पुराणातील वांगी नाटकात

मुंबई पुण्यासह बारामती, फलटण, कराड, तासगाव, मिरज, इंचलकरंजी, बेळगांव, कारवाड, निपाणी, भागवाड, बावडा, कागल, कुरुंदवाड, मुघोळ, जामखिंडी... इत्यादी ठिकाणी प्रयोग झाले. आजच्या सारख्या संपर्क यंत्रणा नसतांनाही उत्तम संघटन व चोख व्यवस्थापन असल्याने विष्णुदास भावे यांचे नियोजन आदर्श ठरले. पुढे त्यांच्या स्वाऱ्यांप्रमाणे अनुकरणही इतरांनी केले.

संजय डहाळे

ज्याप्रमाणे एका मागोमाग एक अशा शेकडो मुंग्या वारुळातून बाहेर पडतात तसं काहीसं नाटकांच्या विषयाचं, शैलीचं, सादरीकरणाचंही झालं होतं. पौराणिक आख्यानरुपी नाट्याने एकही पुराण विषय सोडला नाही. त्यासाठी तत्कालीन ऋ षीमुनी, पंडित, पुराणिक यांना तसेच देवस्थाने, धर्मशाळा, वाचनालये, संग्रह, तांब्रपट हे सारं अक्षरश: पिंजून काढलं गेलं. त्यातून मिळालेल्या एकेक गोष्टींना नाट्यरुप देण्यात आले. याचे यर्ग्थ वर्णन हे ‘पुराणातील वांगी पुराणात’ या वाक्प्रचाराऐवजी ‘पुराणतील गोष्टी नाटकात’ अशीच करावी लागेल….

पौराणिक विषयांवरील नाटकांची परंपराच सुरू झाली. पुराणातील एकही कथा त्याला अपवाद नव्हती. झाशीपासून हुबळीपर्यंत ही नाटके पोहचली. भावे यांच्या सांगलीकर नाटक मंडळींनी उभ्या महाराष्ट्र व कर्नाटक भरात एकूण सात स्वाऱ्या केल्या. त्यात मुंबई, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे मुक्काम केल्याची नोंद आहे. मुंबई पुण्यासह बारामती, फलटण, कराड, तासगाव, मिरज, इंचलकरंजी, बेळगांव, कारवाड, निपाणी, भागवाड, बावडा, कागल, कुरुंदवाड, मुघोळ, जामखिंडी… इत्यादी ठिकाणी प्रयोग झाले. आजच्या सारख्या संपर्क यंत्रणा नसतांनाही उत्तम संघटन व चोख व्यवस्थापन असल्याने विष्णुदास भावे यांचे नियोजन आदर्श ठरले. पुढे त्यांच्या स्वाऱ्यांप्रमाणे अनुकरणही इतरांनी केले.

रामायण, महाभारत, भागवत यांतील प्रसंगांवर घटनावरल्या नाटकांचा हा कालखंड. जो शंभर टक्के विष्णुदास भावे यांचा होता. यातल्या शोकांतिका प्रेक्षकांना अक्षरश: रडवित असत. हरिश्चंद्र आख्यान, भरत भेट, सीताहरण हे प्रसंग शोकरस पूर्ण होण्यासाठी नाट्यात अनेक चमत्कार, धक्कातंत्र अशा युक्त्याही करण्यात येत. कृष्ण, राम, भरत, प्रल्हाद, अिभमन्यू, भीम, वामन अवतार, सीता, रावण ही पात्रे आिण त्यांचा अिभनय याचे कौतुक होत असे. त्यात रंजन व अंजन घालण्याचाही प्रयत्न असायचा. तणाव दूर करण्यासाठी विदुषकाचेही चाळे त्यात असायचे. प्रत्येक कंपनीतल्या वीस ते पंचवीस कलाकारांसोबत एक करारपत्रही त्याकाळी विष्णुदासांनी केले होते. त्याचे अनुकरण पुढे इतर नाटक कंपन्यांनी केले. लेखी करार हा प्रकार तेव्हापासून नाट्यसृष्टीत आला.

विष्णुपंतांनी सादर केलेल्या रामायणातील आख्यानरुपी नाट्याला चांगला प्रतिसाद मिळायचा. दशरथ विवाह, रावण वध, पुत्रकामेष्टी यज्ञ, रामजन्म, सीताहरण, कुंभकर्णी, अश्वमेघ यज्ञ, अशी २२ आख्याने पौराणिक रामयणातील विष्णूपंतांनी त्यावेळी पेश केली. सोबत नरसिंह अवतार, गोपीचंद, रासक्रीडा, कंस वध, गणपती जन्म यावरही नाटके केली. सुत्रधार, विदूषक, ऋिषपार्टी, राक्षसपार्टी, देवपार्टी, स्त्री पार्टी, बालपार्टी अशा कलाकारांचा संच हा कायम प्रयोगाच्या वेळी पूर्ण गेटअपमध्ये सज्ज असायचा. त्यांना बघण्यासाठीही प्रेक्षकांची एकच गर्दी जमा व्हायची. त्यांचे मुखवटे आकर्षण ठरायचे.

