भाजपात गेलेले परतीच्या प्रवासाला; दिदींचा विजय सगळ्यांच्याच जिव्हारी लागलाय

प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर तृणमूल काँग्रेसमधून फुटून अनेक नेते भाजपाच्या गोटात सामील झाले . भाजपाचा विजय झाल्यास आपले मंत्रिपद ठरलेले आहे, अशा भ्रमात ही नेतेमंडळी होती . मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे अनेक नेते घरवापसीच्या तयारीत असल्याचे चित्र समोर आले आहे.

  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल येऊन जेमतेम पंधरा दिवस झालेत. मात्र, आयातीत भाजप नेत्यांना श्‍वासाचा त्रास जाणवू लागला आहे. निवडणुकीपूर्वी तृणमूळ काँग्रेसच्या ज्या नेत्यांना पक्षात श्वसनाचा त्रास होत होता त्या नेत्यांना हवापालट करूनही काही उपयोग झालेला नाही. यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झालाच तर माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी आणि मुकुल रॉय यांचा करावा लागेल. भाजपच्या विजयी आमदारांची पहिली बैठक बोलाविण्यात आली. भाजपचे नवनियुक्त आमदार मुकुल रॉय यांनी या पहिल्याच बैठकीला दांडी मारली. अध्यक्षस्थानी भाजपाध्यक्ष दिलीप घोष होते.

  नॉर्थ कृष्णानगर या मतदारसंघात काही हिंसा झाल्यामुळे मुकुळ रॉय यांना जावे लागल्याचे अध्यक्षांना सांगावे लागले. खरे सांगायचे म्हणजे, दिलीप घोष आणि मुकुल रॉय यांचे सुरुवातीपासून पटत नाही असे म्हणतात. यामुळे अध्यक्षांनी आमदारांच्या बैठकीत काय सांगितले याची रॉय यांना अजिबात पर्वा नाही. त्याचे कारणही तसेच आहे. दिदीच्या शपथविधी समारंभात रॉय तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुब्रत बख्शी यांच्याशी गप्पा मारताना दिसले.

  मुळात, विधानसभा निवडणुकीच्या काळात  घोष यांनी शुभेंदु अधिकारी यांना जास्त महत्त्व दिल्यामुळे मुकुल रॉय नाराज असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, निवडणुकीच्या प्रचारकार्यातही त्यांना कोणतेही महत्त्वाचे कार्य देण्यात आले नव्हते. जेव्हा की, २०१८ च्या पंचायत निवडणुकीत आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना प्रचार समितीत महत्त्वाचे स्थान दिले होते.

  बंगालची निवडणूक सांप्रदायिक विभाजन करून जिंकली नाही जाऊ शकत, असे रॉय यांनी एकदा भाजप नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले गेले. एवढेच काय तर, यंदाची निवडणूकसुद्धा त्यांना लढवायची नव्हती अशी चर्चा आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत त्यांनी ‘मास्टरमाइंड’ची भूमिका निभावली. ममता बॅनर्जी यांनीसुद्धा या निवडणुकीत त्यांच्यावर थेट निशाणा साधण्याचे टाळले.

  शपथविधी समारंभात भाजपऐवजी तृकाँ अध्यक्षांशी गळ्यात हात घालून ‘बोलणे आणि भाजप आमदारांच्या पहिल्याच बैठकीला दांडी मारणे भविष्यातील वाटचालीकडे इशारा करणारे नाही ना? मुकुळ रॉय समर्थक आमदारांसह तृणमूलमध्ये जाणार की काय, अशी चर्चा आतापासून सुरू झाली आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालाने भाजपवासी झालेल्या अनेक नेत्यांच्या स्वप्नांवर विरजण सोडले आहे.

  भाजपला एकहाती सत्ता मिळाली की आपले मंत्रिपद नक्की, असे समजून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते; परंतु दिदींच्या लाटेमुळे सर्वांचे स्वप्न हवेत विरले. माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी सध्या अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. मुळात ते गुजरातचे आहेत; परंतु डंका वाजविला तो प. बंगालमध्ये.

  On the return journey to the BJP mamta banerjee victory is on everyones lips