चीनला वेळीच आवरायला पाहिजे ; अशक्यतांनी भरलेले जागतिक राजकारण

चायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच नष्ट करणे भारत व अमेरिकेच्या हातात आहे. मागील काही वर्षात जागतिक राजकारण हे मोठ्या प्रमाणावर बदलते आहे. जसा काळ बदलतो तसे विविध राष्ट्रांच्या आघाडी व मैत्री संबंधात बदल होताना दिसत आहेत.

    एकमेकांशी वर्षानुवर्षे मित्र असलेली राष्ट्र आज एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे चित्र पाहण्यास मिळते. तसेच पूर्वपरंपरापार एकमेकांचे शत्रू असलेली राष्ट्रे आज मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करताना दिसत आहेत. थोडक्यात, सध्याच्या काळात जागतिक राजकारण हे अशक्‍यतांनी भरलेले आहे. आधुनिक राजकारणाची सुरुवात ही ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीने झाली असे म्हटले जाते.

    औद्योगिक क्रांतीपासून ते पहिले महायुद्ध हा जागतिक राजकारणाचा पहिला टप्पा होय. पहिल्या महायुद्ध समाप्तीनंतर संयुक्‍त राष्ट्राच्या स्थापनेपर्यंतचा काळ हा जागतिक राजकारणाचा दुसरा टप्पा समजला जातो. शीतयुद्धाचा काळ हा सन १९९१ च्या सोव्हिएत रशियाच्या विभाजनापर्यंत मानला गेला, तो जागतिक राजकारणाचा तिसरा टप्पा होय.

    सन १९९१ पासून ते आजपर्यंत हा जागतिक राजकारणाचा चौथा टप्पा असून या काळात जागतिक राजकारणात जितक्या अशक्यता भरल्या आहेत तितक्‍या मागील काळात कधीही भरल्या गेल्या नव्हत्या. सोव्हिएत रशियाच्या विघटनापर्यंत जगात दोन महासत्ता राज्य करताना दिसल्या. एक गट अमेरिकेच्या गोटात शिरला तर दुसरा गट सोव्हिएत रशियाच्या गोटात दिसला. परंतु, सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अमेरिकेला स्पर्धा देणारे राष्ट्रच अस्तित्वातच नसल्यामुळे मागील ३० वर्षांत अमेरिकेने आपली मनमानी मोठ्या प्रमाणावर केली.

    काळानुसार जागतिक राजकारणात बदल होत असतात. मागील काही वर्षांत जपान, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका यासारख्या क्षेत्रीय सत्ता आपल्या क्षेत्रात प्रभाव टाकू लागल्या. वाढत्या महत्त्वाकांक्षेतून अमेरिकेच्या अस्तित्वाला हादरे देण्याचे काम सन २००४-२००५ पासून चीनने सुरू केले. आता चीन जागतिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे. अवाढव्य क्षेत्रफळ, प्रचंड मोठी लष्करी ताकद आणि खिशात असलेला अमाप पैसा या चीनच्या जमेच्या बाजू आहेत.

    चीनचा हिंदी महासागरातील वाढता हस्तक्षेप आणि लष्करी प्रभाव पाहून सन २००७ मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अबे यांनी समविचारी राष्ट्रांना एकत्र घेऊन ‘कॉड’ ही संकल्पना मांडली. पुढे काही काळाने या संकल्पनेला मूर्तरूप भारत, जपान, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या चार राष्ट्रांनी एकत्र येत ‘कॉड गट’ सुरू केला. वास्तविक पाहता या राष्ट्रांनी कॉड हा लष्करी किंवा चीनला दाबण्यासाठी बनविलेला गट असल्याचे कधीही मान्य केले नाही.

    चीनचा विचार केला तर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळापासून चीनने कॉडचा धसका घेतल्याचे चित्र आहे. हिंदी महासागरातील छोट्या राष्ट्रांनी भविष्यात कॉडमध्ये सहभागी होऊ नये म्हणून त्यांना धमकाविणे, पैशाचे आणि विकासाचे आमिष दाखविणे यांसारखे प्रकार चीनकडून सुरू आहेत. कॉडला प्रतिउत्तर म्हणून चीनकडून अशाच प्रकारचा गट बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत आहेत.

    कॉडला उत्तर देण्यासाठी चीनकडून पाकिस्तान, रशिया व इराण या राष्ट्रांना हाताशी धरून नवीन गट बनविण्याच्या हालचाली सुरू असून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या तज्ज्ञांनी चीनच्या नेतृत्वातील या ४ राष्ट्रांच्या गटाला ‘चायनीज कॉड’ असे नाव दिले आहे. सध्या चायनीज कॉड नावाचा कोणताही गट अस्तित्वात नाही.

    Impossible world politics