आनंदयात्री!

आयुष्य चैतन्याने आणि रसरशीतपणे पु ल स्वतः जगले आणि त्यामुळेच त्यांनी असंख्यांच्या आयुष्यात आनंदाची निर्मिती केली. आपल्याच एका लेखात पुलंनी लिहिले होते: 'ज्या जगात मी आलो ते हे जग मृत्यूपूर्वी मी सुंदर करून जाईन ही जिद्द हवी.' पुलंचे जीवन यापेक्षा निराळे काय होते? त्यांनी हे जग सुंदर केले आणि ते सौंदर्य काळाच्या ओघात देखील विटलेले वा विरलेले नाही. पु.लंच्या जयंतीनिमित्त...

  राहुल गोखले

  पु. ल. देशपांडे या सहा अक्षरांनी मराठी रसिकमनावर अनेक दशके अधिराज्य गाजवले. पुलंना जाऊन २१ वर्षे झाली; मात्र तरीही पुलंच्या साहित्याची अद्यापि आठवण होत नाही असा प्रसंग विरळा. याचे कारण पुलंनी मराठी जनमन व्यापून टाकले होते आणि आहे. स्वतः सर्वोत्तमाचा ध्यास धरून ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत’ त्या त्या सगळ्याचे स्नेहशील वृत्तीने स्वागत करून त्यास उत्तेजन देणे हा पुलंचा पिंड होता.

  साहजिकच अनेक नवे लेखक आणि कलाकार पुलंच्या प्रोत्साहनाने अधिक उत्तम निर्मितीचा ध्यास धरत असत. पुलंचा स्पर्श हा एका अर्थाने परिसाचा स्पर्श होता आणि त्यांनी ज्यात हात घातला ते ते उत्तम आणि सुंदर झाले. अर्थात विनोदाकडे काहीशा हेटाळणीच्या नजरेने पाहणाऱ्या समीक्षकांशी पुलंचे कधी पटले नाही आणि अशा समीक्षकांची ते खिल्ली उडवत असत. पण ती वगळता अन्य कुठेही कोणाविषयीही उणा शब्द पुलंच्या तोंडून किंवा लेखणीतून निघाला नाही. ‘याचा अर्थ आपल्याला वाईट काहीच दिसत नाही असे नाही पण जे वाईट आहे ते मुद्दाम सांगायचे कशासाठी’ अशी पुलंची मनोधारणा होती आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या लेखनात आणि भाषणांत पडलेले दिसेल. त्यांचे लेखन असो किंवा सादरीकरण; प्रसन्नता हा त्याचा व्यवच्छेदक गुण होता तो त्यामुळेच. पण उणा शब्द निघाला नाही म्हणून जेथे विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची गळचेपी होताना दिसली तेथे पुलंनी त्या गळ्चेपीविरोधात लढा देणाऱ्या सैनिकाची भूमिका निःसंकोचपणे घेतली. मग ती आणीबाणी असो किंवा शिवसेनेच्या सत्ताकाळात होत असणारी गळचेपी असो.

  गंमत म्हणजे या दोन्ही प्रसंगी एरव्ही पुलंचे चाहते असणारे तत्कालीन सत्ताधारी पुलंवर टीका करत होते. तथापि पुलंना त्याचा खेद -खंत असण्याचे कारण नव्हते याचे कारण त्यांच्या भूमिका या प्रामाणिक होत्या तद्वत त्या ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ अशा होत्या. आणीबाणीच्या वेळी त्यांची संभावना ‘विदूषक’ अशी करण्यात आली तेव्हा विदूषक हाच कसा खरे बोलतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखविले आणि आणीबाणी संपुष्टात आल्यावर ते ‘विदूषकाचे’ कपडे तितक्याच सहजरित्या उतरवून ठेवले. साने गुरुजींवर निस्सीम भक्ती असणाऱ्या पुलंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधुनिकतावादाचा, विज्ञाननिष्ठेचा तितक्याच खुलेपणाने गौरव केला.

