नागपूर-वाराणसीत भाजपाला दणका, सुशिक्षित मतदार दुरावण्याच्या मार्गावर

मोदींना ज्या मतदार संघाचे कवच लाभले त्या वाराणसीमध्ये भाजपाच्या एमएलसी उमेदवाराला पराभव पत्करावा लागला आहे. केवळ पराभवच नाही. तर भाजपाचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेला. दाक्षिणात्य विजयाचे स्वप्न बघणाऱ्या भाजपाला हैदराबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कल्पना केल्याप्रमाणे भरारी मारता आली नाही.

निकालांचे होणार दूरगामी परिणाम, भारतीय जनता पार्टी (BJP) सत्तास्थानी आल्यानंतर काही नेत्यांना यापुढे आपण जगही जिंकू शकतो असेच काहीसे वाटू लागले. आपल्याकडे अलादीनचा चिराग समान नेतृत्व असल्यामुळे पराभव आपल्या सावलीतही उभा राहणार नाही असेच काहीसे पक्षातील धुरंधरांना वाटू लागले. गेल्या ६ वर्षापासून मोदी-शाह टीमने पितृतुल्य संघटन आरएसएसच्या मूल्य अजेंड्यावर काम करणे सुरू केल्यामुळे भाजपा यापुढे चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे एक-एक प्रांत काबीज करेल असे कार्यकर्त्यांना वाटू लागले. भाजपाची गफलत मग येथेच होत असल्याचे दृष्टिपथास येत आहे. जेव्हा चक्रवर्ती डोक्यात फिट्ट बसतो तेव्हा जनता धडा शिकविण्याचे काम करते.

नागपूरसारखा (Nagpur-Varanasi hit BJP) संघाच्या बालेकिल्ल्यात गत ५० वर्षापासून भाजपाची जी जागा काँग्रेसला कधीच हिसकावता आली नाही ती आता या पक्षाने आपल्या घशात रिती केली आहे. कॉँग्रेस राज्यात व देशात शक्तिमान असताना नागपूर पदवीधर मतदारसंघावर भाजपाचाच सलग डंका राहिला आहे. कॉँग्रेसने दिलेल्या या धक्क्याने भाजपाच्या पुढील वाटचालीवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. अत्यंत प्रतिष्ठेची जागा संघभूमीतच गमावल्यामुळे भाजपाच्या तळागाळाच्या कार्यकर्त्याच्या मनोबलावर याचा निश्‍चित परिणाम झाला आहे. असाच प्रकार वाराणसीसारख्या पंतप्रधानांच्या अभेद्य किल्ल्यामध्येही घडला आहे.

मोदींना ज्या मतदार संघाचे कवच लाभले त्या वाराणसीमध्ये भाजपाच्या एमएलसी उमेदवाराला पराभव पत्करावा लागला आहे. केवळ पराभवच नाही. तर भाजपाचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेला. दाक्षिणात्य विजयाचे स्वप्न बघणाऱ्या भाजपाला हैदराबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कल्पना केल्याप्रमाणे भरारी मारता आली नाही. हा सर्व भाग पाहता जनता अंगावरही घेते अन्‌ अंगावरून शिंगावर घेत फेकूनही देते हे स्पष्ट आहे.

गडकरींनी दिले होते संकेत

२९ नोव्हेंबर रोजी भाजपाच्या प्रचार कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाषण दिले. संदीप जोशींच्या पराभवानंतर त्यांचे भाषण सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. गडकरी यांनी चेतावणी देताना म्हटले की, सत्तेचा घमेंड कुणी करू नये. अहंकार, घमेंडीत मोठमोठे मातीमोल झालेत. घमेंडींना जनतेने आपली जागा दाखवून दिली आहे. त्यानंतर गडकरींनी व्यासपीठावर बसलेल्या भाजपाच्या बड्या नेत्यांकडे दृष्टिक्षेप टाकला. मी कुण्या विशेष नेत्याबाबत बोलत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात भाजपाचे असे काही नेते आहेत की,ज्यांच्या २०१४ ते २०१९ दरम्यान सत्ता डोक्यात शिरली होती. गडकरींनी नाव न घेता त्यांना संकेत दिले होते. गडकरींचे बोलणे मात्र कुणी फारसे मनावर घेतले नाही. ५० वर्षांपासून नागपूर ‘पदवीधर मतदारसंघ अभेद्य किल्ला असल्याची नशा त्यांच्या डोक्यात शिरली होती.

