शिवसेनेकडून काँग्रेसचा ”चिल्लरवाडा”

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजे एक मोठी सर्कस समजावी आज ना उद्या कोसळली तर नवल वाटण्याचे कारण नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वयोवृद्ध नेते शरद पवार यांनी केलेला हा प्रयोग आहे.

 राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजे एक मोठी सर्कस समजावी आज ना उद्या कोसळली तर नवल वाटण्याचे कारण नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वयोवृद्ध नेते शरद पवार यांनी केलेला हा प्रयोग आहे. महाविकास आघाडीचे ते भीष्म समजले तरी येथेही पांडव-कौरव आहेतच. सत्ता चालविण्याचा कुठलाच अनुभव नसलेले उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या दिमतीला त्यांच्याच खुर्चीवर नजर ठेवणारे अजित पवार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षामध्ये असा उच्च दर्जाचा कुणी नेता नाही जो शरद पवारांची उंची गाठू शकतो. उद्धवांना सत्ता देणारी शिवसेना नाही तर शरद पवार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला दुखावण्याची हिंमत ते करीत नाहीत. काँग्रेसला तर ते जुमानतच नाहीत. तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला असेच काँग्रेसच्याप्रती त्यांचे धोरण आहे. मध्यांतरी राहूल गांधींनी महाराष्ट्रात सत्ता सहभागी असलेल्या काँग्रेसची भूमिका सरकारात काय आहे स्पष्ट केले होते. त्यानंतर यावर बरेच वादंग झाले. काँग्रेस म्हणजे उद्धव-पवारांच्या कारभारातील घरगडी या पेक्षा वेगळे काही कथन करताच येणार नाही. काँग्रेसचे सत्तेत राहणे पण धोरणात्मक निर्णयात सहभागी नसणे हा या पक्षाचा घोर अपमान आहे. पण महाराष्ट्रातील सत्ताप्रिय काँग्रेसनी नेत्यांना त्याचे काही लेण-देण नाही. ते कितीही अपमानित केले गेले तरी सत्ता सोडणार नाही याची जाणीव उद्धव-पवारांना असावी. राष्ट्रीय गौरव असलेला काँग्रेस पक्ष सत्तालोभापायी महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीच्या कारभारात घरगडी राहणे हा भागच मन सून्न करणारा ठरतो आहे. आता राज्यातील काँग्रेसी नेते मंडळी आपलं दुखणं ज्यांनी ते दिलं त्याच्याकडे ते मांडायला जाणार आहेत. 

ह्यांचा निर्णयात सहभाग नसतोच 

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे १२ मंत्री आहेत पण स्वपक्षीय आमदार व नेते यांची हवा गूल आहे. कुणाचे कामच होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस या मंत्र्यांपुरती मर्यादित राहिली आहे. महाराष्ट्रात सत्तेत असणारी काँग्रेस शक्तीमान न होता दुर्बल होत असल्याचे दिसत आहे. कोरोना, चक्रीवादळ संकटात उद्धव-पवार दिसले पण काँग्रेस कुठेच दिसली नाही. महाराष्ट्रात २८८ विधानसभेच्या जागा आहेत. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४ व काँग्रेस ४४ असे १५४ संख्याबळ आहे. सरकारात काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही असे रामदास आठवले सुद्ध म्हणाले होते. काँग्रेसने पक्ष सन्मानासाठी कधीच बाहेर पडणे गरजेचे होते.