शरद पवारांचे स्वप्नरंजन : यापूर्वी ही अनेकदा केले होते प्रयत्न

शरद पवार असे नेते आहेत की, मंत्री असतानाही त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड राहिलेली आहे. आताही महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे ते मार्गदर्शक आहेत. मागील ४ दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवारांचा प्रभाव कायम आहे.

  महाराष्ट्राचे दिग्गज नेते शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय शिष्य आहेत. यशवंतराव चव्हाण हे उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले होते, परंतु पंतप्रधान बनण्याची संधी मात्र त्यांना लाभली नाही. दक्षिण भारतातील नेते पी. व्ही. नरसिंहराव आणि एच. डी. देवगौडा यांना पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली, परंतु महाराष्ट्र मात्र देशाच्या पंतप्रधानपदापासून अजूनपर्यंत तरी वंचितच राहिलेला आहे.

  शरद पवार हे महत्त्वाकांक्षी नेते आहेत. राजकीय मुत्सद्देगिरी त्यांच्या रोमारोमात ठासून भरलेली आहे आणि म्हणूनच ते वयाच्या ३८ व्या वर्षी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. केंद्र सरकारमध्ये ही पवारांनी संरक्षण आणि कृषिमंत्रीपद सांभाळलेले आहे. इतर नेत्यांपेक्षा पवारांचा राजकीय अनुभव मोठा आहे. शरद पवार असे नेते आहेत की, मंत्री असतानाही त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड राहिलेली आहे. आताही महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे ते मार्गदर्शक आहेत. मागील ४ दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवारांचा प्रभाव कायम आहे.

  राजीव गांधी यांची लिट्टेंनी हत्या केल्यानंतर देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नरसिंहराव, अर्जुनसिंग आणि शरद पवार हे तीन नेते होते. परंतु त्यावेळी नरसिंहराव यांनी बाजी मारली. नरसिंहरावांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार यांनी संरक्षणमंत्रीपद भूषविले आहे. त्यानंतर पवारांनी विदेशी जन्माच्या मुद्दयावरून सोनिया गांधी यांना आव्हान दिले होते. या मुद्दयावर पी. ए. संगमा आणि तारीक अन्वर हे नेतेच केवळ शरद पवारांसोबत होते. त्यानंतर पवारांनी काँग्रेस पक्षाला रामराव ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर युपीएची स्थापना झाली आणि शरद पवार व सोनिया गांधी यांच्यामध्ये समझोता झाला.

  तथापि, महाराष्ट्रात मात्र शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अधिक बळ्कट झाला. शरद पवार हे अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते आहेत. अजूनही पवारांची राष्ट्रीय नेतेपदाची महत्त्वाकांक्षा कायम आहे. इ. स. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्याशी टक्कर देण्यासाठी ज्या नेत्यांची नावे घेतली जात आहेत, त्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत शरद पवारांच्या नावाचाही उल्लेख करण्यात येतो. ममतांचा बंगाल वगळता देशातील इतर राज्यात प्रभाव नाही, परंतु पवारांना गैरकाँग्रेस आणि गैरभाजपा पक्षांचे समर्थन मिळू शकते. निवडणुकीच्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळ्खल्या जाणार्‍या प्रशांत किशोर यांच्यासोबत शरद पवार यांची मुंबईत नुकतीच तीन तास चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी “राष्ट्रीय मोर्चा’ स्थापन करण्याबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोळले जात आहे.

  काँग्रेस पक्ष मात्र कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांना सोनिया गांधींच्या जागेवर युपीएचे अध्यक्ष बनविण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष प्रशांत किशोर यांच्याकडे दुसरे युपीए स्थापन करण्याची जबाबदारी सोपवू शकतात. प्रशांत किशोर यांचे ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार यांच्याशी चांगले संबंध आहेत. शिवाय दक्षिण भारतातील नेत्यांसोबतही प्रशांत किशोर यांचे संबंध आहेत, हे लक्षात घेऊन त्यांना ही जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक वेळा शरद पवारांकडे युपीएचे अध्यक्षपद सोपविण्यात यावे, अशी शिफारस केलेली आहे. परंतु काँग्रेस नेत्यांनी मात्र याला विरोध करून राऊतांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, युपीएच्या बाबतीत बोलण्याचा राऊतांना कोणताही अधिकार नाही, असे वक्तव्य केले. तसे तर पवारांना कोणत्याही पदाची लालसा नाही, परंतु त्यांना त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात मजबुतीने उभे करायचे आहे व ती त्यांची आंतरिक इच्छा आहे!

  Sharad Pawars dreaming This was done many times before