शांतता व सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील असताना जम्मूत दहशतवाद्याचा ड्रोन हल्ला…

जम्मू काश्मिरात जेव्हा ,केव्हा शांततेसाठी प्रयत्न सुरू होतात तेव्हा पाकिस्तान अस्वस्थ होतो. त्या अस्वस्थेतून आपल्या पाळीव दहशतवाद्यांना तन, मन, धनाने सक्रिय करून जम्मू, काश्मिरात मोहिमेवर पाठवितो. काल,परवाचा ड्रोन दहशतवादी हल्ला हा यापेक्षा वेगळा नाहीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी नेत्यांना चर्चेस पाचारण केले व राज्यात विधानसभा निवडणुका घेण्याबाबत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

  जम्मू काश्मिरात जेव्हा ,केव्हा शांततेसाठी प्रयत्न सुरू होतात तेव्हा पाकिस्तान अस्वस्थ होतो. त्या अस्वस्थेतून आपल्या पाळीव दहशतवाद्यांना तन, मन, धनाने सक्रिय करून जम्मू, काश्मिरात मोहिमेवर पाठवितो. काल,परवाचा ड्रोन दहशतवादी हल्ला हा यापेक्षा वेगळा नाहीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी नेत्यांना चर्चेस पाचारण केले व राज्यात विधानसभा निवडणुका घेण्याबाबत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. या चर्चेत हुरियतच्या नेत्यांना सहभागी न करता इतर पक्ष व सर्वच माजी मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आले होते. पाकिस्तान व त्याचे बगलबच्चे दहशतवादी यांना दिल्लीची बैठक रुचली नाही. जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया सुरू होऊन तेथे लोकशाही प्रक्रियेतील सरकार अधिकारावर येईल या भीतीपोटी ड्रोन हल्ला म्हणजे अवलक्षणाचा भाग असेच काहीसे स्पष्ट करता येईल. दहशतवाद्यांनी जम्मू एअरफोर्स स्टेशनच्या टेक्निकल भागात दोन ड्रोन हल्ले केले. यात दोन जवान किरकोळ जखमी झालेत.

  लष्करवर शंका

  या ड्रोन हल्ल्यात लष्कर- ए-तोयबाचा हात असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. लष्कर व जैशसारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या इशाऱ्यावर असे हल्ले करीत असल्याचा पूर्वानुभव आहेच. ड्रोनच्या माध्यमातून होणारे हल्ले हे नेहमीच बुचकळ्यात टाकतात. कुणाच्या आदेशाने वा सहभागातून हल्ला झाला हे लवकर समजू शकत नाही. हा गनिमी पद्धतीने झालेला हल्ला असतो. अशा हल्ल्यासाठी खर्च कमी येतो व त्याचा मारा अचूक साधल्या गेला तर नुकसानही फार मोठे होते. दहशतवादी अशा पे लोडमध्ये आयडीचा वापर करू शकतात. दहशतवाद्यांसाठी थेट सुरक्षा व्यवस्थेवर आघात करण्यासाठी एअरस्ट्राईकपेक्षा ड्रोनचा वापर अधिक सोपा आहे.

  सौदी अरबमध्ये असाच हल्ला झाला होता

  सप्टेंबर 2019 मध्ये इराण समर्थित होउथी अतिरेक्यांनी सौदी अरबच्या आर्मको तेल रिफायनीवर तसेच तेल विहिरींवर स्फोटकांसह ड्रोन हल्ले केले होते. यात तेल साठ्यांना आग लागली होती. सौदीचे यात बरेच नुकसान झाले होते. या हल्ल्यामुळे तेल उत्पादक अरब देश बरेच चिंतित झाले होते. उल्लेखनीय असे की, पंजाब पॊलिसांनी आंतरराष्ट्रीय सीमा भागात तोडमोड झालेले दोन ड्रोन जप्त केले होते.

  उपाययोजना आवश्यक

  भारतीय सेनेला आता आपल्या संरक्षणार्थ आधुनिक साहित्यांनी सज्ज राहावे लागेल. लहान ड्रोनचीही ओळख होईल, असे सूत्र वापरावे लागेल. उंचावर उडणारे हेलिकॉप्टर व विमानांचा शोध रडारच्या माध्यमातून घेता येईल पण कमी अंतरावरील उडणाऱ्या ड्रोनबाबत त्याचा वेध घेणारी यंत्रणा आम्हाला सुसज्ज ठेवावी लागेल. डीआरडीओने आता असे तंत्रज्ञान विकसित करावे ज्यामुळे हवेतल्या हवेत असे ड्रोन उडवून लावता येतील. आता हे काम प्राधान्याने झाले पाहिजे. यासाठी इस्रायलसारख्या देशाची मदत भारताने घ्यावी. या देशाची हवाई संरक्षण व्यवस्था अतिशय बळकट आहे. भारत सरकारने मार्च महिन्यात मोठ्या व मध्यम आकाराच्या ड्रोनला अनुमती दिली आहे. सुरक्षा नियमाच्या चाकोरीत सामानाची ने-आण करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. व्यावसायिक ड्रोनवरही आम्हाला नजर ठेवावी लागेल. दहशतवादी अशा ड्रोनचा वापर करू शकतात .