Sekhar Basu A victim of Corona
शेखर बसू : कोरोनाचा एक बळी

अणुबॉम्बमुळे बदनाम झालेल्या अणुशक्तीचे विधायक उपयोग आहेत, कृषीपासून वैद्यकापर्यंत. ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी अणुशक्ती संशोधनाचा पाया डॉ. होमीभाभा यांनी रचला, हे कार्य पुढे नेणाऱ्यांमध्ये अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष शेखर बसू यांचा समावेश होता.

अणुबॉम्बमुळे बदनाम झालेल्या अणुशक्तीचे विधायक उपयोग आहेत, कृषीपासून वैद्यकापर्यंत. ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी अणुशक्ती संशोधनाचा पाया डॉ. होमीभाभा यांनी रचला, हे कार्य पुढे नेणाऱ्यांमध्ये अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष शेखर बसू यांचा समावेश होता.  भारताने २०१५ साली मंगोलियाला कर्करोगावरील उपचारासाठी ‘भाभाट्रॉन’ हे उपकरण भेट दिले, ते तयार करण्यात बसू यांचा मोठा वाटा होता.

मानव कल्याणासाठी अणुशक्‍तीचा वापर करणाऱ्या या वैज्ञानिकाचा कोरोनाने बळी घेतला. निहारमधीळ मुझफ्फरपूर येथे जन्मलेले बसू यांनी भारताला आयएनएस अरिहंतसारखी अणुशक्‍तीवरील पहिली पाणबुडी कार्यान्वित करण्यासाठी अणुभट्टी तयार करून देण्यात त्यांची मोठी भूमिका होती. त्यांना २०१४ मध्ये पद्मश्रीने गौरवण्यात आले होते.

२००२ मध्ये इंडियन न्युक्लिअर सोसायटीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. भाभा अणुशक्ती केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. कोलकाता येथील व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरमध्ये ते होमी भाभा अध्यासनाचे प्रमुखही होते. कोलकात्याच्या या संस्थेने टाळेबंदीच्या काळातही वैद्यकीय उपचारात लागणारी समस्थानिके रुग्णालयांपर्यंत पोहोचवली होती.

बसू यांचे शिक्षण  बालीगंज सरकारी शाळेत झाले, १९७४ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या ‘व्हीजेटीआय’ संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली. १९७५ मध्ये भाभा अणुशक्ती केंद्रात प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्या वेळो त्यांनी अणुइंधन निर्मितीत प्राथमिक प्रयोगांपासून सुरुवात केली. त्यावर आधारित अणुभट्टी यशस्वी ठरल्याने त्यांना तमिळनाडूतील कळलपक्कम येथील प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली.

तारापूर येथील अणुइंधन फेरप्रक्रिया प्रकल्पाच्या तसेच थेनी येथे न्यूट्रिनो वेधशाळेच्या उभारणीतही त्यांचे योगदान होते. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, अणुशक्ती खात्याचे सचिव ही मोठी पदे त्यांनी भूषवली. त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही काही वाटाघाटीत त्यांचा सहभाग होता. हिंगोलीत लायगो प्रकल्प सुरू करण्यासाठी अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशनबरोबर करारात त्यांचा वाटा होता.