पांढऱ्या भाताच्या अतिरिक्त सेवनामुळे टाईप २ मधुमेहाला मिळू शकते निमंत्रण

मुंबई : टाइप २ मधुमेहाची (नवी) प्रकरणे आणि पांढ-या भाताचे अतिरिक्त सेवन यांचा परस्परसंबध असल्याचे प्रॉस्पेक्टिव्ह रुरल एपिडेमिओलॉजिकल स्टडी (Prospective, Urban Rural Epidemiological Study – PURE study) या व्यापक बहुराष्ट्रीय पाहणीच्या अमेरिकन जर्नल डायबेटिस केअरमध्ये नुकत्याच ऑनलाइन स्वरूपात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून सिद्ध झाले आहे.

अभ्यासाची पार्श्वभूमी

२१ देशांतील १३२,३७३ सहभागींना घेऊन ही पाहणी करण्यात आली. या सहभागींच्या सरासरी ९.५ वर्षांसाठी केलेल्या पाठपुराव्यादरम्यान सुरुवातीला मधुमेही नसलेल्या ६१२९ मधुमेहींमध्ये मधुमेहाची नुकती लागण झाल्याचे (नवीन सुरुवात) दिसून आले. या एकूण पाहणीगटामध्ये पांढ-या भाताचे अतिरिक्त सेवन (प्रतीदिन <१५० ग्रॅम्सच्या ऐवजी प्रतीदिन > ४५० ग्रॅम्स ) आणि मधुमेहाचा वाढलेला धोका यांचा संबंध असल्याचे आढळून आले. (धोक्याचे गुणोत्तर १.२०) या संबंधाचा सर्वाधिक धोका हा जिथे भात सर्वाधिक प्रमाणात खाल्ला जातो अशा दक्षिण आशियाई भागामध्ये (धोक्याचे गुणोत्तर १.६५) व त्याखालोखाल दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि चीन अशा जगभरातील इतर प्रांतामध्ये असल्याचे आढळून आले. पांढरा भात आणि मधुमेहाची प्रकरणे यातील संबंध हा भात खाण्याच्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. दक्षिण आशियामध्ये प्रतिदिन ६३० ग्रॅम भात खाल्ला जातो व तिथेच या आजाराचा सर्वाधिक धोका आढळून आला, त्याखालोखाल दक्षिण पूर्व एशियामध्ये दर दिवशी सरासरी २३९ ग्रॅम्स खाल्ला जात असल्याचे आढळून आले. चीनमध्ये प्रतिदिन सुमारे २०० ग्रॅम भात खाल्ला जात असल्याचे आढळले व तिथेही भाताचे सेवन आणि मधुमेहाची लागण यांमध्ये परस्परसंबंध आढळून आला, मात्र त्याचे प्रमाण आकडेवारीच्या दृष्टीने फारसे लक्षणीय नव्हते.

या निष्कर्षांविषयी बोलताना या शोधनिबंधाच्या प्रथम लेखक डॉ. भावधारिणी बालाजी म्हणाल्या, ”पांढ-या भाताचे सेवन आणि मधुमेहाची लागण या विषयावर करण्यात आलेली आजवरची ही सर्वात मोठी पाहणी आहे. विविध देशांमध्ये अशाप्रकारचा अभ्यास हाती घेतला जाण्याचीसुद्धा ही पहिलीच वेळ आहे आणि पांढ-या भाताचे सेवन हा दक्षिण आशियामध्ये साथीप्रमाणे पसरलेल्या मधुमेहाचे एक कारण आहे या गोष्टीला या अभ्यासामुळे पुष्टी मिळाली आहे.”

