chirag paswan

बिहारमध्ये वडिलांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या चिराग पासवान यांना आता विधानसभा निवडणुकीत सहनुभूतीचा फायदा मिळेल की, बिहारची जनता चिरागला झटका देईल, हे आगामी काळात कळेलच. चिराग पासवान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका करीत आहेत. पासवानांचा लोकजनशक्ती पक्ष केंद्रातील एनडीए सरकारचा सहकारी आहे. परंतु बिहार विधानसभा निवडणुकीत मात्र लोजपाचे उमेदवार जदयु उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत.

लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते की, ते इ.स. १९८९ ते इ.स २०२० या कालावधीमध्ये सर्वच सरकारमध्ये मंत्री होते. व्ही.पी. सिंग. एच.डी. देवेगौडा, आय.के.गुजराल, अटलबिहारी वाजपेयी. डॉ. मनमोहनसिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. ते कधी युपीएमध्ये तर कधी एन.डी.ए मध्ये राहिले आहे. एकदा तर लालूप्रसाद यादव म्हणाले होते की, पासवान हे निवडणूकीच्या हवामानाचे वैज्ञानिक आहेत. निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय होईल आणि कोण पराभूत होईल हे त्यांना चांगले कळत होते. बिहारमधील दलितांचे मोठे नेते होते. त्यांचा केंद्रीय राजकारणात मोठा प्रभाव होता. व्ही.पी.सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते समाजकल्याणमंत्री होते. प्रचंड विरोधानंतरही त्यावेळी त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या. इ.स. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ ते तत्कालीन वाजपेयी सरकारमधून बाहेर पडले. सोनिया गांधी यांनी पासवानांना त्यावेळी युपीएमध्ये सहभागी करुन घेतले होते. त्यानंतर पासवान पुन्हा जेव्हा एनडीएमध्ये परतले, तेव्हा मोदी यांनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतले होते. त्यांना मुलगा चिरागला केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करायचे होते. परंतु मोदी यांनी मात्र रामविलास यांनाच प्राधान्य दिले व मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतले.

बिहारमध्ये वडिलांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या चिराग पासवान यांना आता विधानसभा निवडणुकीत सहनुभूतीचा फायदा मिळेल की, बिहारची जनता चिरागला झटका देईल, हे आगामी काळात कळेलच. चिराग पासवान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका करीत आहेत. पासवानांचा लोकजनशक्ती पक्ष केंद्रातील एनडीए सरकारचा सहकारी आहे. परंतु बिहार विधानसभा निवडणुकीत मात्र लोजपाचे उमेदवार जदयु उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. रामविलास पासवान यांचे निधन बिहार विधानसभा निवडणूकीपूर्वी झाल्यामुळे या निवडणुकीत चिराग पासवान यांना मतदारांची सहानुभूती निश्चित मिळेल. यामुळे एकूणच बिहार विधानसभा निवडणुकीची राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. याचा विपरित परिणाम जदयुवर पडेल. जगजीवन नंतर रामविलास पासवान हेच बिहारमध्ये दलित समाजाचे मोठे नेते होते. बिहारमधील लोकसभेच्या आरक्षित मतदारसंघावर पासवान कुटुंबीयांचेच वर्चस्व आहे. लोकसभेत लोजपाचे ६ खासदार असून त्यातील दोघे जण रामविलास पासवान यांचे बंधू आहेत. चिराग हा रामविलास यांचा मुलगा आहे.

नितीशकुमार यांची रणनीती बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दलित मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी वेगळेच राजकारण केलेले आहे. इ.स.२००५ च्या निवडणुकीत लोजपाने नितीशकुमार यांच्याविरुद्ध भूमिका घेतली होती. याचा बदला घेण्यासाठी नितीशकुमारांनी राज्यातील २२ दलित जातींपैकी २१ जातींना महादलित घोषित केले होते. महादलित जातींमध्ये पासवान यांची जात मात्र सहभागी करण्यात आली नव्हती. दलितांमध्ये फूट पाडण्याचा नितीशकुमारांचा हा डाव होता. चिराग पासवान यांना या निवडणुकीमध्ये महादलितांनाही आपल्या बाजूने वळवायचे आहे. लोजपा बिहारमध्ये एनडीएपासून वेगळा आहे. दरम्यान चिराग पासवान यांनी मात्र आम्ही भाजप उमेद्वारांविरुद्ध उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले आहे. चिराग पासवान या निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नावाचा वापर करु शकणार नाही, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले आहे की, मोदी सरकार पासवान यांनी गरिबाच्या कल्याणासाठी सुरु केलेल्या योजना बंद करणार नाही.

५ जिल्ह्यांमध्ये बसू शकतो जदयुला फटका

समस्तीपूर, खगडिया, जुमली, वैशाली आणि नालंदा या जिल्ह्यांमध्ये पासवान कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. पासवान यांना सवर्ण समाजही मानतो. त्यांनी कघीही सवर्ण समाजाच्या विरुद्ध वक्तव्य केलेले नाही. समस्तीपूर येथे रामविलास पासवान यांचे पुतणे खासदार आहेत. या लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे ६ मतदारसंघ आहेत. हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पासवान यांचे बंधू पशुपतीकुमार हेच करीत आहेत. या जिल्ह्यांमध्ये ३-५ लाखांच्या वर दलित मतदार आहेत. या मतदारसंघात ७ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. खगडिया जिल्ह्यात रामविलास पासवान यांचे घर आहे. तेथे ४ लाख मतदार आहेत. जमुई जिल्ह्याचे खासदार चिराग पासवान असून या जिल्ह्यात विधानसभेचे ६ मतदारसंघ आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत चिराग यांच्या बाजूने मतदारांची निश्चितच सहानुभूती राहील. असे बोलल्या जात आहे.