हृदयरोगी रुग्णांनी इतर आजारांचे व्यवस्थापन कसे करावे?

हृदयविकारांशी संबंधित या सहव्याधींच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सायलेंट किलर असतात. उदाहरणार्थ, हायपरटेन्शन हे सायलेंट किलर आहे कारण बहुतांश केसेसमध्ये त्याची काहीच पूर्वलक्षणे दिसून येत नाहीत. स्वतःची नियमितपणे तपासणी करवून घेणे हा अशा व्याधी शोधून काढण्याचा एकमेव मार्ग आहे.

  डॉ. राहुल गुप्ता

  सहव्याधी म्हणजे ज्यावर उपचार सुरु आहेत त्या मुख्य आजाराबरोबरीनेच असलेले इतर आजार. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल तर वाढलेले कोलेस्ट्रॉल ही सहव्याधी आहे. सहव्याधींसंदर्भात एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यामुळे होणारे परिणाम अनेक पटींनी वाढतात आणि सरतेशेवटी त्यांचे रूपांतर अतिशय वाईट रोगांमध्ये होते, म्हणूनच प्रत्येक संभाव्य सहव्याधीच्या बाबतीत नीट काळजी घेतली गेली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जास्त प्रमाणात मधुमेह, रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल असेल तर त्या व्यक्तीला हृदयरोग होण्याची दाट शक्यता असते.

  हृदयविकारांशी संबंधित या सहव्याधींच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सायलेंट किलर असतात. उदाहरणार्थ, हायपरटेन्शन हे सायलेंट किलर आहे कारण बहुतांश केसेसमध्ये त्याची काहीच पूर्वलक्षणे दिसून येत नाहीत. स्वतःची नियमितपणे तपासणी करवून घेणे हा अशा व्याधी शोधून काढण्याचा एकमेव मार्ग आहे.

  सहव्याधी कशा ओळखाव्यात?

  हृदयरोगांच्या बाबतीत बऱ्याच केसेसमध्ये लोकांना हे समजत नाही की लक्षणांचा काळ खूप मोठा असतो, त्यामुळे बराच मोठा काळ जाईस्तोवर रक्तदाबाची कोणतीच लक्षणे आढळून येत नाहीत. याच कारणामुळे आरोग्याची निवारक देखभाल महत्त्वाची ठरते, ज्यामध्ये काहीही आजार दिसून येण्याच्या आधी, लवकरात लवकर, नियमितपणे तपासण्या करवून घेणे अनिवार्य आहे, जेणेकरून लक्षणे दिसू लागण्याच्या आधीच आरोग्याला असलेले गंभीर धोके लक्षात येतील आणि त्यांचे विश्लेषण केले जाऊ शकेल. सहव्याधी या सायलेंट किलर असतात त्यामुळे त्यांना शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमितपणे तपासणी करवून घेणे. आजकाल अनेक कॉर्पोरेट कंपन्या विविध आरोग्यतपासणी शिबिरे आयोजित करत आहेत आणि त्या सर्वांमध्ये रक्ततपासणीचा समावेश असतो. लॅबमधील व्यक्तीला घरी बोलावून देखील रक्ततपासणी करता येते, आजकाल आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

  काही सर्वसामान्य सहव्याधी ज्यांचा हृदयविकारांच्या धोक्यांवर परिणाम होतो?

  मधुमेह आणि हायपरटेन्शन या सर्वाधिक आढळून येणाऱ्या सहव्याधी आहेत ज्यामुळे हृदयविकारांचा धोका मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतो. मधुमेहपूर्व (रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित प्रमाणापेक्षा जास्त आहे पण मधुमेहाच्या श्रेणीत नाही) आणि हायपरटेन्शन-पूर्व स्थिती लक्षात येणे गरजेचे आहे. वाढलेला रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल खूप जास्त धोक्याचे आहे. तज्ञांनी आखून दिलेला, नियंत्रित, निरोगी आहार घेऊन व नियमितपणे व्यायाम करून त्यांची काळजी घेतली पाहिजे. स्थूलपणा हे हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. आजकाल युवा पिढीमध्ये देखील ही समस्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. स्लीप ऍपनिया विकार असलेल्या व्यक्तींना देखील उच्च रक्तदाब होऊ शकतो आणि त्यामुळे शरीरातील पेशींची इन्शुलिनला नीट प्रतिसाद न देण्याची प्रवृत्ती वाढते आणि त्यामुळे मधुमेह होऊ शकतो. किडनी विकारावर देखील लक्ष ठेवले गेले पाहिजे कारण हृदयरोग आणि किडनीचे विकार यांचा खूप जवळचा संबंध असतो.

  सीव्हीडीचे धोके कमी करण्यासाठी ताणतणावांचे व्यवस्थापन?

  तणाव म्हणजे बाह्य उत्तेजनांना आपण देत असलेल्या प्रतिक्रिया आणि सध्याच्या आधुनिक समाजात हा घटक अतिशय महत्त्वाचा बनला आहे. आपल्या देशात युवापिढी काम, व्यक्तिगत आणि शारीरिक समस्या यामुळे खूप जास्त तणावपूर्ण वातावरणात वावरत असते. ताणतणाव आपल्या दैनंदीन जीवनाचा भाग बनले आहेत त्यामुळे त्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे आणि याची सुरुवात लहानपणापासूनच केली गेली पाहिजे. योगासने, प्राणायाम, दीर्घ श्वसन आणि ध्यानधारणा हे सर्व रोज केले गेले पाहिजे कारण यामुळे आपले शरीर स्वच्छ, शुद्ध होते व आपले मन बाह्य उत्तेजनांना अधिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ शकते.

  इतर सहव्याधी ज्यांची काळजी घेतली गेली पाहिजे?

  वर नमूद करण्यात आलेल्या सर्वसामान्य सहव्याधींच्या बरोबरीने इतरही काही त्रास असतात ज्यांची तपासणी केली जाणे गरजेचे आहे, यामध्ये ॲनिमिया, थायरॉईड, यकृतातील समस्या आणि फुफ्फुसांचे विकार यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, न्यूमोनिया झालेल्या व्यक्तीला हृदय विकार होऊ शकतो किंवा हृदयाचा झटका येऊ शकतो कारण जेव्हा फुफ्फुसे प्राणवायूचा पुरवठा करणे थांबवतात तेव्हा त्याचा थेट परिणाम हृदयावर पडतो. त्याचप्रमाणे ऍनिमिक म्हणजे रक्तात तांबड्या रक्तपेशींचे प्रमाण कमी असलेल्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते, त्यामुळे हृदयात ब्लॉकेजेसची लक्षणे वाढू शकतात आणि जर हिमोग्लोबिन एका विशिष्ट बिंदूच्या खाली गेले तर हृदय निकामी देखील होऊ शकते.

  (लेखक कन्सल्टन्ट, कार्डिओलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे कार्यरत आहेत.)