प्रतिमा सावरण्यासाठी नवी चिनी धोरणे; शी जीनपिंग यांना काय साध्य करायचं आहे

चीनची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच गूढ, रहस्यमय अशी राहिलेली आहे, ती अलीकडच्या काळात बरीच काळवंडलेली आहे. अर्थात, असे घडण्यास चीनचे सत्ताधारीच सर्वार्थाने जबाबदार आहेत.

  कोरोनाबाबतची माहिती दडवून जगाला मृत्यूच्या खाईत लोटण्यासाठी बऱ्याच देशांनी गेल्या वर्षभरापासून चीनवर टीकेची झोड उठवली आहे. इतके सारे घडूनही चीन या सार्‍या टीकेला नाकारत आपल्यावरील दोष झटकण्यातच धन्यता मानत आला आहे. अलीकडच्या काळात तर विषाणू संशोधन क्षेत्रातील काही संशोधकांनी कोविड-१९ विषाणूच्या उगमस्थानाची म्हणजे वुहान प्रयोगशाळेसह चीनमधील या विषयाशी निगडित इतर घटक व स्त्रोतांची परिपूर्ण छाननी करून निष्कर्षाप्रत आल्याशिवाय कोरोनाला संपूर्ण अटकाव करणे अशक्य बनणार आहे आणि त्याच्या नवनव्या आवृत्त्या पुढे येतच राहतील, अशी भीती व्यक्‍त केली आहे.

  या अनुषंगाने अमेरिका व जगातील इतर अन्य राष्ट्रांनी चीनवर टीका करीत, अशा तपासाला मुभा द्यावी, असे आवाहन करूनही चीन याबाबतीत मौन पाळूनच आहे. हे मौन या देशाच्या गुन्ह्याचे प्रतिबिंबच आहे, असे यामुळे बहुतेक देशांना वाटते. प्रतिमा अशी बनण्यास केवळ ‘कोरोना’ हे एकमेव कारण नव्हते व नाही. चीनचे व्यापार, मुत्सद्देगरीविषयक धोरण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियनला नेहमीच एकतर्फी, पाताळयंत्री आणि धोकादायक वाटत आले आहे.

  शेजारच्या आशियाई राष्ट्रांना चीनच्या विस्तारवादी धोरणाचा फटका बसत आला आहे. अलीकडच्या काळात हॅकिंग आणि सायबर हल्ल्यांच्या निमित्ताने चीनवर अनेकवार टीका झाली आहे. चीनमध्ये लोकशाही राष्ट्रांसारखे माध्यम स्वातंत्र्य नाही. जे काही घडते ते सत्ताधारी पक्षाच्या निरीक्षण व मार्गदर्शनाखालीच ‘ग्लोबल टाईम्स’सारख्या सरकारी व सरकारधार्जिण्या वृत्तपत्रांना प्रसारित करावे लागते. त्यामुळे सत्ताधार्‍यांच्या धोरणांचा प्रचार, प्रसार आणि जयजयकार या पलीकडे जाण्यास असमर्थ अशा कणाहीन व एकतर्फी माध्यमांचे अस्तित्व हे चिनी अभिव्यक्तीचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

  अशा स्थितीत जागतिकीकरणामुळे, अनिच्छेने विदेशी पत्रकार, माध्यमे व प्रसार यंत्रणांना आपल्या देशात स्थान देणे चीनला अपरिहार्य बनले. मग या अनाहुत पाहुण्यांविरुद्ध संघर्ष होणे तितकेच अटळ होते आणि झालेही तसेच. विदेशी माध्यमांवर निर्बंध, ग्लोबल टाईम्स आणि विदेशी माध्यमांमधील वाद-प्रतिवाद, अमेरिकेशी संबंध बिघडताच, चीनमध्ये अमेरिकन वृत्तमाध्यमात कार्यरत पत्रकारांची हकालपट्टी, ब्रिटनच्या ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीवर बंदी असे अनेक निर्णय, चीनची प्रसारमाध्यमांची गळचेपी करणारा देश म्हणून आधुनिक उदारमतवादी जगात अधिकच हिणकस छबी निर्माण करण्यास कारण ठरले.

  या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या आरंभीच चीनचे सर्वेसर्वा शी जीनपिंग यांनी पदाधिकाऱ्यांशी बोळताना चीनची जागतिक पातळीवरील प्रतिमा विश्‍वासार्ह, प्रिय आणि आदरणीय बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘मित्रांची संख्या वाढवत जा. खुलेपणा, स्वागत वृत्ती आणि आत्मविश्‍वास यांच्या आधारावर चीन आपल्या जनतेसाठी आणि उर्वरित जगासाठी काय करीत आहे, याचा प्रचार करा.

  शी जीनपिंग यांच्या या आवाहनाकडे पाहता जागतिक पातळीवर ढासळलेली चीनची प्रतिमा सावरण्यासाठीच हे आवाहन केले आहे हे स्पष्ट आहे. परंतु, अशी मलमपट्टी वा डागडुजी करून ढासळलेली प्रतिमा सावरता येणे अशक्य आहे.

  New Chinese strategies for image recovery What Xi Jinping wants to achieve