मोदींची देव-दिवाळी पूजा व्यर्थ

नागपूरच नव्हे तर वाराणसीमध्येही एमएलसी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देव-दिवाळी पूजा आटोपली. वाराणसीच्या बालेकिल्ल्याला हादरा देण्याची ताकद कुणात नाही हा भ्रम भाजपाच्या डोक्यात होता. मोदींच्या देव-दिवाळी पूजेचे थेट प्रसारणही करण्यात आले. राष्ट्रवादावर भाजप नेत्यांची पोपटपंचीही झाली. मोदींचे लांबलचक भाषणही झाले. विकासालाही रंगविण्याचे काम पाडले गेले. हा सारा बाळंतकाढा पाजूनही भाजपाचा उमेदवार एमएलसीच्या रिंगणातून बाहेर फेकल्या गेला. भाजपाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

जेथे बॅलेट तेथे भाजपा छूमंतर

ईव्हीएमबाबत शंका वाढत्या आलेखावर का आहे तर त्याचे उत्तर बॅलेट देत आहे. जेथे बॅलेट पेपरचा वापर झाला तेथे भाजपा सफाचट झाले. सोशल मीडियावरही या संदर्भात जोरदार चर्चा होत आहेच. सशिक्षित मतदारही बॅलेट पेपरवर भाजपाला मतदान करण्याच्या मनस्थितीत नाही. हैदराबादच्या स्थानिक स्वराज निवडणुकीतही बॅलेट पेपरचा वापर झाला. हैदराबादमध्ये मोदी सोडून भाजपाचे सारेच मुखिया हजेरी लावून आलेत, पण व्यर्थ, अमित शाह, योगी आदित्यनाथ, पी.नड्डांची हैदराबाद मोहीम अयशस्वी झाल्यास जमा करावी लागेल.

लवकर सुधार करा अन्यथा…

देशातील जनता आता राजकारणातील आलबेल समजू लागली आहे. ज्या वेगाने ते राजकारण्यांना डोकयावर घेतात त्याच्या दुप्पट वेगाने डोक्यावर घेऊन फेकूनही देतात. देशासमोरील जे प्रमुख मुद्दे आहेत त्यावर भाजपा सरकारने लक्ष केंद्रित करावे. फेकमफाक करण्यातून काहीच साध्य होणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर इमानेइतबारे विचार व्हावा. बेरोजगारीवर तातडीने चिंतन व मंथन व्हावे. व्यापार्‍यांच्या मूलभूत समस्या दूर कराव्यात. अदानी-अंबानीची काळजी घेताना गरिबांकडेही तेवढेच लक्ष द्यावे.

सुशिक्षित मतदार दुरावण्याच्या मार्गावर

सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पार पडलेल्या एमएलसी निवडणुकांचे मतदार सुशिक्षित आहेत. काही पदवीधर मतदारसंघ तर काही शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकी पार पडल्या. महत्त्वाची बाब म्हणजे बहुतांश जागा भाजपाच्या ताब्यात होत्या. तेव्हा सुशिक्षित मतदार भाजपासोबत होता. आधी भाजपा शेतकरी, व्यापारी, बेरोजगारांवर बेंबीच्या देठापासून बोलत होते. सत्तेत आल्यानंतर भाजपाची पोपटपंची बंद झाली. शेतकरी, व्यापारी, बेरोजगारीच्या मुद्दयावर जे बोलले त्यांना देशद्रोही ठरवू लागले. भाजपाने ‘मीडियामधील काही लालचींना जवळ करून भलताच प्रपोगंडा सुरु केला. मूळ मुद्दयांपासून भाजपा भटकले हा भाग मग सुशिक्षित मतदारांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. भलतेच मुद्दे भाजपा उकरून ‘काढत असल्याची जाणीव त्यांना झाली. धार्मिक कट्टरवाद व अति-रष्ट्रवादाला पक्षाने प्राधान्य दिल्याचेही सुशिक्षित मतदारांच्या ध्यानी आले. त्यामुळे वाराणसीत सुशिक्षित मतदारांनी समाजवादी पक्षाला जवळ करून भाजपला तिसऱ्या स्थानावर फेकले.