जीवनदृष्टी देणारे शिक्षक…

ऑनलाईनने तंत्रज्ञान स्नेह निर्माण होईलही; पण त्याने शिक्षक-विद्यार्थी स्नेह उत्पन्न होतो का; शिक्षक विद्यार्थ्यांवर जाणते-अजाणतेपणाने जे जीवनसंस्कार करीत असतात ते यातून साधते का हा प्रश्न पडावा अशीच सध्याची स्थिती आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक या विभूतीचा माणसाच्या विद्यार्थी जीवनातच नव्हे तर त्याच्या पूर्ण आयुष्यावर कसा पगडा असू शकतो याचा धांडोळा

  राहूल गोखले

  ऑनलाईनने तंत्रज्ञान स्नेह निर्माण होईलही; पण त्याने शिक्षक-विद्यार्थी स्नेह उत्पन्न होतो का; शिक्षक विद्यार्थ्यांवर जाणते-अजाणतेपणाने जे जीवनसंस्कार करीत असतात ते यातून साधते का हा प्रश्न पडावा अशीच सध्याची स्थिती आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक या विभूतीचा माणसाच्या विद्यार्थी जीवनातच नव्हे तर त्याच्या पूर्ण आयुष्यावर कसा पगडा असू शकतो याचा धांडोळा

  कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून सर्वच समाजजीवन विस्कळीत झाले असले तरी बहुधा यातील सर्वाधिक चिंता वाटावी असे प्रभावित क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. शाळा-महाविद्यालये बंद आहेत आणि ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. अशा शिक्षणाने कदाचित अभ्यासक्रम पूर्ण होईलही; पण विद्यार्थ्यांचे भावजीवन मात्र काहीसे रिक्त राहण्याचा संभव जास्त. शाळा-महाविद्यालयात शिक्षण दिले जाते ते केवळ पुस्तकी नसते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील बंध हे पुस्तकाबाहेरचे शिक्षण देत असतात. केवळ मोबाईल किंवा लॅपटॉपच्या पटलावर शिक्षक आणि विद्यार्थी यांना परस्परांचे दर्शन व्हावे यात विद्यार्थी आणि शिक्षकही काही गमावत असल्याची जाणीव आता अनेकांना होऊ लागली आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने तर ही जाणीव अधिक प्रखरतेने होईल यात शंका नाही. एरव्ही शाळेत शिक्षक दिन ज्या उत्साहाने साजरा होत असे त्या जल्लोषाला, उत्साहाला आता विद्यार्थी आणि शिक्षक मुकत आहेत. पण यामुळेच बहुधा शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरु असणे किती अनन्यसाधारण महत्वाचे आहे याचा साक्षात्कारही होण्यास मदतच झाली आहे. ऑनलाईनने तंत्रज्ञान स्नेह निर्माण होईलही; पण त्याने शिक्षक-विद्यार्थी स्नेह उत्पन्न होतो का; शिक्षक विद्यार्थ्यांवर जाणते-अजाणतेपणाने जे जीवनसंस्कार करीत असतात ते यातून साधते का हा प्रश्न पडावा अशीच सध्याची स्थिती आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक या विभूतीचा माणसाच्या विद्यार्थी जीवनातच नव्हे तर त्याच्या पूर्ण आयुष्यावर कसा पगडा असू शकतो याचा धांडोळा घ्यायला हवा.

  पाकिस्तानमधील महिला हक्क कार्यकर्ती मालाला युसुफझई हिने विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आणि त्या पायी तिने आपल्या प्राणांचीही बाजी लावली. तिच्यावर कट्टरतावाद्यांनी गोळीबार केला आणि तिच्या डोक्यात गोळी घुसली. जीवावर बेतूनही मालालाने आपले ध्येय सोडले नाही. प्रकृती सुधारल्यानंतर तिने स्वतःला शिक्षणाच्या अधिकाराच्या प्रचाराला वाहून घेतले. तिला २०१४ सालचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. पुरस्कार स्वीकारताना तिने जे भाषण दिले ते शिक्षण आणि शिक्षकाची महती सांगणारे होते. ती म्हटली: ‘एक मूल, एक शिक्षक, एक लेखणी आणि एक पुस्तक जग बदलू शकते’. तेंव्हा शिक्षकाचे सामर्थ्य काय असते हेच यातून ध्वनित होते.

