भारत-मॉरिशस संबंध हितकारक

भारताने मॉरिशसबरोबर केलेला खुल्या व्यापाराचा करार अनेक पातळ्यांवर भारतासाठी उपयुक्‍त ठरणार आहे. हा करार मॉरिशसबरोबर संबंध अधिक विस्तारण्यासाठी हितकारक आहेच; शिवाय, हे संबंध अधिक उन्नत स्तरावर नेण्यासाठीही उपयुक्‍त ठरणार आहे. खुल्या व्यापारामुळे दोन्ही देशांमधील संबंध नवी उंची गाठतील, अशी अपेक्षा आहे.

    हिंदी महासागरात भारताच्या नैऋत्येस असलेला मॉरिशस हा छोटासा देश ‘लिटल इंडिया’ नावाने ओळखला जातो. सर्वच बाबतीत भारताशी खूप निकटता सांगणारा हा देश. स्वतंत्र बेट असलेल्या या देशाची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या *सागर’ (सुरक्षितता आणि क्षेत्रातील सर्व देशांचा विकास ) योजनेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेच; शिवाय हिंदी महासागराच्या क्षेत्रात भारताचा सर्वांत महत्त्वाचा शेजारी म्हणूनही मॉरिशस महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक संपन्नता, नियमित उच्चस्तरीय राजनैतिक संपर्क, विकासातील सहकार्य, संरक्षण आणि सागरी क्षेत्रातील सहकार्य अशा सर्व बाबतीत भारत आणि मॉरिशस यांच्यात घनिष्ट संबंध आहेत.

    परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यातून मॉरिशसचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरला. भारताशी मुक्‍त व्यापाराच्या करारावर स्वाक्षरी करणारा मॉरिशस हा आफ्रिकी क्षेत्रातील पहिला देश ठरला आहे. व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारीबरोबरच आफ्रिका खंडात व्यापार, वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात नवनवीन संधी प्रदान करून व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ देणारा हा करार आहे. मॉरिशसचे भौगोलिक स्थानच त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

    मॉरिशस हे आफ्रिकेच्या प्रवेशद्वारासारखेच आहे. भारतीय व्यावसायिक या करारामुळे मॉरिशसमध्ये आणि संपूर्ण आफ्रिका खंडात गुंतवणूक करू शकतील. परराष्ट्रमंत्र्यांचा हा दौरा हिंदी महासागरातील भारतासाठी व्यूहात्मक दृष्टीनेही सफल ठरला आहे. कारण सध्या हिंदी महासागराच्या क्षेत्रात भार भक्‍कम स्थितीत आहे. भारत आणि मॉरिशसदरम्यान द्विपक्षीय व्यापार २००५-०६ मध्ये २०७ दशलक्ष डॉलरचा होता. २०१९-२० पर्यंत तो वाढून ६९० दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचला. ही वृद्धी २३३ टक्के इतकी आहे. मॉरिशसमध्ये भारताची निर्यात याच अवधीत १९९ दशलक्ष डॉलरवरून वाढून ६६२ दशलक्ष डॉलरवर पोहोचली. आयात सात दशलक्ष डॉलरवरून वाढून २८ दशलक्ष डॉलरवर पोहोचली.

    आता ‘मॉरिशसबरोबर झालेला मुक्‍त व्यापाराचा करार हा आफ्रिकेबरोबरील भारताच्या व्यापारी संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहेच, शिवाय हिंदी महासागरातील भूराजकीय स्थितीच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा ठरणार आहे.जानेवारी २०२१ मध्ये चीननेही ‘मॉरिशसबरोबर मुक्‍त व्यापाराचा करार केला आहे. चीनचा मॉरिशससोबत द्विपक्षीय व्यापार २०१८ मध्ये १८५ अब्ज डॉलर होता तो २०२० मध्ये १९२ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव हे भारतासाठी मोठे आव्हान आहे. मॉरिशसबरोबर भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी जयशंकर यांनी मॉरिशससाठी १०० दशलक्ष डॉलरच्या कर्जाचीही घोषणा केली आहे.