यूपीएच्या नेतेपदाचा वाद

केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या या तीन पक्षांमध्ये मनापासून मैत्रीचे संबंध नाहीत, ह्या गोष्टी अनेक वेळा सिद्ध झाल्या आहेत. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढ्या प्रमाणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जवळ आले तेवढ्या प्रमाणात शिवसेना आणि काँग्रेस किंवा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जवळ आलेले नाहीत, ही गोष्ट अनेक वेळा सिद्ध झालेली आहे. महाराष्ट्रात महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसच्या नेत्यांना विश्‍वासात घेतले जात नाही, अशी तक्रार काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी केली होती.

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यूपीएच्या चेअरमनपदी शरद पवार यांची निवड व्हावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक युद्धाला प्रारंभ झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील यूपीए म्हणजे संयुक्‍त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व सध्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसल्याने आता या आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्यासारख्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे देण्यात यावे, अशी सूचना गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी केली होती. मुळात शिवसेनेचे प्रवक्‍ते असलेल्या संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांच्यासाठी यूपीए नेतेपदाचा प्रस्ताव ठेवावा, हीच गोष्ट महत्त्वाची मानावी लागेल. महाराष्ट्रात जरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी अस्तित्वात असली तरी केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएमध्ये अद्यापही शिवसेनेचा प्रवेश झालेला नाही, असे असतानाही शिवसेनेच्या वतीने अशा प्रकारचा प्रस्ताव दिला जातो तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी समजून घेण्यासारखी आहे.

    महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेले नाना पटोले यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये संजय राऊत यांच्या या प्रस्तावावर टीका केली आहे. संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्‍ते आहेत की, शरद पवारांचे अशा खोचक शब्दांमध्ये पटोले यांनी राऊत यांच्या या प्रस्तावाची खिल्ली उडवली आहे. शिवसेनेसारखा जो पक्ष अद्यापही यूपीएचा घटक पक्ष झालेला नाही त्या पक्षाने आमच्या नेतृत्वाची चिंता करण्याची कोणतेही कारण नाही, असेही पटोले यांनी बजावले आहे. यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे आहे आणि आगामी काळात ते त्यांच्याकडेच राहील, अशा शब्दांत पटोले यांनी काँग्रेसची बाजू स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे इतर नेतेही याच प्रकारे आपली मते व्यक्‍त करत आहेत. शरद पवार यांच्याबद्दल आणि त्यांच्या नेतृत्वाबद्दल जरी आदर असला तरी यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडेच राहील, असे सोलापूरच्या काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनीही म्हटले आहे. पण या निमित्ताने महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचा अंतर्गत विरोध मात्र समोर आला आहे.

    केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या या तीन पक्षांमध्ये मनापासून मैत्रीचे संबंध नाहीत, ह्या गोष्टी अनेक वेळा सिद्ध झाल्या आहेत. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढ्या प्रमाणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जवळ आले तेवढ्या प्रमाणात शिवसेना आणि काँग्रेस किंवा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जवळ आलेले नाहीत, ही गोष्ट अनेक वेळा सिद्ध झालेली आहे. महाराष्ट्रात महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसच्या नेत्यांना विश्‍वासात घेतले जात नाही, अशी तक्रार काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी केली होती. सध्या पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने त्या राज्यांमध्ये शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी जाऊ नये, अशी अपेक्षाही मध्यंतरी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्‍त केली होती. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या प्रचाराला न जाण्याची काँग्रेसची विनंती पवारांनी धुडकावून लावली आहे, ही गोष्ट मात्र याठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. या सर्व गोष्टी वरवर जरी किरकोळ वाटत असल्या तरी त्या गंभीर आहेत. मुळात संजय राऊत यांना यूपीएचे नेतृत्व पदाचा विषय उपस्थित करण्याची काही गरज नव्हती.

    राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच देशाचे नेतृत्व करतील अशी घोषणा काही दिवसांपूर्वी राऊत यांनी केली होती. ती समजून घेण्यासारखी होती. कारण ते आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या नेतृत्वाविषयी बोलत होते. राऊत यांच्या या सूचनेवर टीका करताना पटोले यांनी काँग्रेसच्या टेकूवरच महाविकास आघाडी सरकार टिकून आहे याची जाणीव शिवसेनेने ठेवावी, असे सूचक विधान केले आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस कोणत्याही प्रकारे नाराज होणार नाही याची काळजी घटक पक्षांना विशेषत: शिवसेनेला घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी प्रत्यक्षात आणण्यासाठी शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी केंद्रीय पातळीवर यूपीएचे नेतृत्व त्यांनी करावे अशा प्रकारची सूचना करून राऊत यांनी काँग्रेसला दुखावले आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दहा वर्षांच्या कालावधीमध्ये शरद पवार यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा लाभ घेतला होता. म्हणजेच तेव्हा त्यांनी सोनिया गांधी यांचे नेतृत्व मान्य केले होते. अशावेळी केवळ सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसल्याने आता यूपीएच्या नेतृत्वात बदल करावा आणि ते पद शरद पवार यांच्याकडे द्यावे, अशी सूचना करून राऊत यांनी विनाकारणच वाद ओढवून घेतला आहे.

    राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मध्ये जास्त जवळीक आहे याची जाणीव काँग्रेसला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या विरोधात एखादी राजकीय कट-कारस्थान करत नाहीत ना, अशी भावना जर काँग्रेस नेत्यांच्या मनात निर्माण झाली तर त्यात ते चुकीचे काही नाही. नाना पटोले यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितल्याप्रमाणे काँग्रेसच्या टेकूवरच हे सरकार उभे असल्याने काँग्रेसच्या भावनांची कदर शिवसेनेला करावीच लागेल. सध्या शिवसेनेच्या वतीने फक्‍त संजय राऊत विविध प्रकारची विधाने करत असल्याने अशा प्रकारचे वाद निर्माण होत आहेत. अशा विधानांमुळे जर घटक पक्षांमध्ये नाराजीची भावना निर्माण होत असेल तर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. शिवसेनेने आता यूपीएचे सदस्यपद स्वीकारावे ही काँग्रेसची सूचना शिवसेनेने अद्यापही मनावर घेतली नसल्याने त्यांना यूपीएच्या राजकारणात बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार प्राप्त होत नाही.