  जयप्रकाश नारायण यांच्या आणीबाणीकालीन दैनंदिनीचा अनुवाद पुलंनी केला पण म्हणून राजकारणाच्या क्षेत्रात ते शिरले नाहीत किंवा त्याकडे त्यांनी तुच्छतेनेही पाहिले नाही. पुलंचे व्यक्तिमत्व हे असे बहुपेडी होते आणि तरीही अगदी मध्यमवर्गीय माणसासारखेच त्यांचे राहणीमान होते. आपल्या मिळकतीतील मोठा भाग त्यांनी देणगीदाखल दान म्हणून देऊन टाकला. ते दान सत्पात्री होत आहे ना हे त्यांनी पाहिलेच पण आपण केलेल्या या दानाविषयी चकार शब्दाची वाच्यता त्यांनी केली नाही.

  किंबहुना आपण देत असलेली देणगी गुप्त राहावी अशीच त्यांची सूचना असे. तेंव्हा ‘उत्तम वेव्हारे जोडलेले धन उदास विचारे वेच करी’ हा भागही पुलंच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. पुलंच्या बहुआयामी व्यक्तित्वात त्यांनी मिळवलेले यश, प्रसिद्धी, लोकप्रियता हे सगळे होते तितकीच लखलखीत त्यांची दानशूरता होती. पुलंना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व हे बिरुद लागले ते उगाच नव्हे. ते होतेच तसे.

  पुल हे नास्तिक होते; पण एक व्रत त्यांनी आयुष्यभर पाळले असेल तर ते म्हणजे लोकांना सदोदित आनंद देण्याचे. चॅप्लिन, रवींद्रनाथ ठाकूर, बालगंधर्व, वूडहाऊस ही पुलंची दैवते होती. आणि पुलंनी त्यांच्याप्रमाणेच रसिकांना आनंद दिला. दूरदर्शनचे निर्माते म्हणून त्यांनी या नवमाध्यमाचा पाया भारतात रचला. अर्थात त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे त्या सरकारी वातावरणात ते रमले नाहीत. मनोरंजन करताना देखील कायम लोकशिक्षणाचा उद्देश समोर ठेवूनच काम करायचे अशा साचेबद्ध कार्यपद्धतीत पु ल यांच्यासारखा माणूस टिकणे शक्य नव्हते.

  चित्रपटांत देखील पुलंनी मुशाफिरी केली. गुळाचा गणपती सारखा ‘सब कुछ पु ल ‘ चित्रपट पुलंनी दिला. त्याखेरीज गीतांना संगीत दिले; काही चित्रपटांत अभिनय देखील केला. पण तेही क्षेत्र असे होते जेथे अर्थकारणाचे गणित निराळे होते. या क्षेत्रात आपण मुक्तपणे काम करू शकणार नाही असे वाटून पुलंनी त्याही क्षेत्राला रामराम ठोकला. त्यानंतर अनेक वर्षांनी आलेल्या ‘एक होता विदूषक’ या चित्रपटाची पटकथा पुलंनी लिहिली होती.

  नाटक लेखनाच्या प्रांतात पुलंनी ‘तुज आहे तुझपाशी’ पासून ‘ती फुलराणी’ आणि ‘सुंदर मी होणार’ सारखी अत्यंत भिन्न विषयांवरील नाटके लिहिली. जॉर्ज बर्नार्ड शॉच्या ‘पिग्मॅलियन’ या नाटकाचे रूपांतर म्हणजे ‘ती फुलराणी’. पण हे रूपान्तर इतके तगडे होते की ते नाटक याच मातीतील वाटावे. जे नाटकांच्या बाबतीत तेच पुस्तकांच्या भाषांतराच्या बाबतीत. हेमिंग्वेच्या ‘दि ओल्ड मॅन अँड दि सी’ चे भाषांतर पुलंनी केले; ते बहारदार होतेच. पण पुलंची दृष्टी ही त्या शीर्षकात दिसते. ‘म्हातारा माणूस आणि समुद्र’ असे भाषांतर न करता त्यांनी ‘एका कोळीयाने’ असे केले.