तो काळ ब्रिटीशांचा मुंबापुरी तेव्हापासून कॉस्मोपॉलिटन सिटी. मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी या चारही भाषांत मनोरंजनासाठी नाटके होऊ लागली. विष्णुपंतांनीही काही मराठी आख्यान नाट्याचे प्रयोग हे हिंदीत केले. १ मार्च १८५३ या दिवशी ‘इंद्रजित वध’ या नाट्याचा प्रयोग ग्रँटरोड थिएटर इथे झाला. पुढे त्याचे बंबईया हिंदीतही प्रयोग झाले. मुंबई शहराचे आकर्षण हे अगदी तेव्हापासून रंगकर्मींना आहे. हिंदीतल्या ‘राजा गोपीचंद’मुळे अमराठी प्रेक्षकही मिळाले.

सांगली ते कोल्हापूर आणि पुणे-मुंबई अशा नाटकांचा प्रवास झालाय. नंतर तो वाढतच गकेला. मुंबापुरीत तशी काही नाट्यगृहे होती. १७७० साली युरोपियन दर्दी मंडळींनी वर्गणी जमा करून एिल्फन्स्टन सर्कल येथे एक नाट्यगृह उभारले. तिचे प्रामुख्याने इंग्रजी, पारशी नाटके होत होती. नंतर १८२० च्या सुमारास माटुंगा येथे आर्टिलरी थिएटर आले. तिथेही हौशी इंग्रजी रंगकर्मी सातत्याने प्रयोग करीत.

गिरगांवात एक आत्माराम शिंपी होते. रसिक माणूस, त्यांचा भलामोठा बंगला आणि त्याभोवती मैदान व बाग. त्या ठिकाणी विष्णुपंतांची पौराणिक नाटके झाल्याची नोंद मुंबईच्या इतिहासात आहे. ‘इंद्रजित वध’ आणि सुलोचना सहगमन तसेच नंतर अश्वमेघ यज्ञ आणि लवकुश यांचे प्रयोग झाले. गिरगांवकरांचा उदंड प्रतिसाद प्रयोगांना मिळाला. सोमवार, १४ फेब्रुवारी १८५३ या दिवशी गिरगांवातील प्रयोगाने चांगला नफा झाला. असे एके दिवशी विष्णुपंतांनी ठळकपणे नोंदविले आहे.

१८५३ पूर्वी मुंबईतील ग्रँट रोड थिएटरमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग हे झाले नव्हते. तिथला एका इंग्रजी नाटकाचा प्रयोग विष्णुपंतांनी बघितला. सारा श्रीमंती थाट, पडवे, दिवाबत्ती, प्रेक्षकांची सोय हे सारं काही त्यांनी जवळून बघितलं. ते भारावून गेले. या नाट्यगृहात युरोपियन मंडळींची मक्तेदारी होती. तत्कालीन प्रतिष्ठीत मुंबईकरांच्या मध्यस्थीने त्यांनी मक्तेदारी होती. तत्कालीन प्रतिष्ठीत मुंबईकरांच्या मध्यस्थीने त्यांनी बुधवार, ९ मार्च १८५३ या दिवशी ‘इंद्रजित वध’चा प्रयोग केला. प्रयोग रंगला. या मराठी प्रयोगाचा सविस्तर वृत्तांत ‘बॉम्बे टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिध्द केला. तो वृत्तांत व परीक्षण अभ्यासकांसाठी आजही उपलब्ध आहे.

संस्कृत नाटक, कानडी लोककला आणि नवे इंग्रजी तंत्र मंत्र याचे मिश्रण हे प्रामुख्याने या प्रारंभीच्या पौराणिक नाटकात दिसते. पारशी व इंग्रजी नाट्यप्रयोगाचा प्रभावही त्याकाळी मराठी नाट्य प्रयोगांवर झाला. गाणी, नृत्य, तलवारबाजी याने परिपूर्ण नाटकाचा प्रयोग रात्री ९ किंवा दहा वाजता सुरू व्हायचा. हा प्रयोग चक्क पहाटे चार वाजेपर्यंत चालायचा. प्रयोगापूर्वी व जाहिरातीत ‘बिडीकाडी, तंटा, दांडगाई वर्तणूक करणाऱ्यांना बाहेर घालविले जाईल’ अशी सक्त ताकिदच करण्यात येतहोती. खुर्चीवर एक रुपया तिकीट, ओट्यावर कमी दर असायचा. काहीदा प्रयोगानंतर कीर्तनाप्रमाणे आरतीची ताटली फिरवून पैसा गोळा केला जात असे. नाटकातून जो पैसा मिळायचा तो प्रत्येक स्वारीच्या अखेरीस समप्रमाणात वाटून देण्याचाही पायंडा विष्णुपंतांचाच. आज नाटकाचे पाकीट मिळते, त्याचे कुल व मूळ हे इथूनच झालेले.

