प्रत्येक खात्यावर कामाचा ठसा ; आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून अजित पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक

महिलांच्या बाबतीतही त्यांचा दृष्टिकोन उदारमतवादी व पुरोगामी आहे. त्यामुळेच युवती कॉंग्रेसच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. तसेच कोपर्डी प्रकरणातील महिलेला न्याय मिळावा, यासाठी अत्यंत आक्रमकतेने तो प्रश्‍न विधिमंडळ अधिवेशनात मांडला. या प्रश्‍नी राजकारण न करता राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारावी, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना करून दिली. महिलांवरील अत्याचार महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे “बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या भूमिकेतून सातत्याने कार्य करीत आहेत. प्रशासनावरील जबरदस्त पकड, रोखठोकपणा, स्पष्टवक्तेपणा, पारदर्शी कारभार यामुळे सर्व पक्षातील नेत्यांना दादांच्या कार्यशैलीचे कौतुक वाटते. जनसामान्यांच्या प्रश्‍नांची त्यांना जाण आहे. किंबहुना त्या मुद्द्यावर ते अत्यंत संवेदनशील बनतात. त्यांची वक्‍तृत्वशैली सर्वसामान्य बहुजन समाजाला आपलेसे करणारी आहे. विरोधकांनी केलेली टीका खिलाडूवृत्तीने ते घेतात. त्यांच्या या शैलीस विनोदाची सूक्ष्म झालर आढळते. त्यामुळे सर्वसामान्यांना दादा आपलेसे वाटतात.
  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एक बहुआयामी आणि पारदर्शक राजकीय व्यक्‍तिमत्त्व. कृषीजीवन, जनसामान्य व युवा वर्गाशी त्यांचे अतूट नाते आहे. पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. एक अभ्यासू, मुरब्बी, रोखठोक, स्पष्टवक्ते, मुत्सद्दी राजकीय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने पाहतो आहे. लोकनेते शरद पवार यांच्या नेतृत्वातून विधायक दिशा घेत अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या तत्पर व आक्रमक कार्यशैलीने आपले अस्तित्व निर्माण केलेले आहे. त्यांचे संघटनकौशल्य, धडाडी, तत्परता, नेतृत्वगुण व प्रशासनावरील पकड यांचे कौतुक पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांपासून ते त्यांचे विरोधकही खुल्या मनाने मान्य करतात.

  अजितदादांना प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य आणि अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बळ आजी शारदाबाई पवार व मातोश्री आशाताई पवार यांच्याकडून तर, “सहकारातून सर्वोदय’ ही विचारधारा आजोबा कै. श्री गोविंदराव पवार व अर्थातच राजकीय गुरू शरद पवार यांच्याकडून मिळालेली आहे. राजर्षी शाहू महाराज, सत्यशोधक महात्मा फुले, महर्षी शिंदे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारांच्या संस्कारातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना उत्तम संस्कारांबरोबरच शेती, राजकारण, समाजकारण यांचे संस्कारही त्यांच्यावर नकळत झालेले आहेत. त्यामुळेच लोकांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी संघर्षयात्रा काढली.

  सातारा आणि अजितदादा हे वेगळेच रसायनं आहे. कास धरण उंचीच्या कामात बारा मीटर उंच भिंत बांधण्यासंदर्भात अजितदादांनी प्रशासनाच्या धडक बैठका घेत निधीचा प्रश्न मार्गी लावला. बावीस वर्षापूर्वी अजितदादा पालकमंत्री असताना प्रशासनावरची पकड आणि विकास कामांचा धडाका काय असतो हे त्यांनी दाखवून दिले. पक्ष कोणताही असो विकास कामांच्या बाबतीत राजकारणाच्या पलीकडे जावून त्यांनी सातारा जावली विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी सक्रीयपणे निधी दिला. सतत कामाचा झपाटा, विकास कामांचा आणि नेतृत्वाचा द्रष्टेपणा आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता हे अजितदादा पवार यांचे गुण अनुकरणीय आहेत. कोरोनाच्या संक्रमण काळात साताऱ्याच्या जंबो हॉस्पिटलला झटपट निधी देण्यात अजितदादांनी मागे पुढे बघितले नाही. राष्ट्रवादीच्या प्रवाहात असताना अजितदादांनी अनेक प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रवाहाच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी दादा आणि मी आमच्यातील स्नेह व मैत्रभाव कायम आहे. दादा सातत्याने मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले आहेत.

  गेल्या २५ वर्षांत कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, पाटबंधारे, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, अर्थ व नियोजन, ऊर्जा आदी खाती सांभाळताना त्यांनी प्रत्येक खात्यावर आपल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे. महाराष्ट्र फळबागायत व अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. दुग्ध उत्पादन व पशुपालनात याच काळात महाराष्ट्राने गरूडझेप घेतली. बारामतीचा संपूर्ण कायापालट होत असताना महाराष्ट्र हे देशातील नंबर एकचे राज्य बनले. महिलांच्या बाबतीतही त्यांचा दृष्टिकोन उदारमतवादी व पुरोगामी आहे. त्यामुळेच युवती कॉंग्रेसच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. तसेच कोपर्डी प्रकरणातील महिलेला न्याय मिळावा, यासाठी अत्यंत आक्रमकतेने तो प्रश्‍न विधिमंडळ अधिवेशनात मांडला. या प्रश्‍नी राजकारण न करता राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारावी, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना करून दिली. महिलांवरील अत्याचार महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
  एकहाती सत्ता असेल तर प्रभावीपणे विकास होऊ शकतो हे दादांनी बारामती नगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे केलेल्या विकास कामांवरून दाखवून दिले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान बहुमोल स्वरूपाचे आहे. स्व. बाबुरावजी घोलप यांनी लावलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या रोपट्याचे आज अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे. या संस्थेच्या माध्यमातून लाखो डोंगरी आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोयीसुविधांनी युक्त शैक्षणिक संकुलातून खेड्यापाड्यातील बहुजन समाजातील लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजकारणात असूनही दादांनी कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या क्षेत्रांची आपली घट्ट वीण ठेवत रसिकता शाबूत ठेवली आहे.

  विविध खेळांशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळेच दादांकडे कमालीची खिलाडूवृत्ती आहे. कबड्डी, कुस्ती, खो-खो यासारख्या क्रीडा प्रकारांना व क्रीडापटूंना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम दादांनी केले. माझा महाराष्ट्रातला खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी त्यांची तळमळ आहे. यासाठी दरवर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून शालेय स्तरापासूनच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून दिले. तसेच पुणे ते बारामती राष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. खेळाडूंना मानधन योजना सुरू करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री असताना राज्यात विविध खात्यांत खेळाडूंना सामावून घेण्यात आले.

  – आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोंसले