वेळप्रसंगी विरोधकांची स्तुती आणि स्वकियांवर प्रहार करण्यासही कचरत नसलेला नेता ; बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उधळली स्तुतीसुमने

नितीन गडकरी आणि माझ्या परिचयाला २९ वर्षे झाली आहेत. जवळ-जवळ तीन दशकांपासून मी त्यांना आणि त्यांच्या कार्यशैलीला पाहतो आहे. १९९३ मध्ये मी सार्वजनिक बांधकाम खात्याचा राज्यमंत्री झालो. गडकरी त्यावेळी विधान परिषदेत होते. रस्ते, पूल, इमारती, पायाभूत सुविधा या क्षेत्रांबाबत त्यांचा तेव्हापासूनच गाढा अभ्यास होता. या विषयांवर त्यांचे प्रश्न अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल विवेचन करणारे असायचे. पुढे जाऊन ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बांधकाम मंत्री झाले.

    महाराष्ट्र राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर मला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नेहमीच उत्तम सहकार्य मिळाले. महाराष्ट्रातील कामांबाबत ते स्वतःहून पुढाकार घेतात. राज्याच्या वतीने जे विषय त्यांच्या निदर्शनास आणून देतो, त्यावर ते सकारात्मक प्रतिसाद देतात आणि वेगाने कार्यवाही देखील करतात. मागील दीड वर्षात राज्यातील प्रश्नांसंदर्भात अनेकदा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमवेत त्यांच्याशी बैठका झाल्या. त्यातून रखडलेले प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली.
    नितीन गडकरी आणि माझ्या परिचयाला २९ वर्षे झाली आहेत. जवळ-जवळ तीन दशकांपासून मी त्यांना आणि त्यांच्या कार्यशैलीला पाहतो आहे. १९९३ मध्ये मी सार्वजनिक बांधकाम खात्याचा राज्यमंत्री झालो. गडकरी त्यावेळी विधान परिषदेत होते. रस्ते, पूल, इमारती, पायाभूत सुविधा या क्षेत्रांबाबत त्यांचा तेव्हापासूनच गाढा अभ्यास होता. या विषयांवर त्यांचे प्रश्न अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल विवेचन करणारे असायचे. पुढे जाऊन ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बांधकाम मंत्री झाले.
    आता ते केंद्र सरकारमध्ये रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आहेत. त्यांच्या या दोन्ही कारकिर्दी लक्षवेधी ठरल्या. राज्यात बांधकाम विभाग सांभाळत असताना त्यांनी रस्ते, पुलांच्या कामाला मोठी गती दिली. मुंबई महानगरातील रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठवली. त्यांच्या कामाचा झपाटा एवढा होता की, त्यांना गंमतीने गडकरीऐवजी ‘रोड’करी आणि ‘पूल’करी म्हटले जाऊ लागले.
    कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी अशी उपमा मिळणे ही त्यांच्या कामाची पावतीच म्हणावी लागेल. राजकीय विचारधारेत जमीन-आस्मानचे अंतर असले तरी विधिमंडळ व संसद सदस्य म्हणून आम्ही राज्याच्या विकासाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम केले आहे. एक सक्षम लोकप्रतिनिधी आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून मला नेहमीच नितीन गडकरींबद्दल आदर राहिला आहे. ते अतिशय सकारात्मक, अभ्यासू व कल्पक आहेत.
    कर्तृत्वाच्या जोडीला त्यांच्याकडे धाडस, धडाडी आणि नियोजन हे तीनही गुण आहेत. त्यांच्याकडे दूरदर्शिता आहे. पुढील काळातील आव्हाने ओळखून नवे बदल स्वीकारण्याची आणि ते अंमलात आणण्याची दृष्टी आहे. विशेष म्हणजे ते दिलदार आहेत. कोणाच्याही मदतीला धावून जाण्याची सहृदयता त्यांच्याकडे आहेत. उत्तम वाक्चातुर्य आणि विनोदबुद्धीचे ते धनी आहेत. सोबतच स्पष्टवक्ते देखील आहेत.
    वेळप्रसंगी विरोधकांची स्तुती आणि स्वकियांवर प्रहार करण्यासही ते कचरत नाहीत. पक्ष, जात, धर्म, राज्य, भाषा अशा भिंतींच्या पलिकडचे नेते म्हणून त्यांची प्रतिमा आहे. या स्वभाव वैशिष्ट्यांमुळेच कदाचित त्यांच्या खात्यात विरोधकांपेक्षा मित्रांची संख्या अधिक आहे आणि माझ्या मते हीच प्रत्येक माणसाच्या आयुष्याची खरी मिळकत असते.
    आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत नितीन गडकरी यांनी विविध क्षेत्रांमध्ये सृजनशील काम केले. अनेक नावीन्यपूर्ण कल्पना मांडल्या व त्या अंमलात आणण्यासाठी परिश्रमही घेतले. साखर कारखान्यांमधून इथेनॉल निर्मिती करणे, सार्वजनिक आणि खासगी वाहतूक क्षेत्रात पेट्रोल व डिझेलऐवजी इलेक्टि्रकल वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे, त्यासाठी जनजागृती करणे, आवश्यक ते तंत्रज्ञान व सोयी-सुविधा आणण्यासाठी प्रयत्न करणे, मोटर वाहन कायद्यात आवश्यक ते बदल करणे, टोलनाके तांत्रिकदृष्ट्या अधिक सुसज्ज करणे अशा अनेक कामांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.
    केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री म्हणून देशभरातील राष्ट्रीय राजमार्गांच्या विकासासाठी ते प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. नौवहन खात्याचे मंत्री असतानाही त्यांनी सागरी प्रवासी वाहतूक व पर्यटन वाढीच्या अनुषंगाने अनेक चांगल्या संकल्पना मांडल्या. गडकरी यांच्या कामाच्या धडाक्यातून त्यांनी बाळगलेल्या विकासाच्या ध्यासाची प्रचिती येते.
    महाराष्ट्र राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर मला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नेहमीच उत्तम सहकार्य मिळाले. महाराष्ट्रातील कामांबाबत ते स्वतःहून पुढाकार घेतात. राज्याच्या वतीने जे विषय त्यांच्या निदर्शनास आणून देतो,त्यावर ते सकारात्मक प्रतिसाद देतात आणि वेगाने कार्यवाही देखील करतात. मागील दीड वर्षात राज्यातील प्रश्नांसंदर्भात अनेकदा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमवेत त्यांच्याशी बैठका झाल्या. त्यातून रखडलेले प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली.
    राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनासाठी ग्रामीण भागातील प्रकल्पग्रस्तांना अधिक मोबदला मिळावा, यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवली. रस्ते प्रकल्पातील पर्यावरण व वन खात्याच्या परवानगीबाबतच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांमधील कंत्राटदारांची कुचराई निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याबाबतही त्यांनी कठोर भूमिका घेतली.
    महाराष्ट्राचा भूमिपूत्र म्हणून राज्यातील कामांसाठी नेहमीच झुकते माप दिले. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्याशी संबंधित विभागाच्या राज्य सरकारच्या अखत्यारीतील मंत्रालयांशी कसा समन्वय ठेवावा, याचा एक उत्तम परिपाठ त्यांनी घालून दिला आहे.अष्टपैलू आणि विकासाभिमुख नेते म्हणून संपूर्ण देशात परिचित असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
    अशोक चव्हाण
    मंत्री, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य