corona

जनतेने दसरा, दिवाळी आणि छटपूजेच्या वेळी संयम पाळला असला तरी कोरोनाची दुसरी लाट आली तर अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. म्हणून जनतेने नियमांचे पालन केले पाहिजे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट (Corona Second wave) आलेली अहे. परिस्थित फारच गंभीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी (Tsunami) सारखी ठरू शकते असे म्हटले आहे. ज्या लोकांनी त्सुनामी पाहिलेली आहे, त्यांना माहिती आहे की, समुद्रात २५ ते ३० फूट उंचीच्या पाण्याच्या लाटा उसळतात. या लाटा समुद्रकिना-यावर आल्यानंतर सर्वकाही उद्धवस्त करून टाकतात. लोकांना सावरण्याची संधीच मिळत नाही. जनतेने दसरा, दिवाळी आणि छटपूजेच्या वेळी संयम पाळला असला तरी कोरोनाची दुसरी लाट आली तर अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. म्हणून जनतेने नियमांचे पालन केले पाहिजे. प्रशासनावर पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आणू नये. अजूनपर्यंत कोरोनावर कोणतेही वॅक्सीन आलेले नाही, आगामी एक महिन्याचा काळ अत्यंत धोकादायक आहे. कार्तिक एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून लाखो लोक जात असतात. येथे लोकांनी गर्दी करू नये. कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडूच नये. आता लोकांनी स्वत:च स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

बेजबाबदारपणा जीवघेणा ठरु शकतो

दिल्ली, गुजरात, राजस्थानमध्ये कोरोनाची दुसरी-तिसरी लाट आलेली आहे. दिल्लीवरून दुबईला येणारी विमाने आणि रेल्वेगाड्यांवरही प्रतिबंध घालण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहे. संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात येत आहेत. लोकांनी गर्दीत जाणे टाळावे. आवश्यकता नसल्यास प्रवास करू नये. वेळोवेळी साबणाने हात धुवावे. सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे. वृद्ध लवकर संक्रमित होत असतात म्हणून त्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मास्क नियमित वापरणे आवश्यक आहे. खरेदीसाठी बाजारात जाणे, हॉटेलमध्ये जाणे आणि सिनेमागृहात जाणे टाळणे अत्यावश्यक आहे. ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय आहे, त्याचा वापर करावा. हे उपाय केल्यास कोरोनाची लागण टाळणे शक्‍य आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मागितली माहिती

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कोरोनाबाबत माहिती मागितली आहे. राज्यात ५७६० नवे कोरोनाबाधित झालेले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १८ लाखाच्या जवळपास पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४६५७३ झालेली आहे. २ टक्के कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडलेले आहेत. कोरोनामुळे रोगप्रतिकारशक्ती क्षीण होत असते. ज्यांना हृदयरोगाचा आणि मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना कोरोनाची भीती अधिक असते. कोरोनामुळे त्यांचा त्रास आणखी वाढत असतो आणि त्यांना वाचविणे मग कठीण होऊन जाते. सर्वोच्च न्यायालयाने २ दिवसात कोरोनाच्या एकूण परिस्थितीची माहिती महाराष्ट्र सरकारला मागितली आहे. कोरोना रुग्णांची संख्या, उपचारांकरिता केलेली व्यवस्था, रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी असलेल्या खाटांची संख्या इत्यादी माहिती सरकारला सर्वोच्च न्यायालयाला द्यावी लागेल.