  पुलंची प्रवासवर्णने ही अशीच अफलातून. ‘आपली रुद्राक्ष संस्कृती तर फ्रान्समध्ये द्राक्ष संस्कृती’ अशी शब्दकोटी सहजपणे करीत पु ल वाचकांना कधी पूर्वेच्या तर कधी पश्चिमेच्या देशांच्या प्रवासाला घेऊन जात. या सगळ्यात सामान धागा जर कोणता असेल तर तो म्हणजे पुलंनी वाटलेला आनंद. त्यांनी वाचनानंद दिला, त्यांनी नाट्यानुभव दिला आणि ‘नाच रे मोरा’पासून ‘माझे जीवनगाणे’ पर्यंत आणि ‘इंद्रायणी काठी’ पासून ‘इथेच टाका तंबू’ पर्यंत अनेक गीतांना चाली बांधून पुलंनी रसिकांना श्रवणानंद दिला.

  पुलंचे अत्यंत उठून दिसणारे रूप म्हणजे त्यांचे एकपात्री कलाकार म्हणून असणारे. एक पात्री प्रयोग हे नंतर मराठीत अनेक जणांनी केले आणि ताकदीनेही केले. पण पुलंनी एका अर्थाने त्याची मुहूर्तमेढ रचली असेच म्हटले पाहिजे. बटाट्याची चाळ या आपल्याच पुस्तकावर आधारित पुलंनी हा खेळ रंगमंचावर आणला आणि त्या प्रयोगांनी अक्षरशः रसिकांना वेड लावले.

  पहाटेपासून तिकिटांसाठी रांगा लागत आणि जेंव्हा प्रयोग सुरु होई तेंव्हा प्रेक्षक हसून हसून बेजार होत असे. पुलंच्या या प्रयोगाची मोहिनी त्यांनी प्रयोग करण्याचे थांबवल्यानंतर देखील मराठी मनावर कायम राहिली आहे. मुंबईतील एके काळच्या चाळ संस्कृतीचे इतके मोहक दर्शन क्वचितच कोणी घडविले असेल. कोचरेकर मास्तर, अण्णा पावशे, सोकाजीनाना त्रिलोकेकर, आचार्य बाबा बर्वे ही पात्रे पुलंनी अशी काही रंगविली की ती वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या निकटचीच होऊन गेली. मात्र त्या सर्वांवर कडी करते ते अखेरचे ‘चिंतन’.

  मोडकळीस आलेल्या चाळीची कैफियत पुलंनी अशी मांडली आहे की कोणीही हेलावून जावे. किंबहुना पुलंचा तो विशेष अनेक ठिकाणी दिसतो. हसायला लावल्यानंतर अखेरीस पु ल अशी काही कलाटणी देतात की वाचक किंवा श्रोता याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्याखेरीज राहत नाहीत. हसण्यामुळे आलेल्या अश्रूंची जागा या हेलावल्याने आलेल्या अश्रूंनी घेतली असे अनुभव पुलंनी अत्यंत नजाकतीने आपल्या लेखणीतून दिले.

  व्यक्ती आणि वल्ली मधील नारायण ही व्यक्तिरेखा असो; किंवा चितळे मास्तर किंवा अंतू बर्वा. त्या व्यक्तिरेखांचा शेवट हा अंतःकरणाला ‘लागणारा’. पुलंचे हे वैशिष्ट्य होते आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे शब्दांवर जितके प्रेम होते त्यापेक्षाही माणसावर होते. एखाद्या चित्रात नदी, होडी हे सगळे असेल पण त्यात नावाडी नसेल तर आपल्याला ते चित्र भावत नाही असे ते म्हणत. माणसाच्या सुखदुःखाच्या गोष्टी जाणून घेण्याचा पुलंना चांगल्या अर्थाने हव्यास होता. आणि जेथे गुणवत्ता दिसेल तेथे हातचे राखून न ठेवता मुक्तहस्ते कौतुक करण्याचा उमदेपणा होता.

