेतील ६० देशांच्या नेटवर्कसोबत जोडले जाऊ अशी अपेक्षा चीनला आहे. त्याशिवाय अफगाणिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीवर चीनला ताबा मिळवता येऊ शकतो. भारतीय उपखंडातील सर्वांत समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्ती अफगाणिस्तानमध्ये आहे, असा एक समज आहे.

  या खनिज संपत्तीमुळे संपूर्ण अफगाणिस्तानचा चेहराच बदलू शकतो. मात्र, चिनी स्वार्थी नजर पडल्यामुळे आता परिस्थिती बाईट झाली आहे. अमेरिकेने २००४ मध्ये तालिबानचा बीमोड केला. त्यानंतर अमेरिकेच्या जिओलॉजिकल सोसायटी सर्व्हेने या खनिज संपत्तीसाठीचे सर्वेक्षण सुरू केले. वर्ष २००६ मध्ये अमेरिकन संशोधकांनी मॅग्नेटिक, ग्रॅव्हिटी आणि हायपरस्पेक्ट्रल सर्वेक्षणासाठी हवाई मोहिमाही आखल्या होत्या.

  अफगाणिस्तानमध्ये आढळलेल्या खनिज संपत्तीमध्ये लोह, तांबे, कोबाल्ट, सोने याशिवाय औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे असणारे लिथियम आणि निओबियमचाही समावेश आहे. अमेरिकेने बरीच वर्षे अफगाणिस्तानमध्ये ठाण मांडले. जर अफगाणिस्तानमध्ये इतकी प्रचंड नैसर्गिक संपत्ती आहे, तर अमेरिका जी तंत्रज्ञान आणि आर्थिक महाशक्ती आहे, ही संपत्ती तिथून का काढू शकली नाही?

  मुख्य कारण होते पायाभत सविधा नव्हत्या आणि नैसर्गिक संपत्ती तिथून काढणे हे आर्थिकदृष्टय़ा नुकसान करणारे होते. परंतु आता स्थिती बदलली आहे. का? इतकी संपत्ती तिथे खरोखरच आहे हे सध्यातरी सिद्ध झालेले नाही. कमकुवत सुरक्षा व्यवस्था, कायद्याची कमतरता आणि भ्रष्टाचारामुळे अफगाणिस्तानमध्ये विकास गंगा वाहू शकली नाही. त्यामुळे वाहतूक करणे, निर्यात करणे कठीण आहे.

  त्याशिवाय अफगाणिस्तान सरकारच्या मोठ्या प्रमाणावरील करामुळे गुंतवणूकदारांनी अफगाणिस्तानकडे पाठ फिरवली होती. येत्या काही वर्षांत लिथियमची मागणी प्रचंड वाढणार आहे. लिथियमचा वापर लॅपटॉप, मोबाईल बॅटरीमध्ये केला जातो. ‘लिथियमच्या साठ्यामुळे अफगाणिस्तानचे महत्त्व वाढणार आहे. भविष्यात जीवाश्म इंधनाऐबजी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची मागणी वाढणार आहे.

  इलेक्ट्रेक कारमध्ये लिथियम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अफगाणिस्तानमध्ये सॉफ्ट मेटल निओबियमही आढळले जाते. याचा वापर सुपरकंडक्टर स्टील तयार करण्यात होतो. महत्त्वाच्या आणि काही दुर्मिळ खनिज संपत्तीमुळे अफगाणिस्तानला महत्त्व येणार आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्या (सीपीईसी ) माध्यमातून चीन अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.