राजकीय पर्यायांची शोधमोहीम; हा चमत्कार प्रत्यक्षात होईल का?

सध्याच्या राजकारणाचा पॅटर्न पाहिल्यानंतर मोदींच्या विरोधात अशी तिसरी किंवा चौथी आघाडी आता यशस्वी ठरू शकत नाही. पवारांनीही जवळपास अशीच भूमिका घेत हा काँग्रेसला वगळून अन्य प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा हा विषय नाही, असे स्पष्ट केले आहे.

  माध्यमांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला नेहमीप्रमाणे तिसऱ्या आघाडीच्या पुनरूज्जीवनाचे नाव दिले पण खुद्द शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी हा तिसऱ्या आघाडीचा विषय साफ धुडकावून लावला. कॉंग्रेसला बाजूला ठेवून हे प्रादेशिक पक्ष स्वतःची वेगळीच आघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले गेले होते, पण प्रशांत किशोर यांनी ही संकल्पना नाकारली.

  त्यांनी एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, सध्याच्या राजकारणाचा पॅटर्न पाहिल्यानंतर मोदींच्या विरोधात अशी तिसरी किंवा चौथी आघाडी आता यशस्वी ठरू शकत नाही. पवारांनीही जवळपास अशीच भूमिका घेत हा काँग्रेसला वगळून अन्य प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा हा विषय नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बैठकीत काँग्रेसला दूर ठेवण्याचा डाव होता का, हा विषय निकाली निघाला आहे.

  यशवंत सिन्हा हे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आता तृणमूल काँग्रेसवासी झाले आहेत. त्यांचा राष्ट्रमंच नावाचा एक राजकीय मंच आहे. पण तो फारसा प्रभावी नाही. यशवंत सिन्हा हे मूळचे बिहारचे नेते. तेथे त्यांना या मंचातर्फे बिहारच्या विधानसभा निवडणुकीत प्रभाव पाडता आलेला नाही.

  भाजपमधून ते बाहेर पडल्यानंतर त्यांचे निकटचे सहकारी शत्रुघ्न सिन्हा हे अचानकपणे तृणमूलच्या वळचणीला गेले. पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे मोठेच वर्चस्व अलीकडच्या निवडणुकीत सिद्ध झाल्याने यशवंत सिन्हा यांचा दिल्लीच्या राजकारणातील भाव पुन्हा जरा वधारला आहे.

  त्यामुळे शरद पवार आणि यशवंत सिन्हा यांच्या पुढाकाराने होणाऱ्या बैठकीत नेमके काय होणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. त्यातच प्रशांत किशोर नावाचे निवडणूक रणनीतीकारही या घडामोडीत सहभागी असल्याने या बैठकीला वेगळेच परिमाण लाभले होते. अर्थात, आजच्या या बैठकीत काहीही ठरलेले असले तरी आता एक बाब मात्र निश्चित आहे की, जे एनडीएच्या बाहेरचे पक्ष आहेत त्यांनी मोदींच्या विरोेधातील आघाडीसाठी आतापासूनच एकत्र प्रयत्न केले तर मोदींना आणि भाजपला २०२४ च्या निवडणुकीत पर्याय देता येईल.

  अर्थात, यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहील. खरे पाहिले तर मागच्याही लोकसभा निवडणुकीत अशाच महाआघाडीचा नारा घुमला होता, पण प्रत्यक्षात या कथित महाआघाडीतील सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधातच लढले होते. त्याचा अपेक्षित परिणाम व्हायचा तोच झाला आणि मोदी पुन्हा स्पष्ट बहुमतासह सत्तेवर आले आहेत.

  भाजपच्या विरोधात निवडणूक लढवून ती जिंकणे ही अजिबातच अवघड गोष्ट नाही, हे केजरीवाल आणि ममतांनी दाखवून दिले आहे आणि तसेही मोदी सरकारच्या विरोधातील नाराजीही सध्या कळसाला पोहोचली आहे. पण लोकांना समर्थ पर्याय दिसत नसल्याने लोक अजूनही बुचकळ्यात आहेत. त्यामुळे भाजप विरोधातील पक्षांची एकत्रित मोट बांधण्याच्या प्रयत्नांना राजकीय महत्त्व आहेच.

  या साऱ्या घडामोडीत काँग्रेसमध्ये जी सामसूम आहे, ती मात्र गूढ स्वरूपाची आहे. मोदींच्या विरोधातील आघाडीसाठी वास्तविक काँग्रेसने पुढाकार घेण्याची गरज असून त्यांनी आपल्या युपीए आघाडीचाच परीघ अधिक व्यापक करण्याची गरज आहे. पण त्या अनुषंगाने काँग्रेसमधून कोणतीच हालचाल अजून होताना दिसत नाही.