स्वातंत्र्यानंतर प्रथमच विषम परिस्थितीत स्वातंत्र्य दिन

कोरोना महामारीने आनंदावर विरजण पडले आहे. भस्मासुरासारखी ती जगाच्या पाठीमागे लागली आहे. यातून चिंता, उदासपणा व अनिश्चितता सर्वत्र दिसत आहे. सोबतच चीनसारख्या शेजाऱ्याचा कुचीनपणा 'आ' वासून उभा आहे. पाकिस्तानसह आता नेपाळही फणा काढून तयार आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आम्ही देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहेत. इकडे-तिकडे चहूकडे बघितले तर सामान्य स्थिती कुठेच दिसणार नाही. असामान्य स्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची पाळी आमच्यावर आली आहे. दिल्लीच्या लालकिल्ला परिसरात लाख-हजारोंची उपस्थिती आज दिसणार नाही. सुरक्षा परेडला मास्क परिधान करुन सोशल डिस्टंसिंग ठेवावे लागेल. अशीच काहीशी स्थिती राज्या-राज्यांत अनुभवास येईल. कोरोना महामारीने आनंदावर विरजण पडले आहे. भस्मासुरासारखी ती जगाच्या पाठीमागे लागली आहे. यातून चिंता, उदासपणा व अनिश्चितता सर्वत्र दिसत आहे. सोबतच चीनसारख्या शेजाऱ्याचा कुचीनपणा ‘आ’ वासून उभा आहे. पाकिस्तानसह आता नेपाळही फणा काढून तयार आहे. हा भाग आमच्या आनंदावर विरजण घालणारा ठरत असला तरी हिंमत मात्र आमची कायम आहे. त्या हिंमतीच्या भरवशावरच संकटांचा सामना करण्यात आम्ही तत्पर आहोत. 

शिक्षणावर विपरीत परिणाम 

शिक्षण हे राष्ट्राचे भविष्य निर्धारित करीत असते. पण, आज नामांकित शिक्षण संस्थांना कुलूपं ठोकल्या गेलीत. ऑनलाईनचे व्हर्च्युअल क्लासेस म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविण्याचा प्रकार समजावा लागेल. ज्याच्याकडे स्मार्टफोन व लॅपटॉपची व्यवस्था नाही तो हुशार विद्यार्थीही आज कोलमडल्यात जमा आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेची स्थिती ना घरकी ना घाटकी समान झाली आहे. युजीसी परीक्षा देता डिग्री देण्याच्या मनस्थितीत नाही. कोरोनात परीक्षा घेणार तरी कशा? पालकांना आपल्या पाल्यांच्या भविष्याची चिंता सतावत आहे. शिक्षकांना नोकरी व पगाराची चिंता आहे. 

चिनी-पाकिस्तानी संकट 

कुचीन व विस्तारवादी चीनने एलएसीवर अतिक्रमण केले आहे. चीनचे अतिक्रमण हटविण्यासाठी आमच्या जवानांनी प्राण पणास लावले. लडख सीमेवर स्थिती चिंताजनक आहे. गलवान घाटीत संघर्ष झाला तरी चीन आपले खुटीउपाड कामे बंद करायला तयार नाही. संवादाचे ढोंग रचून चीन आपला कार्यभाग साधण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानने या बिकट स्थितीचा फायदा उचलण्याचे ठरविले आहे. सीमेवर अधूनमधून गोळीबार करण्याचे पाकने थांबविले नाही. दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. नेपाळसारखा सुपारीएवढा देशही गुरगुरत आहे. यासाठी आम्हाला जागे राहावे लागेल. 

नोटबंदीनेही एवढी स्थिती विषम नव्हती 

नोटबंदीतही आमची स्थिती एवढी विषम झाली नव्हती जेवढी आज लॉकडाऊनमुळे झाली आहे. जनता ५ महिन्यांपासून हे संकट झेलत आहे. स्वप्नातही आम्ही या संकटाची कल्पना केली नाही. लाखो प्रवासी मजुरांचे प्राण लॉकडाऊनमुळे गळ्याशी आलेत. शहरातील व्यापार-उद्योग चौपट झाले आहे. मोठमोठ्या कंपन्या मुंगीच्या गतीने काम करु लागल्यात. फॅक्टरी बंद असल्यामुळे उत्पादन ठप्प झाले. बेरोजगारी प्रचंड वाढली. हजारो-लाखो कुटुंबावर दारिद्र्याचे संकट उभे आहे. शेती उद्योग हे संकट झेलू शकत नाही. देशात नोकऱ्या अन विदेशातूनही नोकऱ्यांचे उच्चाटन झाल्यामुळे बेरोजगारीचे संकट दुसऱ्या महामारीचे रुप धारण करण्याची भीती उभी झाली आहे. खाडीच्या देशांनी भारतीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार उभा करुन दिला होता. तो गमविल्या गेल्यामुळे वंदेमातरम मिशनअंतर्गत खाडी देशातून बेरोजगार भारतीयांना परत घेऊन येण्याचे काम आम्ही सुरु केले आहे. कुशल कामगारांवर अकुशल कामे करण्याची पाळी आली आहे. 

लॉकडाऊनचा जबरदस्त प्रभाव 

लॉकडाऊनमुळे स्वयंरोजगारावर तर संक्रांतच कोसळली आहे. फुटपाथ दुकानदार, फेरीवाले, चालता, फिरता खाण्या-पिण्याची व्यवस्था सांभाळणारे ठेले, हॉटेल, रेस्टॉसरंट, हातठेले, टॅक्सी-ऑटोचालक, मंदिर परिसरातील फुलवाले, प्रसाद-पूजेचे साहित्य विकणारे, सलूनवाले सर्वांना लॉकडाऊनने बधीर केल्यामुळे स्वयंरोजगाराची स्थितीच दिव्यांग झाली आहे. लग्नसराईवर लॉकडाऊनचा कुप्रभाव पडल्यामुळे मंगल कार्यालये, लॉन्स ओस पडली आहेत. बँडवाल्यांचा बँड वाजला आहे. कोरोना पीडिताचा मृत्यू झाला तरी घरची मंडळीही अंतिम संस्काराला जाऊ शकत नाही. त्यानाही रीतसर परवानगी घ्यावी लागते. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षात कधी एवढी कठीणतम स्थिती वयोवृद्धांनी अनुभवली नाही. दुकाने उघडली पण ऑड-इवनने सारे काही बिघडले आहे. उच्च, मध्यम, गरीब सर्वांवर कोरोनाचा कुप्रभाव पडला आहे उत्पादन ठप्प पडल्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंचे बाजारातून उच्चाटन झाले आहे.