पावसाळ्यासोबत आजार देखील येतात; आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्‍यासाठी विशिष्‍ट काळजी घेणे गरजेचे

या आजारामध्‍ये डोळ्यांची जळजळ होते किंवा आपल्‍या डोळ्यातील सफेद भाग लालसर होतो. हा आजार अत्‍यंत संसर्गजन्‍य असण्‍यासोबत लहानात लहान संपर्काच्‍या माध्‍यमातून देखील पसरतो. हा आजार काही दिवसांमध्‍येच बरा होत असला तरी डोळ्यांचे संरक्षण करणे आवश्‍यक आहे.

    कांचन नायकवडी

    काहींना पावसाळा ॠतू आवडतो, तर काहींना नाही. वातावरणामधील बदलामुळे पावसाळ्यासोबत विषाणूजन्‍य व जीवाणूजन्‍य आजार देखील येतात. पण तुम्‍हाला माहित आहे का या ऋतूदरम्‍यान ‘डोळ्यांना’ देखील संसर्ग होतात? प्रत्‍येकाने आरोग्‍याबाबत कोणतीही चिंता न करता आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्‍यासाठी विशिष्‍ट काळजी घेणे गरजेचे आहे. कोविड-१९ पासून सुरक्षित राहण्‍यासाठी तोंड, नाक व हाताचे संरक्षण करण्‍याबाबत पुरेशा प्रमाणात जागरूकता निर्माण केली जात असताना अनेकांना त्‍यांच्‍या डोळ्यांचे संरक्षण करण्‍याबाबत माहित नसू शकते.

    म्‍हणून, पावसाळ्यादरम्‍यान डोळ्यांची उत्तम काळजी घेण्‍यासाठी काही महत्त्वपूर्ण व सुलभ खबरदारीचे उपाय पुढीलप्रमाणे:

    • स्‍वच्‍छता राखा. डोळ्यांसाठी आणि हात स्‍वच्‍छ करण्‍यासाठी वापरणारे फेस टॉवेल्‍स, नॅपकिन्‍स, रूमाल, कोणताही कपडा नेहमी सोबत ठेवा. टॉवेल्‍स, चष्‍मे, कॉन्‍टॅक्‍ट लेन्‍सेस इत्‍यादी सारख्‍या वैयक्तिक वस्‍तू दुसऱ्यांसोबत शेअर करू नका.
    • घरातून बाहेर पडत असताना सनग्‍लासेस किंवा चष्‍मा घाला. ते आपल्‍या डोळ्यांचे बाहेरील कण आणि विषाणू व जीवाणू सारख्‍या संसर्गजन्‍य घटकांपासून संरक्षण करतात.
    • डोळ्यांची खूप काळजी घ्‍या. दररोज थंड पाण्‍याने डोळे धुवा. झोपेतून उठल्‍यानंतर किंवा कॉन्‍टॅक्‍ट लेन्‍सेस काढल्‍यानंतर डोळे जोराने चोळू नका. यामुळे नेत्रपटलाचे (कॉर्निया) कायमस्‍वरूपी नुकसान होऊ शकते.
    • पावसाळ्यादरम्‍यान कॉन्‍टॅक्‍ट लेन्‍सेस न घालण्‍याचा प्रयत्‍न करा, कारण तसे केल्‍यास डोळ्यांमध्‍ये खूपच कोरडेपणा येऊ शकतो आणि डोळे लाल होणे व डोळ्यांमध्‍ये जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात. चष्‍म्‍यांना स्‍वच्‍छ व कोरडे ठेवा.
    • पाणी साचलेल्‍या भागांमध्‍ये जाणे टाळा, कारण अशा ठिकाणी विषाणू, जीवाणू व फंगस मोठ्या प्रमाणात असतात, ज्‍यामुळे त्‍यांचा सहजपणे संसर्ग होऊन तुम्‍ही आजारी पडू शकता.
    • कोणत्‍याही संसर्गाविरोधात लढण्‍यासाठी शरीर आरोग्‍यदायी ठेवण्‍यासोबत रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याकरिता संतुलित व आरोग्‍यदायी आहार सेवन करा.

    पावसाळ्यादरम्‍यान सामान्‍यपणे होणारे आजार त्रासदायक असण्‍यासोबत अत्‍यंत घातक देखील आहेत. आपल्‍या डोळ्यांना होऊ शकणारे सामान्‍य संसर्ग पुढीलप्रमाणे:

    कॉन्‍जक्टिव्‍हीटीस (डोळे येणे) किंवा आय फ्लू म्‍हणून प्रचलित: या आजारामध्‍ये डोळ्यांची जळजळ होते किंवा आपल्‍या डोळ्यातील सफेद भाग लालसर होतो. हा आजार अत्‍यंत संसर्गजन्‍य असण्‍यासोबत लहानात लहान संपर्काच्‍या माध्‍यमातून देखील पसरतो. हा आजार काही दिवसांमध्‍येच बरा होत असला तरी डोळ्यांचे संरक्षण करणे आवश्‍यक आहे.

    स्‍टाई हा एक संसर्ग आहे, ज्‍यामध्‍ये पापण्‍यांच्‍या टोकाजवळ लाल वेदनादायी ढेकूळ तयार होते, जे फोड किंवा मुरमासारखे दिसू शकते. स्‍टाईजमध्‍ये पू भरलेला असतो आणि कधी-कधी ते पापण्‍यांच्‍या आतील भागामध्‍ये देखील तयार होऊ शकतात. काही दिवसांमध्‍येच स्‍टाई दिसेनासे होईल, पण नियमितपणे उबदार पाण्‍यामध्‍ये कपडा बुडवून त्‍या भागाची स्‍वच्‍छता राखली तर वेदना व असह्यतेपासून आराम मिळण्‍यामध्‍ये मदत होईल. ती फोड फोडण्‍याचा प्रयत्‍न करू नका, अन्‍यथा आजार अधिक जटिल होईल.

    कॉर्नियल अल्‍सर या आजारामध्‍ये कॉर्नियावर फोड येतात. त्‍यामधून सतत पू बाहेर येत राहतो, खूप वेदना होतात आणि अंधुक दिसते. हा गंभीर स्‍वरूपाचा आजार आहे, ज्‍यामध्‍ये दृष्‍टी जाऊ शकते आणि योग्‍य उपचार केला नाही तर कायमस्‍वरूपी आंधळेपणा येऊ शकतो.

    दरवर्षाला डोळ्यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्‍या डोळ्यांच्‍या डॉक्‍टरांना रेटिनामधील रक्‍तवाहिन्‍यांचे आरोग्‍य व स्थितीचे निरीक्षण व तपासणी करण्‍यामध्‍ये मदत होते. या रक्‍तवाहिन्‍यांच्‍या आरोग्‍याचा संपूर्ण शरीरावर होणाऱ्या परिणामांचे उत्तम अनुमान काढता येतात.

    (लेखिका इंडस हेल्‍थ प्‍लसच्‍या प्रिव्‍हेन्टिव्‍ह हेल्‍थकेअर स्‍पेशालिस्‍ट म्हणून कार्यरत आहेत.)