हे आता येत्या काळात कळेलच; निवडणुकीच्या पायाभरणीसाठी सोशल इंजिनिअरिंग

केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी सायंकाळी विस्तार झाला. भाजपाने या निमित्ताने एक मोठी खेळी खेळत आगामी ७ राज्यांतील विधानसभा अणि मुंबई महापालिकेसह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पायाभरणी केली. दुसरी, तिसरी आघाडी भाजपविरोधी शक्तीचे संघटन आणि शरद पवार व प्रशांत किशोर यांचे मनसुबे यांना मोदी- शहांनी थेट शह देणारी चाल खेळली आहे. याचबरोबर शतप्रतिशत भाजपा कार्यक्रमासाठी व भाजपातील निष्क्रिय प्रस्थापितासाठी व उपद्रवी लोकांना कृती संदेशही दिला आहे.

  कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोदी सरकारची कामगिरी बरी राहिली पण दुसरी लाट फारच तडाखा देणारी ठरली. या लाटेत मोदी सरकारच्या प्रतिमेला आणि कारभाराला मार बसला. विशेषतः ऑक्सिजन नाही आणि गंगेत मृतदेह यामुळे जागतिक पातळीवरही टीका झाली. यातून सावरणे, त्याच जोडीला तरुण चांगली कुमक मैदानात उतरवणे व सोशल इंजिनिअरिंग साधताना आगामी निवडणुकीची पायाभरणी करणे असे उद्देश ठेवून पंतप्रधान मोदींनी हा विस्तार केला.

  कुणी या विस्ताराला चेहरा बदलला म्हटले आहे. कुणी कात टाकली असे याचे वर्णन करत आहे तर कुणी पुनर्रचना म्हणत आहेत. शब्द कुठलाही असला तरी अर्थ तोच आहे. मोदींनी मंत्रिमंडळात ३६ नव्या चेहऱ्यांना संधी दिली. सहकारसारखे नवे खाते निर्माण केले. अकार्यक्षम बारा मंत्र्यांना बाजूला सारले आणि मित्रपक्षांना जवळ घेत मंत्रिमंडळाची संख्या ७६ पर्यंत नेली.

  मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळावर नजर टाकली तर एक जाणवते ते म्हणजे हे मंत्रिमंडळ समतोल करण्याचा उत्तम प्रयत्न झाला आहे. प्रत्येक राज्यातून एका तरी महिलेला संधी दिली आहे आणि सोशल इंजिनिअरिंग साधताना मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना जाणीवपूर्वक संधी दिली आहे. विस्तार करताना प्रत्येक राज्याचे स्थानिक प्रश्‍न, राजकारण आणि संभाव्य समस्या याचाही या विस्तारात विचार झालेला दिसतो. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेताना ‘सब का साथ सब का विकास’ हे घोषवाक्यही काही प्रमाणात विचारात घेतलेले दिसते.

  महाराष्ट्राबद्दल विचार करायचा तर या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे अनेक अर्थ आहेत आणि सर्वात मोठा अर्थ म्हणजे आता भाजपा-सेना युती होणार नाही. भाजप शरद पवारांशीही जमवून घेणार नाही हे स्पष्ट झाले. भाजप महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्नच राबवणार आणि विजय खेचून आणण्यासाठी टोकाचा संघर्ष करणार. शिवसेनेच्या विरोधातही आता भाजप संघर्ष करणार हे स्पष्ट झाले आहे. नारायण राणे यांना दिलेली संधी उगाच नाही.

  शिवसेनेच्या ‘अरे ला कारे’ करण्याची त्यांची धमक आणि मराठा आरक्षणासह मुंबई पालिका आणि कोकणचा विचार करून भाजपाने उचललेले हे पाऊल आहे. महाराष्ट्रात राणेंच्या सोबत कपिल पाटील, डॉ. भारती पवार, भागवत कराड यांना संधी दिली आहे. भाजपाचे त्यामागे राजकीय हिशेब आहेतच. जोडीला भागवत, कराड या वंजारी नेत्यांना संधी देऊन भाजपाने पक्षात वेगळी भूमिका घेणाऱ्यांना चुणूक दाखवली आहे.

  प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद, डी. व्ही. सदानंद गौडा, संजय धोत्रे, देवश्री चौधरी, निशांक पोखरियाल आदी बारा मंत्र्यांना वगळले त्यामागे त्यांची कामगिरी फारशी प्रभावी नव्हती हे उघड आहे. रोजगारनिर्मिती, महामारी नियंत्रण, लसीकरण यामध्ये मोदी सरकारला जी टीका सहन करावी लागली त्याचा फटका या मंत्र्यांना बसला आहे. भाजपाने या विस्तारात नवे, जुने, प्रस्थापित, हेवीवेट असा कोणताही विचार फारसा केला नाही. ज्यांचे काम चांगले, लोकसंपर्क चांगला आणि जे पक्षाला सदासर्वदा उपयुक्‍त आहेत त्यांनाच संधी दिली आहे.

  It will be known in the near future Social engineering for the foundation of elections