किती गेले माहीत नाही, प्रवासी मजुरांबाबत केंद्राची अमानवीयता

६८ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये घरी परत जाण्यासाठी निघालेल्या किती मजुरांचा मृत्यू झाला असा हा सरळ प्रश्न होता. तसेच या मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी मजुरांच्या कुटुंबीयांना सरकारने काय मदत केली. पण, श्रममंत्रालयाच्या वतीने जे उत्तर देण्यात आले त्याने माणसाला सोडा गाढवांनाही ताप येईल.

सरकार शब्दाची फोड करायची तर बेजबाबदार, टुकार, भिकार, ठासून भरलेला अहंकार यापेक्षा वेगळी करता येणार नाही. सरकारला (government) कुठलाही प्रश्न विचारा तर धड उत्तर मिळणार नाही. मंत्र्यांना भत्ता, अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मग कुणी बेरोजगार असो की वेठिबिगार त्यांना काहीच देणे घेणे नसते. काल परवा प्रवासी (migrant workers) मजुरांच्या संदर्भात एक प्रश्न लोकसभेत विचारला गेला. ६८ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये घरी परत जाण्यासाठी निघालेल्या किती मजुरांचा मृत्यू झाला असा हा सरळ प्रश्न होता. तसेच या मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी मजुरांच्या कुटुंबीयांना सरकारने काय मदत केली. पण, श्रममंत्रालयाच्या वतीने जे उत्तर देण्यात आले त्याने माणसाला सोडा गाढवांनाही ताप येईल. सरकार म्हणाले, आमच्याकडे किती मृत्यू झाले याची आकडेवारी नाही. जेव्हा आकडेवारी नाही तेव्हा मदत देण्याचे काम कसे होईल? सरकारच्या या उत्तराने ते किती भिकार आहे हे स्पष्ट केले आहे. मुंबई, दिल्ली, गुजरात, पंजाब, दक्षिणेतील राज्यातून हजारोंच्या संख्येने प्रवासी मजूर आपापल्या गावाकडे परत निघाले. माहामार्गावर लोकांचे थवेच्या थवे रात्र प्रवासात दिसत होते. पण, सरकारचे त्यांच्याकडे अजिबात लक्षच नव्हते. १९४७ च्या फाळणीवेळी जसे स्थलांतर झाले होते तसाच प्रकार देशांतर्गत लॉकडाऊनमध्ये झाला. लॉकडाऊनमुळे जॉब गमावल्यानंतर २-४ दिवस पुरेल एवढी साधनसामुग्री मजुरांकडे होती. त्यानंतर मात्र त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला व कशाचा विचार न करता मंडळी आपापल्या गावाकडे रवाना होऊ लागली. मोदींनी आव-ताव न पाहता व कुणाचा विचार न करता नोटबंदी समान लॉकडाऊनची घोषणा केली होती. कुटुंब कबिल्यांसह मजूर जेव्हा पायीपायीच गावांकडे रवाना होऊ लागली तेव्हा त्यांना आर्थिक, आरोग्यासह अनेक संकटांचा सामना करावा लागला. जे संकटांचा मुकाबला करु शकले ते टिकले. इतरांना मात्र प्राणच सोडावा लागला. गेल्या काही वर्षात मते पळविणारी एक जमातच देशांतर्गत सक्रिय आहे. कुणी रेल्वे ट्रॅकवरुन प्रवास करु लागले तर अनेकांनी महामार्गाचा आधार घेतला. एका ठिकाणी रेल्वे ट्रॅकने प्रवास करणाऱ्या मजुरांना झोप आल्यामुळे ते तेथेच आडवे झाले. त्या मार्गावरुन जाणाऱ्या एका मालगाडीने त्यांना चिरडले. एनजीओ सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या मते २४ मार्च ते २ जून दरम्यान प्रवासी मजुरांच्या जालेल्या मृत्यूची संख्या १९८ एवढी आहे. महाराष्ट्रात रेल्वे ट्रॅकवर १६ मजुरांचे बळी गेलेत. १४ मे रोजी मध्यप्रदेशातील गुना येथे ट्रॅक-बस टक्करीत ८ मजुरांचा मृत्यू झाला. १६ मे रोजी उत्तरप्रदेशात ओरेयामध्ये ट्रक अपघात २४ मजुरांचा बळी गेला. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक प्रतिक्रिया दिली. ‘उनका मरना देखा जमाने ने, एक मोदी सरकार है जिन्हे खबर ना हूई.’