रामदेवच्या टीकेचा देशव्यापी धुराळा, नुसती फुकाची बडबड करून रामदेव यांना बाबागिरी सिद्ध करायची आहे का?

योगगुरू बाबा रामदेव हे कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात . डॉ. मनमोहन सिंग सरकार सत्तेत असताना, काळ्या पैशाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या बाबांनी तेथे पोलीस येताच घाबरून सलवार-कमीस घालून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता.

  काही वर्षांपूर्वी रामदेवबाबांनी पेरियार ई. व्ही. रामस्वामी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांना ‘बौद्धिक दहशतवादी’ असे संबोधले होते. त्यावेळी अनेक दलित व आदिवासी कार्यकर्त्यांनी पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. ‘कोरोनिल’ हे. औषध कोरोनाविरोधी प्रभावी औषध असल्याचा दावाही करण्यात आला, त्याविरुद्धही देशविदेशातून जोरदार आक्षेप घेण्यात आला.

  कोविड झालेल्या रुग्णांना श्‍वासोच्छास नीट कसा करावा, हे देखील कळत नाही आणि हीच मंडळी प्राणवायू व औषधांची चणचण आहे, स्मशानभूमीत जागा नाही अशा प्रकारची नकारात्मकता पसरवत असतात, अशी टीका रामदेवबाबांनी केली होती. त्यांची ही टिप्पणी अत्यंत असंवेदनशील असल्याची टीका देशभरातून झाली. आता मध्यंतरी बाबांना ॲलोपॅथी व डॉक्टरांवर केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर तुफानी टीका झाली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही त्यांना अशी विधाने न करण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियावर बाबांविरुद्ध मोहीम सुरू झाली असून, त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

  इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. मात्र, ‘अटक तर त्यांचा बापही करू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया बाबांनी दिल्याचा  व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्याचवेळी ‘कुणीतरी या बिझिनेसमनला म्हणजेच रामदेवबाबांना कोणत्याही कोविड रुग्णालयात जायला सांगा. तिथे आमच्या डॉक्टर व फ्रंटळाइन वर्करसोबत २४ तास उभे राहा आणि मग ही टरटर करा. हे सर्वात अमानुष, संतापजनक आणि घृणास्पद आहे. हे कोणाच्या टूलकिटप्रमाणे काम करताहेत? त्यांची एवढी हिंमत कशी झाली ?’ अशी टिप्पणी प्रसिद्ध अभिनेत्री व शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनी केली आहे.

  बाबा हे भाजप व पंतप्रधानांच्या जवळचे असल्यामुळे त्यांना असे बोलण्याचे धाडस होत असल्याचे नेटकऱ्यांना वाटते. रामदेवबाबांवर साथरोग कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲलोपॅथी हे एक मूर्ख विज्ञान आहे, असे मत बाबांनी व्यक्‍त केले होते. बाबांच्या कोरोनिलच्या शुभारंभ कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार असताना पतंजली प्रकल्पासाठी विदर्भात प्रचंड जमीनही देण्यात आली. भाजपचे अनेक नेते व माजी मुख्यमंत्र्यांची बाबांशी जवळीक आहे. मात्र, ॲलोपॅथीवर टीकास्त्र सोडणाऱ्या बाबांना अखेर माफीनामा सादर करावा लागला.

  बाबांच्या शरीरातील अनेक घटक कमी झाले होते, तेव्हा त्यांना सळाइन सोल्युशन्स व व्हिटॅमिन्स द्यावे लागले होते. ज्यांना डी-हायड्रेशनचा धोका असतो व त्यातून मृत्यू होण्याचीही शक्‍यता असते, अशा लोकांना सलाइन सोल्युशन दिले जाते. बाबांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती दोन वर्षांपूर्वी बिघडली व ते बेशुद्ध पडले. तेव्हा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी आली होती. परंतु एम्समध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांनीच त्यांच्यावर उपचार केले. आपल्यावर सरकारचा वरदहस्त असल्यामुळे आपले कोणी काही करू शकत नाही, असे रामदेवबाबांना वाटत असावे.

  Does Ramdev want to prove Babagiri by merely blabbering on about Ramdevs criticism all over the country