याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर विनाश अटळ आहे; वाढत्या तापमानामुळे बेटे बुडण्याचा ताप

गेल्या दहा वर्षांत जगाच्या वेगवेगळ्या भागांत असलेल्या २२ बेटांना कायमची जलसमाधी मिळाली आहे. पुढील दोन वर्षात किमान पाच डझन बेटे कायमची पाण्याखाली जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

  समुद्रातील जी २२ बेटे आता पूर्णपणे जलमय झाली आहेत, त्याचा गंभीर दुष्परिणाम सुमारे ३५ लाख लोकसंख्येवर झाला आहे. भारताच्या अधिपत्याखाली काही निर्जन बेटांसह एकंदर १२०८ लहानमोठी बेटे आहेत. गेल्या दहा वर्षांत यातील काही बेटे पूर्णपणे समुद्राच्या पोटात गडप झाली आहेत. त्यातील एक प्रमुख बेट म्हणजे न्युमूर बेट किंबा पूर्बांसा बेट.

  भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात हे बेट होते आणि त्याच्या मालकी हक्‍कावरून भारत आणि बांगलादेश यांच्यात वादही होता. अखेर या वादाचे मूळ असलेल्या बेटाचेच अस्तित्व जेव्हा संपुष्टात आले, तेव्हाच हा वादही संपुष्त आला. समुद्रसपाटीपासून दोन मीटर वर असलेले साडेतीन किलोमीटर लांबीचे आणि तीन किलोमीटर रुंदीचे हे बेट पाण्याखाली जाण्याची प्रक्रिया १९८० पासून सुरू होती आणि याची माहिती असूनसुद्धा ते वाचविण्यात यश आले नाही.

  मॉरिशस, लक्षद्वीप, अंदमान बेटे आदी भागांवर जागतिक तापमानवाढीचा प्रचंड प्रतिकूल परिणाम जाणवत आहे. त्याबरोबरच भारताचे शेजारी देश असणाऱ्या श्रीलंका, बांगलादेश आणि मॉरिशस येथील स्थिती चिंताजनक आहे. मालदीव बेट पूर्णपणे बुडून जाण्याचा धोका उंबरठ्याशी आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरात असलेली घोडमारा बेट आणि लोहाचार बेट ही अशी बेटे आहेत, जी गेल्या काही वर्षांपासून हळूहळू पाण्यात बुडत असल्याचे ठाऊक असूनसुद्धा ती वाचविण्यात यश आलेले नाही. त्यासाठी एखादी प्रभावी योजनाही अद्याप तयार करण्यात आलेली नाही.

  पूर्बासा बेटाप्रमाणेच सुंदरबन बेटसुद्धा समुद्रात सामावून जाण्याची धास्ती सातत्याने प्रबळ होत चालली आहे. पंचवीस वर्षांत सुंदरबनला जलसमाधी असे मानले जात आहे. लक्षात घेण्याजोगी बाब अशी की, गेल्या पन्नास वर्षांत सुंदरबनमधील २२१ चौरस किलोमीटर क्षेत्र पाण्यात बुडाले आहे. सुंदरबन डेल्टामध्ये असलेल्या घोडमारा बेटाचा चाळीस टक्के, सागर बेटाचा सुमारे पंचवीस टक्के आणि मौसमी बेटाचा सुमारे तीस टक्के हिस्सा पाण्यात बुडाले आहेत. आगामी काही वर्षांत ही बेटे पूर्णपणे पाण्यात बुडून जातील अशी शक्‍यता आहे.

  भारतात सन २०१४ च्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी विशेषतः पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांनी सुंदरबनला असलेल्या धोक्याला आपापल्या जाहीरनाम्यांत स्थान दिले होते. परंतु आतापर्यंत त्यासाठी काहीही करण्यात आलेले नाही. सुंदरबन भागात सुमारे ६४ लाख लोक राहतात. सुंदरबनमध्ये विशेषत्वाने पूर, वादळे आणि जमीन क्षारपड होणे या प्रमुख समस्या आहेत आणि या समस्या कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालल्या आहेत. गेल्या चार दशकांमध्ये सुंदरबन तुकड्या-तुकड्याने पाण्यात बुडत चालले आहे आणि त्यामुळे हजारो लोक सातत्याने विस्थापित होत आहेत.

  आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या मधोमध माजुली हे जगातील सर्वांत मोठे नदीतील बेट प्रचंड प्रमाणात जमीन वाहून जाण्याच्या समस्येतून जात आहे. एकेकाळी या बेटाचे एकूण क्षेत्रफळ १२७८ चौरस किलोमीटर होते, ते आता अवघे ४०० चौरस किलोमीटरपेक्षाही कमी उरले आहे. अर्थात, आतापर्यंत या बेटावरील सर्वच्या सर्व २३ गावे सहीसलामत आहेत; परंतु संपूर्ण माजुली बेटाचे अस्तित्व आगामी काही वर्षांत संपून जाईळ आणि या बेटावरील सर्व गावांना जळसमाधी मिळेल, अशी भीती तज्ज्ञांना वाटते आहे.

  आजमितीस समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे किनारपट्टीवरील प्रदेश बुडून जाण्याचा धोका नसलेला एकही विभाग जगात शिल्लक नाही. अनियंत्रित पूर, सागरी वादळे आणि समुद्राची वाढती पाणीपातळी या सर्व समस्यांचे एकमेव कारण जागतिक तापमानवाढ हेच आहे.