  भीमसेन जोशींपासून वसंतराव देशपांडे आणि माडगूळकरांपासून हिराबाई बडोदेकर यांच्यापर्यंत आपल्या समकालीन कलाकारांचे त्यांनी ‘गुण आवडीने गायले’ आणि त्यांना दाद मोकळेपणाने दिली. नानासाहेब गोरेंपासून एस एम जोशींपर्यंत आणि माटे मास्तरांपासून वूडहाऊसपर्यंत अनेक श्रेष्ठ लेखक, सामाजिक-राजकीय नेते, समाज सुधारक यांची व्यत्तिचित्रे त्यांनी लिहिली. त्यातून त्या व्यक्तीच्या गुणांची एका अर्थाने पूजा पुलंनी बांधली असे दिसेलच पण पुलंचा या सगळ्याकडे पाहण्याचा जो निखळ आणि नितळ दृष्टिकोन आहे तोही प्रत्ययास येतो. ‘बिगरी ते मॅट्रिक’पासून ‘म्हैस’ या कथेच्या अभिवाचनातून पुलंनी रसिकांचे निखळ मनोरंजन केले.

  हार्मोनियम वादन हा पुलंच्या कर्तृत्वाचा आणखी एक विलोभनीय पैलू. हार्मोनियमला शासकीय स्तरावर देण्यात येणारी सापत्नपणाची वागणूक पुलंना कधीही भावली नाही. आणि जेंव्हा जेंव्हा शक्य झाले तेंव्हा त्यांनी ते शल्य बोलून दाखविले. गोविंदराव पटवर्धन यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात बोलताना त्यांनी हार्मोनियमची गायलेली महती मुळातूनच ऐकण्यासारखी. हार्मोनियम हे किती मधुर वाद्य आहे याचा प्रत्यय पुलंनी हार्मोनियमवादन करून आणून दिला.

  अनेक नवोदित लेखकांना आणि कलाकारांना पुलंनी आशीर्वाद दिला आणि पुलंच्या कौतुकाने त्या कलाकारांना आणि लेखकांना रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळू शकला. नवे-जुने असल्या वादांत पुल शिरले नाहीत; जे उत्तम त्याला दाद मनापासून द्यायची हाच गुणग्राहकतेचा निकष त्यांनी कायम ठेवला. म्हणूनच ‘वस्त्रहरण’ नाटकाचे त्यांनी कौतुक केले, ‘रामनगरी’ला उचलून घेतले आणि दया पवार यांच्या ‘बलुतं’वर ‘एक दुःखानं गदगदलेलं झाड’ हा विस्तृत लेख लिहिला. मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजाच्या दृष्टीआडचे ते जीवन किती भयानक आहे याचे वर्णन पुलंनी त्या लेखात केले होते. साहित्यातील नव्या प्रवाहांविषयी नाक न मुरडता त्याविषयी स्वागतशील वृत्ती ठेवून त्याकडे डोळसपणे पाहण्याची पुलंची धारणा होती; तोच त्यांचा पिंड होता.

  लेखनापासून संगीतापर्यंत आणि चित्रपटांपासून नाटकांपर्यंत पुलंनी अनेकविध प्रांतांत सुखेनैव मुशाफिरी केली आणि आपल्याबरोबर आपल्या वाचकांना-श्रोत्यांना-प्रेक्षकांना ते या प्रवासाला घेऊन गेले. साहजिकच रसिक समृद्ध होत गेले. आपण वेगळे काही करतो आहोत असे आपल्याला वाटतच नाही आणि ‘आय आम ऑन ए लॉन्ग व्हेकेशन’ असेच आपल्याला वाटते असे पु ल म्हणत.