पवार कुटुंबात सर्वकाही ठाकठीक नाही

कन्या खासदार सुप्रिया सुळे, पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र त्यांना राजकारणात आणून मोठे केले आहे. हा सारा भाग होत असताना पवारांची तिसरी पिढी धुमकेतूसारखी राजकारणात डेरेदाखल झाली. यात अजित पवार पुत्र पार्थ व रोहित पवार यांचा समावेश आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांना राज्याचे नव्हे तर राष्ट्रीय नेतृत्व स्वरुपातच महाराष्ट्राने (Maharashtra) बघितले आहे. जोडतोडिच्या राजकारणात कुशाग्र समजले जाणारे शरद पवार राष्ट्रीयस्तरावर नेहमीच चर्चेत राहिले आहेत. सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) विदेशी मुद्द्यावर काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या शरद पवारांनी स्व-ताकदीच्या भरवशावर महाराष्ट्रात खासदारांचे चांगले पाठबळ उभे केले आहे. त्यांच्या ताकदीचा नेता आज तरी राज्यात अनुभवास येत नाही. शरद पवारांनी राजकारणात (Politics) आपल्या कुटुंबातून कुण्या भावाला आणून मोठे केल्याचे अनुभवास आले नाही. पण आपली कन्या खासदार सुप्रिया सुळे, पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र त्यांना राजकारणात आणून मोठे केले आहे. हा सारा भाग होत असताना पवारांची तिसरी पिढी धुमकेतूसारखी राजकारणात डेरेदाखल झाली. यात अजित पवार पुत्र पार्थ आणि राजेंद्र पवार यांचे पुत्र रोहित पवार यांचा समावेश आहे. पार्थ पवारांना गत लोकसभेची उमेदवारी कां-कू करीत शरद पवारांनी बहाल केली. पण, पार्थ निवडणूकीत परभूत झाले. शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार राष्ट्रवादीकडून आमदार म्हणून निवडून आलेत. दरम्यान पराभूत झालेल्या पार्थ पवारांनी मध्ये एक वक्तव्य करुन राजकीय खळबळ उडवून दिली होती. पण, पवारांनी नातू पार्थ पवार याला मी कवडीची किंमत देत नाही. तो अपरिपक्व असल्याचे ते म्हणाले होते. मध्यंतरी काही महिने चुप्पी साधून असलेल्या पार्थ पवारांनी पुन्हा एक ट्विट करुन धमाल उडवून दिल्यामुळे पवार कुटुंबात आलबेल आहे हे मात्र आता वाटत नाही. राज्यात शरद पवारांच्या मार्गदर्शनात महाआघाडीची सत्ता असताना पार्थ पवार या सरकारला अडचणीत आणण्याचे सलग ट्विट करीत आहेत. मराठा आरक्षण मुद्यावर बीडमध्ये काल परवा एका विवेक नावाच्या माराठा आंदोलकाने आत्महत्या केली. पार्थने त्याची आत्महत्या गंभीर बाब असल्यामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे स्पष्ट केले. मराठा समाजाला न्याय देण्यात नेते अपयशी ठरत असल्यामुळे न्यायासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. आता एवढ्यावरच ते थांबले भाग नाही. मराठा आंदोलकाच्या आत्महत्येने आमच्या आग पेटली आहे. त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. पुढील पिढीचं भविष्य धोक्यात आहे हे त्यांचे वक्तव्य शरद पवार विरोधकांनाही धक्कादायक वाटते आहे.

थेट आजोबांच्या विचारावर हल्ला

पार्थ पवारांचे थेट आपल्या आजोबांच्या वक्तव्यांचे पोस्टमार्टेम करण्याचे काम सुरु आहे. वडील, आत्या, इतर भावंडांना जे शरद पवार भीष्म पितामहापेक्षाही मोठे वात असताना त्यांच्या विचारांची चिरफाड करण्याचे कामही पार्थने सुरु केले आहे. राममंदिराचे भूमिपूजन होण्याच्या वेळी सरकारने कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यावे हे समजणे गरजेचे आहे. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही. सरकारने देशाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी मोदींचे कान टोचले होते. पण, त्यांचा नातू पार्थ पवारांनी मात्र राममंदिर भूमिपूजनाला शुभेच्छा देणारे पत्रच लिहिले होते. पत्रात पार्थने जय श्री रामाच्या घोषणा लिहून आजोबांच्या विचारावर मीठ चोळण्याचे काम केले.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी

सुशांतसिंग राजपूत आत्महत्येची चौकशी मुंबई पोलिस करीत असताना पार्थ पवार थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयात दाखल झालेत. त्यांनी सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येची चौकशी शासनाने सीबीआयकडे सोपविण्याची मागणी करणारे एक निवेदन अनिल देशमुख यांच्या हाती सोपविले. सुशांतसिंग राजपूत प्रकरण राज्यसरकारसाठी गले की हड्डी होत असताना पार्थ यांनी ती राज्य सरकारच्या गळ्यात अधिक कशी फसेल असेच काम त्यांनी केले. राज्यात अनेकदा मुख्यमंत्रीपद व देशात महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या शरद पवारांना आता घर सांभाळता येत नाही असे कोलीत विरोधकांच्या हाती देण्याचे काम पार्थ पवार करीत असल्यामुळे पवार कुटुंबात खळबळ उडाली. केंद्रसरकारने सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे १९ ऑगस्ट रोजी वर्ग केल्यानंतर पार्थने ‘सत्यमेव जयते’ असे ट्विट करुन उद्धव सरकारवर मीठ चोळण्याचे काम केले. या संदर्भात शरद पवार विरोधकांचे कुटील कारस्थान असावे असे वाटत नाही. आपण राजकारणात सक्रिय आहोत हे दर्शविण्यासाठी ते कुटुंबातच खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न करीत असावेत. त्यांनी आतापर्यंत जे विरोधाभासी ट्विट केले ते ज्वलंत मुद्यावरच केले आहे. हे सुद्धा ध्यानी घ्यावी लागेल. पार्थ पवार हे जनसामान्यांची कामे करुन राजकारणात उतरले असा भागच नाही. सन २०१९ लोकसभा निवडणुकीच्या आधी आपले वडील अजित पवारांच्या सोशल मिडियाची कामे ते सांभाळत होते. त्यानंतर एकदम मावळ लोकसभा निवडणुकीत धुमकेतूसारखे उतरले. आता पार्थ जे काही पवार कुटुंबात खळबळ उडवून देण्याचे काम करीत आहेत हे त्यांचा स्वमर्जीचा भाग असेल असेही वाटत नाही. ज्वलंत मुद्यांवर भाष्य करुन पार्थ याला विधानपरिषदेत खेचण्याचे काम अजित पवार करु शकतात. पार्थ यांच्यामुळे पवार कुटुंबात असंतोष उभा होत असल्याने एकदाचे त्याला विधानपरिषदेचे सदस्यत्व बहाल कारा असा अजित पवारांचा युक्तीवादही राहू शकतो.