  पु ल देशपांडे यांनी आपल्या शिक्षकांविषयी जे लिहिले आहे तो अनुभव अनेकांचा असू शकतो. आपल्या तारकुंडे मास्तरांविषयी पुलंनी लिहिले आहे: ‘तारकुंडे मास्तर आम्हाला फिजिक्स-केमिस्ट्री शिकवायचे; पण मैदानात आमच्याबरोबर क्रिकेट खेळत. स्नेहसंमेलनात नाटक बसवीत.. त्यांच्या बोलण्यात इतका जिव्हाळा होता की फिजिक्ससारखा विषयही कवितेसारखा वाटायचा..’. असेच त्यांनी अन्य शिक्षकांबद्दल कृतज्ञतेने लिहिले आहे. पण त्यातील महत्वाचा भाग हा की ‘या शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्कारांनी घडून मी किती चांगला झालो हे मला सांगता येणार नाही. पण त्यांच्याविषयी मात्र माझ्या मनात खूप मोठी कृतज्ञता आहे. त्यांची आठवण झाली की मी पुन्हा शाळकरी वयाचा होतो’. हा अनुभव घयायचा तर मुळात शिक्षक आणि विद्यार्थी असा संपर्क असावयास हवा. ऑनलाईनमध्ये ती खुमारी नाही. मात्र ज्यांना असे संस्कार करणारे शिक्षक लाभले ते आयुष्यभर त्यांना विसरणे शक्य नाही. विशेषतः शालेय जीवनात तर विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हेच ‘रोल मॉडेल’ असतात. शिक्षकांचे अनुकरण करणे, ते सांगतील त्याला ब्रह्मवाक्य मानणे हे स्वाभाविक असते कारण ते वयच मुळी मातीला आकार देण्याचे असते. शिक्षक त्या मातीला आकार देत राहतात आणि विद्यार्थी घडत राहतात.
  अर्थात शिक्षक हे नेहेमी वर्गातच शिकवणारे असतात असे नाही. लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले, गोपाळ कृष्ण गोखले, श्री म माटे, मामासाहेब दांडेकर, नरहर कुरुंदकर या आणि अशांनी वर्गात शिकवलेच; पण त्यापलीकडे जाऊन त्यांनी समाजशिक्षक म्हणून आपली भूमिका ठोस पार पाडली. वर्गात विद्यार्थ्यांवर नैतिकतेचे, सचोटीचे, चारित्र्याचे, सज्जनतेचे संस्कार शिक्षक करीत असतात. समाजालाही संस्कारांची आवश्यकता असते. दुष्ट रूढी, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, विषमता असल्या दोषांपासून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाजशिक्षणाची आवश्यकता असते. समाज शिक्षणाला वर्गातल्या शिक्षणासारख्या इयत्ता नसतात, ते शिक्षण निरंतर आणि निरलसपणे चालू ठेवावे लागते. शिक्षक विद्यार्थी घडवतात तसे समाजशिक्षक उन्नयन झालेला समाज घडवत असतात.

  एक खरे, शिक्षण वर्गातले असले काय किंवा समाजशिक्षण असले काय, शिक्षकाची भूमिका ही मोलाची असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत सरसंघचालक प्राध्यापक राजेंद्र सिंह हे पूर्णवेळ संघाचे कार्य करू लागण्यापूर्वी प्राध्यापक होते. मुरली मनोहर जोशी यांनी त्यांची आठवण सांगताना म्हटले होते की ‘राजेंद्र सिंह यांची आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर, त्यांच्यातील क्षमतांवर नजर असे आणि कोणत्या विद्यार्थ्याने कोणते क्षेत्र निवडले तर तो त्यात उज्ज्वल कामगिरी करू शकेल याचे ते सातत्याने मार्गदर्शन करीत असत. परिणामतः राजेन्द्र सिंह यांनी असे मार्गदर्शन केलेले अनेक विद्यार्थी पुढे जाऊन आपापल्या क्षेत्रात चमकले’. शिक्षकाचे असे लक्ष असते कारण शिक्षकाच्या अंगी ती तळमळ असते. आपल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य आपल्या हाती आहे या कळवळ्यातून शिक्षक विद्यार्थी घडवत असतो. आपल्या मुलाच्या हेडमास्तरला अब्राहाम लिंकनने लिहिलेले पत्र प्रसिद्ध आहे. त्यात लिंकन याने आपल्या मुलाला काय शिकवावे हे लिहिले आहेच; पण एका अर्थाने माणसाच्या आयुष्यात सर्वव्यापी असणारे शिक्षक नेमके काय करीत असतात हेच त्यातून प्रतीत होते. लिंकन लिहितो: ‘हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला… त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य, अन धरला पाहिजे धीर त्याने, जर गाजवायच असेल शौर्य.. आणखीही एक सांगत रहा त्याला…आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर’. अशा शिक्षकांच्या बद्दल नेहेमीच कृतज्ञ राहायला हवे; ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिन.

  ज्ञानदान हे आयुष्यातले सर्वांत मोठे श्रेय ज्याने मानले असा साधक, विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्. तत्वज्ञानासारखा एरवी रूक्ष वाटणारा विषय ते शिकवीत. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी म्हैसूर विद्यापीठात ते तत्वज्ञानाचे प्रधयापक म्हून रुजू झाले. पण त्यांच्या अध्यापनाच्या कौशल्याची कीर्ती म्हैसूरमध्येच नव्हे तर अन्यत्रही पोहोचली. विद्यार्थ्यामध्ये ते प्रिय होते. त्याच सुमारास कलकत्ता विद्यालयात ‘प्रोफेसर ऑफ फिलॉसॉफी’ चेअर साठी अनेक प्रथितयश प्राध्यापकांनी अर्ज केले होते. पण निवड समितीने राधाकृष्णन् यांचीच एकमताने निवड केली. म्हैसूर सोडावे लागणार याचे राधाकृष्णन यांना दुःख होते, तसेच आपले प्रिय अध्यापक म्हैसूर सोडून जाणार म्हणून विद्यार्थीही नाराज झाले. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी राधाकृष्णन् यांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या घरासमोर गर्दी केली. नंतर घरासमोर उभ्या असलेल्या व्हिक्टोरियाचे घोडे सोडून त्या विद्यार्थ्यांनी स्वतः ही गाडी ओढत नेली व राधाकृष्णन् यांना स्थानकावर सोडले. आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता दाखविणारे विद्यार्थी पाहून शिक्षकालाही कृतकृत्य वाटायला लावणारे असे क्षण सर्वच शिक्षकांच्या आयुष्यात यावेत अशीच अपेक्षा असते. शिक्षक दिन हे त्याचे निमित्त असते.