चिथावणीखोर वक्तव्य केले तरी सत्य लपून राहणार नाही; पाकिस्तानच्या पोटातले आले ओठावर!

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवित्यानंतर जगात सर्वाधिक आनंद कुणाला झाला असेल, तर तो पाकिस्तानला. अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर पाकिस्तानला झालेला आनंद हा तेथील नेत्यांच्या वक्‍तव्यांवरून स्पष्ट होत आहे.

  पंतप्रधान इम्रान खान यांनी वीस वर्षांनंतर अफगाणिस्तानने गुलामीच्या श्रृंखला तोडून फेकल्याचे वक्तव्य केले. माजी राष्ट्रपती व लष्करशहा जनरल झिया यांचे सुपुत्र एजजुल हक यांनी तर भारताला खिजवत काबूलचा पाडाव नव्हे हा तर दिल्लीचा पाडाव असल्याचे चिथावणीखोर वक्‍तव्य केले. व्याप्त काश्मीरमध्ये व्यक्‍त होणार्‍या प्रतिक्रिया गंभीर आहेत.

  पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या नेत्या नीलम इर्शाद शेख यांच्या वक्तव्याने पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे. थेट टीव्हीवरील चर्चेदरम्यान नीलम म्हणाल्या, की तालिबान आमचा भागीदार आहे आणि ते आम्हाला काश्मीर जिंकून देतील. नीलम केवळ पीटीआयच्या मोठ्या नेत्याच नाहीत, तर इम्रान खान यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंधही आहेत. इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी आणि नीलम यांची दाट मैत्री आहे.

  काबूलमध्ये तालिबानी शिरल्यानंतर केवळ पाकिस्तानच्या आदिवासी भागातच नव्हे, तर त्या देशाच्या राजधानीतही उत्सवाचं वातावरण आहे. एकीकडे पाकिस्तानवर दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपावरून फायनान्शियल एऐंक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) कारवाईच्या तयारीत आहे. ही कारवाई होऊ नये, म्हणून पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचे तोंडदेखले का होईना दाखवित आहे, आणि दुसरीकडे तालिबान्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानने वीस हजार प्रशिक्षित युवक पाठविले होते, हे जगजाहीर आहे.

  आता तर सरकारमधील लोकच तालिबान्यांना मदत केल्याचे सांगत आहेत. तेथील प्रसिद्ध लाल मशिदीवर तालिबानचे झेंडे फडकले आहेत. एका लाइव्ह शो दरम्यान, अँकरने इम्रान सरकारच्या कामगिरीवर पीटीआय नेत्या नीलम यांना प्रश्‍न विचारला. यादरम्यान त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला.

  तालिबान आम्हाला सांगतो, की आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि ते काश्मीर जिंकून देतील. त्यावर अँकरने तालिबान आम्हाला काश्मीर जिंकून देईल, हे स्वप्न तुम्हाला कोणी दाखवले ? जर असं असेल तर आपलं सैन्य काय करत आहे ? अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली. जगभर या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होत असल्याने आणि आपल्या बोलण्याचे जगभर विपरीत परिणाम होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर नीलम यांनी त्यावर काही भाष्य केले नाही. परंतु, पाकिस्तानच्या पोटात काय आहे, ते ओठावर आले.

  एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे अफगाणिस्तानमधील सामान्य जनता त्यांच्या देशातील दहशतवादासाठी पाकिस्तानला दोष देत आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी दुशान्ने येथे अफगाणिस्तानच्या घडामोडींवर झालेल्या बैठकीदरम्यान तत्कालीन अध्यक्ष अशरफ घनी यांनी इग्रान खान यांना सांगितले होते, की पाकिस्तान आपल्या देशात हिंसा आणि विनाशासाठी जबाबदार आहे आणि जगालाही हे माहीत आहे.

  हमदुल्ला मोहिब, जे घनी सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते, त्यांनी पाकिस्तानला उद्देशून अभद्र विशेषण वापरले होते. पाकिस्तानने तालिंबानला मदत करणे थांबवले, तर अफगाणिस्तान दोन महिन्यांत प्रगतीच्या मार्गावर चालायला सुरुवात करेल, असे ते म्हणाले होते. जैश- ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए- ‘तोयबा (एलईटी) यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) तालिबानच्या समर्थनार्थ रॅली काढली.