या पाहणीची संकल्पना मांडणारे व या शोधनिबंधाचे द्वितीय लेखक डॉ. व्ही. मोहन म्हणाले, ”पांढ-या भाताचे सेवन आणि आधीपासूनच असलेला मधुमेह यांचा परस्परसंबंध असल्याचा निष्कर्ष आम्ही चेन्नई अर्बन रुरल एपिडेमिओलॉजिकल स्टडी (CURES Study) मधून यापूर्वीच काढला होता. CURES पाहणीतील सहभागींचा आणखी दहा वर्षांसाठी पाठपुरावा केल्यानंतर दक्षिण आशिया, विशेषत: चेन्नईमध्ये भाताच्या अतिरिक्त सेवनाचा मधुमेहाची नव्याने लागण होण्याशी संबंध असल्याचे आढळून आले. या नव्या अभ्यासासाठी अधिक मोठ्या नमुना गटाची पाहणी करण्यात आली आली (संख्‍या=१३२,२३७१ सहभागी) व २१ देशांतील सहभागींचा अधिक काळासाठी पाठपुरावा करण्यात आल्याने यासाठीच्या पुराव्यांमध्ये अधिक भर पडली आहे. या अभ्यासातून स्पष्टपणे समोर आलेली एक गोष्ट म्हणजे भाताचे सेवन किती प्रमाणात होते हे महत्त्वाचे आहे. भारतामध्ये दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भागामध्ये कर्बोदकांच्या सेवनाचे प्रमाण खूपच जास्त आहे हे उघडच आहे. उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये गहू अधिक प्रमाणात खाल्ला जातो. आमच्या गटाने याआधी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, पांढ-या तांदळासारख्या रिफाइन्ड कर्बोदकांचा ग्लायकेमिक इंडेक्स म्हणजे रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढविण्याची क्षमता खूप जास्त असतो, ज्यामुळे आहारातील शर्करेचा वाटा खूप वाढतो.”

या गोष्टीचा संबंध केवळ मधुमेहाचा धोका वाढण्याशी नाही, तर हाय सीरम ट्रायग्लिसराइडची पातळी आणि एचडीएल कॉलेस्ट्रोल कमी प्रमाणात साठण्यासारख्या चयापचयाशी संबंधित इतर लक्षणांशीही ती संबंधित आहे. ‘एशियन इंडियन फेनोटाइप’ किंवा ”साऊथ एशियन फेनोटाइप” म्हणून ओळखल्या जाणा-या या गुणधर्मांना भाताचे अतिरिक्त सेवन हे किमान काही प्रमाणात तरी कारणीभूत असू शकते.

यावर उपाय काय?

भात कमी प्रमाणात खाणे किंवा ब्राऊन राइस अर्थात हातसडीच्या तांदळासारखा अधिक सकस पर्याय वापरणे हा या समस्येवरील उपाय आहे. याशिवाय चणाडाळ, हरभरे, उडीद, राजमा इत्यादी डाळी आणि शेंगांचा आहारात समावेश केल्याने प्रथिने व फायबरचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे शर्करेचा हिस्सा कमी होऊ शकतो. असे केल्याने आपला आहार अधिक सकस बनण्यास मदत होईल. भारतामध्ये आहारातील ७०-७५ टक्‍के वाटा हा पॉलिश्ड पांढरे तांदूळ किंवा मैद्यासारख्या कर्बोदकांचा असतो. हे प्रमाण ४०-५० टक्‍क्‍यांवर आणता आले, भाज्यांतील मिळणा-या प्रथिनांसह एकूण प्रथिनांचे प्रमाण २० टक्‍क्‍यांपर्यंत वाढवता आले आणि भरपूर हिरव्या पालेभाज्या व काही फळांचा आहारात समावेश करून मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्ससारख्या आरोग्यदायी स्निग्धांशांचे प्रमाण वाढवता आले तर भारतीय आहार खूप अधिक सकस बनू शकतो आणि भारतामध्ये टाइप २ डायबेटिस व इतर असंसर्गजन्य आजारांची प्रकरणे कमी होऊ शकतात.”

पॉप्युलेशन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट, हॅमिल्टन हेल्थ सायन्सेन आणि मॅकमास्टर युनिव्हर्सिटी, हॅमिल्टन, कॅनडा यांच्याद्वारे जागतिक कीर्तीचे प्राध्यापक सलीम युसुफ यांच्या नेतृत्वाखाली PURE पहाणीचे समन्वयन आणि संचालन करण्यात आले.