शेती समद्धी हीच काळाची गरज? बऱ्याच प्रश्नांचा तिढा अजून सुटणे बाकी असून यावर काळ हाच रामबाण उपाय आहे

पावसाच्या आनंदसरी कोसळत असताना आणखी एक आनंददायी घटना घडते आहे आणि ती म्हणजे कोरोनाची दुसरी लाट (CoronaVirus second wave) देशात (India) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) ओसरते आहे. कोरोना विरुद्धची लढाई वाटते तितकी सोपी नाही. अनेकांची त्रेधातिरपिट उडाली आहे . आपण पण देश म्हणून या लढाईत उतरलो आहोत.

  सर्वांचे लसीकरण आणि या संकटातही संधी शोधून काही नवे चांगले आणि भारत देशाला समृद्ध करण्याचे प्रयत्न होत आहेत. राजकारण आणि राजकीय टीका-टिपण्णी सुरु राहणारच पण पावसाच्या आनंदसरी सोबत दोन वार्ता आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे आणि राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध सोमवारपासून शिथिल होत आहेत.

  टप्प्याटप्प्याने सारे जनजीवन सुरळीत आणि अनलॉक करुन पूर्ववत करण्यासाठी पावले टाकली जात आहेत. लालपरी अर्थात सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी उपयुक्‍त परिवहन सेवेची गाडी जिल्हा अंतर्गत व आता राज्यात धावणार आहे. त्यासाठीची तयारी झाली आहे. पहिली लाट संपली आणि आपण असाच मोकळा श्‍वास घेत रस्त्यावर आलो आणि कोरोनाची महाभयंकर दुसरी लाट आली.

  हा महाभयानक अनुभव आपण घेतला आहे. या दुसर्‍या लाटेत अनेकांचे जीव गेले, अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. अनेकांचे उद्योग-व्यवसाय बंद पडले. नोकऱ्या गेल्या, स्थलांतर झाले. एक ना दोन. संकटामागून संकटे आणि तडाख्या मागून तडाखे. त्यामुळे लाट ओसरत असली तरी कोरोनासाठीची शिस्त ओसरता कामा नये.

  कोरोनाची भीती कायम राहणार आहे. आता आपण सर्वांना नवी आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करावी लागणार आहे त्याशिवाय तरणोपाय नाही. स्वच्छता आणि काळजीपूर्वक व्यवहार आणि पर्यावरणपूरक वर्तणूक याला पर्याय नाही हे लक्षात घेतले पाहिजे. देशात कोरोनाचा संसर्ग दर साडे एकवीस टक्के होता तो घटून साडेसहा टक्क्यावर आला आहे. रुग्ण संख्याही कमी होते आहे. कोरोनाबाधित बरे होत आहेत. सक्रिय रुग्णसंख्या झपाट्याने घसरत आहे. हा आनंदाचा भाग असला तरी धोका कायम आहे आणि म्हणूनच अखंडपणे सावध राहिले पाहिजे.

  जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष. शाळा, महाविद्यालये यांचे प्रारंभ पण अजूनही त्या क्षेत्रात कोरोनाची दहशत आहे. एक म्हणजे तिसरी लाट येणार व ती लहान मुलांना फटका देणार असे बोलले जाते आहे, सांगितले जाते आहे. त्या सांगण्याला काय आधार हे कळत नाही. पण भीती कायम आहे. दहावी, बारावी परीक्षांचे घोळ झाले आहेत.

  आता नवे शैक्षणिक वर्ष कसे सुरु होणार, केव्हा होणार आणि कुणाला कसे प्रवेश मिळणार हे बघावे लागेल. शैक्षणिक क्षेत्रातही पिपासूवृत्ती आणि बाजारु प्रवृत्ती आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनानंतरचे जग आणि भारत कसा असेल ते बघावे लागेल. पण पुढची लाट लहान मुलांत आणि कोरोना रूप बदलतो आहे. या चर्चेची भोती किंवा दहशत कायम आहे.

  ओघानेच शाळा सुरु करणे असो, पंढरीची पायी वारी असो, विठ्ठल दर्शन असो अथवा लग्न समारंभ, अधिवेशने वा आंदोलने असोत ती महागात पडण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय तप्त आहे. मोर्चे, आंदोलने यांची रणवाद्ये वाजत आहेत. राजकारणात नव्या सोयरिकी आणि नवी पावले टाकण्याचे मनसुबे समोर आले आहेत. स्वबळाची आणि पाठीत खंजीर वगैरे भाषा नेत्यांनी सुरू केली आहे.

  राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशनात कसे व केव्हा होणार हा सुद्धा प्रश्‍न आहे. पण् या सार्‍या दडपणातही पाऊस वेळेवर आला. येणार आणि आनंदसरी महाराष्ट्रात, देशात बरसत आहेत याचा अधिक आनंद आहे. लसीकरणाला वेग द्यायला हवा आणि बळीराजाला खरिप यशस्वी करण्यासाठी बळ द्यायला हवे.

  Is this the need of the hour for agricultural prosperity Many questions remain unresolved and time is the panacea