१८४३ ते १८६२ हा कालखंड विष्णुदासांच्या पौराणिक नाटकांनी गाजला. पुढे पन्नास एक वर्ष अनेक नवे विषय, शैली जरुर आली पण पुराणातल्या गोष्टी पुराणात गेल्या नाहीत. तर त्या नाटकात आल्या. नाट्य आरंभ करण्यापूर्वी काही अभंग हे म्हटले जायचे. त्यातील एक

राघोबाची लीला गाता। हित पाप दोष चिंता।।१।।
जरी केले नामश्रवण तरी पातक हो दहन ।।२।।
नामस्मरणी निघे अंश पुसावा शिव वाल्मीकास ।।३।।
ऐसा राममहिमा थोर। विष्णुदास सांगे सार ।।४।।
अभंगाप्रमाणे शंकरस्तुतीही म्हटली जायची. ती अशी.
हे ब्रम्हांड नयंता । करी दास इच्छा सर्व पुरत्या।।१।।
कोणी इिच्छती दर्शन । कोणी मुक्ती मागताती नमुना ।।२।।
कोणी आपेक्षिती धन। कोणी राज्य, दारा, पुत्र कल्याण ।।३।।
दयानिधे करूणा करा । द्यावा विष्णुदासा पदीं थारा ।।४।।

१८६२ साली विष्णुपंतांनी अखेर नाटकापासून फारकत घेतली. त्यांची कंपनीही पडद्याआड गेली. तत्पूर्वीच्या काही स्वारीत सोबतच्या कलाकारांनी नवीन, स्वतंत्र नाटक कंपन्या स्थापन केल्या. एकेक करून काहीजण फुटू लागले. काहींनी तंटाही केला. या साऱ्यांचा मानसिक त्रास त्यांना होऊ लागला. रामराम म्हणण्याशिवाय पर्यारू नव्हता. मराठी माणसाला फाटाफुटीचा शाप असतोच. तेच घडले. नूतन सांगलीकर, सांगलीकर नवी कंपनी स्थापन झाल्या. पुढे गावाचे नाव असलेल्या मुंबईकर, सांगलीकर, इंचलकरंजीकर, आळतेकर, उंबरजकर, कराडकर अशा कमान डझनभर कंपन्या आल्या. जिकडे तिकडे नाटकेच नाटके. विष्णुदास भावे यांनी याकडे सकारात्मक नजरेतून बघितले. त्यांनी हा तर नाट्यकार्याचा गौरव आहे. असे मनोमनी मानलं.

पौराणिक धर्म संपला ‘चमत्काराचा धंदा आला’ १४७ वर्षांपूर्वीच्या नाट्य इितहासातील एक जाहिरात. जी थक्क करून सोडते. आळतेकर हिंदू नाटक कंपनीची निर्मिती असलेली आणि १८७३ साली प्रसिध्द झालेल्या या जाहिरातीतून तत्कालीन पौराणिक नाटकांवर, शैलीवर आिण रसिकांच्या मनोवृत्तीवर प्रकाश झोत टाकते. २३ ऑगस्ट, शनिवार १८७३ या दिवशीचा प्रयोग. स्थळ : पंचकचेरीतील बाळाचार्य पंडित यांचा वाडा. तिकीट विक्री : खेळाच्या म्हणजे प्रयोगाच्या जागी प्रयोगापूर्वी उपलब्ध. त्यात सवड बघून तिकीटांचे दर हे कमी जास्त करण्याचा उल्लेख आहे. देवेंद्र युध्दाचे आख्यान होते. पहिल्या भागात शीर व धड कापून दाखविण्याचा देखावा तर तिसऱ्या भागात आतडी पोट फाडून साखरभात दाखविण्याचा हुबेहूब देखावा असं म्हटलंय. ट्रीक सीनचा हा प्रकार. जो पुढे वाढत गेला. त्यामुळे नाट्य कुठेतरी हरविले.

पारशी नाटकातील तांत्रिक प्रकार आिण जादुगिरी तसेच इंग्रजी नाटकांती धंदेवाईक प्रवृत्ती ही त्यावेळी पौराणिक नाटकात अलगदपणे आली. पुढे तिला कुणी रोखू शकलं नाही. नाटकासाठी गर्दी जमावी यासाठी काही आकर्षण, प्रलोभने, तिकीटदरातील सवलती या दाखविण्यात येत असत. त्यातून पुढे बुकींग वाढविण्याची चढाओढ सुरू झाली. एक धंदा म्हणून त्याकडे बघण्यात आलं. पौराणिक नाटकांचा विष्णुदास भावे यांनी जो दर्जा व प्रतिष्ठा उभी केली होती ती घसरली. अश्लील, बीभत्स, ओबडधोबड प्रकार सर्रास सुरू झाला. एका जाहिरातीत तसेच भित्तीपत्रात १८७६ साली म्हटलं होतं. ते शब्दश:. ‘स्नेह केल्यापासून अती परिणाम! एका उत्तम स्त्रीने एका प्रेताशी केलेला शृंगार!! बघा मनोवेधक!!’